भारतीय निवडणूक आयोग

पुढे ढकललेल्या राज्यसभा निवडणुकांसाठी मतमोजणीची तारीख

Posted On: 01 JUN 2020 8:40PM by PIB Mumbai

 

भारतीय निवडणूक आयोगाने,17 राज्यांमधून राज्यसभेवर निवडून आलेल्या व एप्रिल 2020 मध्ये सदनातून निवृत्त होणाऱ्या 55 सदस्यांच्या जागांसाठी, दि.25.02.2020 रोजी राज्यसभा निवडणुका जाहीर केल्या. दि.06.03.2020 च्या अधिसूचना क्र. 318/CS-Multi/2020(1) नुसार त्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. नामांकनपत्रे मागे घेण्यासाठीच्या 18.03.2020 या शेवटच्या दिवसानंतर, संबंधित रिटर्निंग अधिकाऱ्यांनी 10 राज्यांतील 37 जागा बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. संबंधित रिटर्निंग अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालांनुसार, आंध्रप्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, मणिपूर, मेघालय आणि राजस्थान या राज्यांतील 18 जागांसाठी गुरुवार दि. 26.03.2020 मतदान घेतले जाणार होते. तर, दि. 06.03.2020 च्या अधिसूचनेनुसार सोमवार दि. 30.03.2020 पूर्वी निवडणूक पूर्ण होणे अपेक्षित होते.

1951 च्या जनप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 153 नुसार, निवडणूक आयोगास योग्य वाटणाऱ्या कारणांवरून कोणत्याही निवडणुकीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय, अधिसूचनेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून आयोग घेऊ शकतो. त्यानुसार, कोविड-19 मुळे उद्भवलेली सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची अभूतपूर्व परिस्थिती आणि देशासमोरील तत्संबंधित अन्य अडचणी विचारात घेता, निवडणूक आयोगाने दि. 24.03.2020 रोजी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्यसभेची सदर निवडणूक  पुढे ढकलली व या निवडणुकीची कालमर्यादा वाढवली. तसेच, सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोग नवीन निवडणुकीसाठी मतदानाची व मतमोजणीची तारीख घोषित करेल, असेही त्यावेळी आयोगाने स्पष्ट केले. तसेच, या निवडणुकीसाठी रिटर्निंग अधिकाऱ्यांनी प्रकाशित केलेल्या उमेदवारांच्या याद्या तशाच वैध राहतील, असेही आयोगाने स्पष्ट केले होते.

आता आयोगाने सर्व परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहसचिव आणि NEC म्हणजेच राष्ट्रीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष यांनी राष्ट्रीय  व्यवस्थापन कायदा-2005 अन्वये दि. 30.05.2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांसह सर्व घटक विचारात घेता, तसेच, संबंधित मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर विचार करून, निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. यानुसार आंध्रप्रदेश (4 जागा), गुजरात (4 जागा), झारखंड (2 जागा), मध्यप्रदेश (3 जागा), मणिपूर (1 जागा), मेघालय (1 जागा), आणि राजस्थान (3 जागा) अशा 18 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान व मतमोजणीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे-

कार्यक्रम

दिनांक

मतदान  दिनांक

19 जून 2020 (शुक्रवार)

मतदान वेळ

. 09:00 ते दु. 04:00

मतमोजणी

19 जून 2020 (शुक्रवार) संध्या. 05:00 pm

या दिनांकापूर्वी निवडणूक पूर्ण होईल 

22 जून 2020 (सोमवार)

 

सदर निवडणुकांची व्यवस्था करताना कोविड -19 प्रतिबंधक उपायांचे काटेकोर पालन होण्याची खबरदारी घेण्यासाठी राज्यांच्या  मुख्य सचिवांमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

तसेच, त्या-त्या राज्यात निवडणुकीवर देखरेख करण्यासाठी निरीक्षक म्हणून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती आयोगाने केली आहे.

 

M.Jaitly/J. Waishampayan/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1628430) Visitor Counter : 322