PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
02 DEC 2020 8:02PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 2 डिसेंबर 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारतातील सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत लक्षणीय घसरण होत असून आजची रुग्णसंख्या 4,28,644 इतकी आहे. गेल्या 132 दिवसांच्या कालावधीनंतर प्रथमच रुग्णसंख्येने आज नीचांक गाठला आहे. याआधी, गेल्या 23 जुलै 2020 रोजी सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 4 लाख 26 हजार 167 इतकी होती.
भारतात आता सक्रीय कोविड रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत असून सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या फक्त 4.51 टक्के इतकी झाली आहे.
देशात नव्याने कोविड संसर्ग होणाऱ्या व्यक्तींची संख्या गेले तीन दिवस सातत्याने 40 हजारांपेक्षा कमी असलेली दिसून आली आहे. देशात गेल्या 24 तासांच्या कालावधीत 36,604 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली, या कालावधीत 43,062 जण रोगमुक्त होऊन रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गेले पाच दिवस बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्याने बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे.
नव्याने रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या आणि रोज नोंदल्या जाणाऱ्या नवीन बाधीतांची संख्या यांच्यातील फरक वाढत चालला आहे. कोविड बाधित बरे होण्याचे प्रमाण 94.03 टक्क्यांवर पोहोचले आहे.
कोविड संसर्गातून पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या 89,32,647 झाली. रोगमुक्त होणारे आणि नव्याने बाधित यांच्या संख्येतील तफावत दिवसेंदिवस सतत वाढतच असून 80 लाखांचा आकडा पार करून सध्या ही तफावत 85,04,003 इतकी आहे.
नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी 78.35 टक्के रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत आहेत.
महाराष्ट्रात एका दिवसांत रोगमुक्त झालेल्यांची संख्या देशातील सर्वाधिक म्हणजे 6,290 इतकी असून त्याखालोखाल केरळमध्ये 6,151 तर दिल्लीत 5,036 रुग्ण रोगमुक्त झाल्याची नोंद झाली आहे.
नोंद झालेल्या नव्या कोविड बाधितांपैकी 77.25 टक्के रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 5,375 व्यक्ती नव्याने कोविड बाधित झाल्याची नोंद झाली, त्याखालोखाल महाराष्ट्रात 4,930 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशभरात गेल्या 24 तासांत 501 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 79.84 टक्के रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील होते. या मध्ये, सर्वात जास्त म्हणजे 95 रुग्ण महाराष्ट्रातील होते तर दिल्लीत 86 आणि पश्चिम बंगालमध्ये 52 रुग्णांचा मृत्यु झाला.
इतर अपडेट्स:
आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय टेलीमेडिसीन उपक्रमाच्या ई-संजिवनीने आज उल्लेखनीय कामगिरी करत 9 लाख लोकांना समुपदेशन देण्याचे कार्य पूर्ण केले. ई-संजिवनी आणि ई-बाह्य रूग्ण विभाग याद्वारे सर्वात अधिक समुपदेशन करणारी दहा राज्ये तामिळनाडू (2,90,770), उत्तरप्रदेश (2,44,211), केरळ(60,401), मध्यप्रदेश(57,569), गुजरात (52,571), हिमाचल प्रदेश (48,187), आंध्रप्रदेश (37,681), उत्तराखंड(29,146), कर्नाटक(26,906) आणि महाराष्ट्र(10,903) ही आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार प्रणाली अंतर्गत डे केअर थेरपी केंद्र सुविधेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेने (सीजीएचएस) यापूर्वी पुरवलेल्या पारंपरिक औषधांच्या डे केअर थेरपी सेंटर प्रमाणेच आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचाराची खासगी डे केअर थेरपी केंद्र लवकरच केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत (सीजीएचएस) अंतर्भूत करण्यात येतील.
गणिती मांडणीवर आधारित आणि जगभरातील मलेरिया आजाराच्या रुग्ण संख्येचे अंदाज वर्तवणाऱ्या मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल (WMR) 2020 जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केला आहे. यानुसार भारताने मलेरियाचा धोका कमी करण्यात सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. मलेरियाचा प्रसार असणाऱ्या देशांपैकी भारत हा एकमेव असा देश आहे जिथे 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये या आजाराच्या केसेस 17.6 टक्के ने कमी झाल्या आहेत.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर, रेल्वे आणि वाणीज्यमंत्री पियुष गोयल, वाणीज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी एक डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात पंजाबमधील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या मंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना शेती सुधारणा कायद्यांचे फायदे समजावून सांगितले. शेती सुधारणा कायद्यांशी संबंधित विविध मुद्यांवर सौहार्दपूर्ण वातावरणात प्रदीर्घ आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.
भारतीय राज्यघटनेत नमूद केलेले आरक्षण धोरण एनईपी 2020ने कायम ठेवले असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी स्पष्ट केले आहे. पीटीआयच्या हवाल्याने 24 नोव्हेंबर 2020 रोजी आणि त्या सुमारास काही प्रसारमाध्यमांनी एनईपी-2020 भारतीय राज्यघटनेत नमूद केलेले आरक्षण कायम ठेवणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता, त्याबाबत हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
हवामानातील बदल कमी करण्याच्या आपल्या प्रयत्नात जनता आणि उद्योग हे मुख्य घटक आहेत असे .केंद्रीय पर्यावरण, हवामान बदल आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. उद्योग संक्रमण नेतृत्व शिखर परिषदेच्या उच्चस्तरीय सत्रात बोलताना ते म्हणाले की जागतिक कार्बन उत्सर्जनामध्ये उद्योगाचा थेट 30 टक्के हिस्सा आहे आणि हवामानातील बदलाचा सामना करण्यासाठी कमी कार्बन मार्गांकडे उद्योगांना वळवणे अतिशय महत्वाचे आहे.
हवामान बदलांबाबत चर्चा करण्यासाठी भारत गंभीर असून त्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च स्तरीय आंतर-मंत्रालयीन समितीची स्थापना केली आहे. या समितीचा उद्देश हवामान बदलांच्या मुद्द्द्यांवर समन्वयित प्रतिसाद निर्माण करणे हा आहे.
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने फिल्म्स डिविजनने उद्या चार विशेष निवडक माहितीपटांचे प्रसारण आयोजित केले आहे. या चित्रपटांमध्ये दिलेर – अरुणिमा सिन्हा (5 मिनिटे), इनर व्हॉईस (5 मिनिटे), होप इन डार्कनेस (42 मिनिटे) आणि विंग्ज ऑफ डिझायर (59 मिनिटे) या माहितीपटांचा समावेश आहे. यु-ट्युब चॅनेल व संकेतस्थळावरून या चित्रपटांचे थेट प्रसारण केले जाईल.
महाराष्ट्र अपडेट्स:
कोविड-19 च्या बरे झालेल्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ झाली आहे कारण गेल्या 24 तासात बरे झालेल्या रूग्णांची संख्या बाधित रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रातील कोविड -19 चा रुग्ण बरे होण्याचा दर 92.49 टक्के आहे तर मृत्यू दर 2.58 टक्के आहे. सात महिन्यांनंतर प्रथमच मुंबईत मंगळवारी कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 9 अशी एक अंकी नोंदवली गेली. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 89,098 आहे.
GC/ST/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677757)
Visitor Counter : 220