आयुष मंत्रालय

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आयुष डे केअर थेरपी केंद्रांना मंजुरी

Posted On: 02 DEC 2020 4:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  2 डिसेंबर 2020

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार प्रणाली अंतर्गत डे केअर थेरपी केंद्र सुविधेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या  आरोग्य योजनेने (सीजीएचएस)  यापूर्वी  पुरवलेल्या  पारंपरिक औषधांच्या डे केअर थेरपी सेंटर प्रमाणेच आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचाराची खासगी डे केअर थेरपी केंद्र  लवकरच केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत (सीजीएचएस) अंतर्भूत  करण्यात येतील.

सर्व सीजीएचएस लाभार्थी, सेवेत असलेले तसेच निवृत्तिवेतनधारक या केंद्रांचा लाभ घेऊ शकतील. लोकांमधील आणि सर्व सीजीएचएस लाभार्थींमधील आयुष औषध प्रणालीची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.

दिल्ली आणि एनसीआरसाठी प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला एक वर्षासाठी डे केअर थेरपी सेंटर  सुरु  केले जाईल आणि त्यानंतर इतर ठिकाणांबाबत  विचार केला जाईल.

डे केअर थेरपी सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी थोड्या काळासाठी म्हणजे काही तास किंवा एक दिवसापेक्षा कमी वेळ राहणे गरजेचे असून या योजनेंतर्गत सीजीएचएस लाभार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.आरोग्य आणि  स्वास्थ्य  सुधारणे, आरोग्य सेवेवरील खर्च कमी करणे आणि रूग्णांना उत्तम कार्यक्षम आणि आरामदायी सेवा पुरवणे  हे  या योजनेचे उद्दिष्ट आहे.

अपरिचित वातावरणात उपचार प्रक्रियेसाठी रात्रभर मुक्काम करण्याची आवश्यकता नसल्यामुळे, मुले आणि वृद्ध रुग्णांसाठी हे अत्यंत सोयीचे आहे. आयुष औषध प्रणालीचा लाभ देण्यासाठी केंद्र  सरकारचे हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल  आहे.

सध्या पंचकर्म आणि अभ्यंग इत्यादी मान्यताप्राप्त उपचार सीजीएचएस संलग्न रुग्णालयांमध्ये  दाखल झाल्यानंतरच दिले जातात.  यामध्ये सीजीएचएसला अंतर्गत खोलीचं  भाडे म्हणून अतिरिक्त खर्च समाविष्ट असतो, जे प्रक्रियेच्या खर्चाव्यतिरिक्त स्वतंत्रपणे सीजीएचएसद्वारे दिले जातात. डे केअर सेंटर केवळ रुग्णालयातील उपचारांचा खर्च  कमी करत  नाहीत तर  रुग्णाची सोय देखील पाहिली जाते.

आयुष डे केअर सेंटर म्हणजे सामुदायिक आरोग्य केंद्र (सीएचसी), प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), दवाखाना, क्लिनिक, पॉलीक्लिनिक किंवा असे कोणतेही केंद्र जे स्थानिक प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आहे,  आणि आयुष वैद्यकीय चिकित्सकांच्या देखरेखीखाली उपचार प्रक्रिया आणि वैद्यकीय सुविधा  किंवा शस्त्रक्रिया  / निम-शस्त्रक्रिया करण्याची सुविधा आहे आणि खालील सर्व आवश्यकतांचे पालन केले जात आहे -

  1. पात्र नोंदणीकृत आयुष मेडिकल प्रॅक्टिशनरची पात्रता असणे;
  2. आवश्यकतेनुसार समर्पित आयुष थेरपी विभाग
  3. रुग्णांची दैनंदिन नोंद ठेवणे आणि त्यांना विमा कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीला भेटण्याची सुविधा  उपलब्ध असणे आणि;
  4. खाजगी केंद्रांच्या बाबतीत एनएबीएच मान्यता  किंवा प्रवेश स्तराचे प्रमाणपत्र.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1677686) Visitor Counter : 276