PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
24 NOV 2020 7:55PM by PIB Mumbai
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
दिल्ली-मुंबई, 24 नोव्हेंबर 2020
राष्ट्रपती राम नाथ कोविंद उद्या ( दिनांक 25 नोव्हेंबर 2020) गुजरातमधील केवाडीयाल भेट देणार असून, उद्या ते देशातील सर्व पीठासीन अधिकाऱ्यांच्या 80 व्या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. संविधान दिनानिमित्त लोकसभा सचिवालयाने या दोन दिवस चालणाऱ्या परिषदेचे आयोजन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज, दि. 24 नोव्हेंबर, 2020 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यासह उच्चस्तरीय बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीमध्ये सर्व राज्यांमधील कोविड-19 विषयीची स्थिती आणि सज्जतेविषयी प्रतिसाद आणि व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. यामध्ये हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.
निवार चक्रीवादळासंदर्भात तिथल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एदाप्पदी के. पलानीस्वामी आणि पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्याशी चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर रोजी, लखनौ विद्यापीठाच्या शतक महोत्सवी स्थापना दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी साडे पाच वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल. 1920 साली या विद्यापीठाची स्थापना झाली होती, आणि यंदा विद्यापीठ आपले शंभरावे वर्ष साजरे करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 1921 मध्ये सुरू झाली.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
सहा दिवसानंतर भारतात दररोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या 40,000 पेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 37,975 इतकी आहे. 8 नोव्हेंबरपासून मागील सलग 17 व्या दिवशी दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांचा आकडा 50,000 च्या खाली आहे.
देशातील 2,134 प्रयोगशाळांच्या माध्यमातून भारताच्या चाचणी सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे. दररोज दहा लाखांहून अधिक चाचण्या करण्याच्या आपल्या वचनबद्धतेस अनुसरून गेल्या 24 तासांत 10,99,545 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. भारताच्या एकूण एकत्रित चाचण्यांनी 13.3 कोटीचा (13,36,82,275) टप्पा पार केला आहे.
आज एकत्रित राष्ट्रीय बाधित रुग्ण दर 7 टक्क्यांपेक्षा कमी होऊन 6.87% झाला आहे. दैनंदिन बाधित रुग्ण दर 3.45% झाला आहे. चाचणीचे प्रमाण वाढल्याने बाधित रुग्ण दर कमी होण्यास मदत झाली आहे.
प्रति दशलक्ष (टीपीएम) चाचण्यांचे प्रमाण वाढून 96,871 झाले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून सक्रिय रुग्ण संख्येत सातत्याने घट झाली आहे.
गेल्या 24 तासात 42,314 रुग्ण बरे झाले असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
सक्रीय रुग्ण संख्येत घट होऊन ती 4,38,667 झाली आहे. निरंतर होत असलेल्या घसरणीमुळे देशात सध्या 4.78% बाधित रुग्ण आहेत.
रुग्ण बरे होण्याचा दर देखील 93.76% पर्यंत वृद्धिंगत झाला आहे. आतापर्यंत 86,04,955 रुग्ण बरे झाले आहेत.
बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 75.71 टक्के रुग्ण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
दिल्लीत काल सर्वाधिक 7216 नवीन रुग्ण बरे झाले असून केरळमध्ये 5,425 आणि त्यानंतर महाराष्ट्रात 3,729 लोक बरे झाले आहेत.
काल नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी 77.04% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
दिल्लीत काल एका दिवसात सर्वाधिक 4,454 नवीन रुग्ण आढळले तर त्या खालोखाल महाराष्ट्रात 4,153 नवे रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 480 मृत्यूची नोंद झाली.
नवीन मृत्यूंपैकी 73.54% 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यापैकी दिल्लीत 121 तर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये अनुक्रमे 47 आणि 30 मृत्यू झाले.
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स:
महाराष्ट्र शासनाने 25 नोव्हेंबरपासून हवाई, रेल्वे किंवा रस्ते मार्गे प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन मार्गदर्शक जारी केली आहेत. यानुसार, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा येथून महाराष्ट्रात हवाई किंवा रेल्वे मार्गाने येणार्या देशांतर्गत प्रवाशांना कोविड निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागेल. सांगली, सातारा आणि वाशिम जिल्ह्यात 9 ते 12 वीच्या शाळा पुन्हा सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत, तर मुंबई , ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर प्रमुख महानगरपालिकांनी कोविड 19 च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आपापल्या भागातील शाळा पुन्हा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ.बालासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे उपस्थित न राहण्याचे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
FACT CHECK
* * *
S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1675442)
Visitor Counter : 207