दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय टपाल खात्याचा मुंबई विभाग उद्या स्वच्छता आणि पुनर्वापर या विषयावर विशेष लिफाफा प्रकाशित करणार
Posted On:
24 NOV 2020 3:48PM by PIB Mumbai
मुंबई, 24 नोव्हेंबर 2020
भारतीय टपाल खात्याचा, मुंबई विभाग बुधवारी (25 नोव्हेंबर, 2020) सकाळी 11: 30 वाजता पोस्टमास्टर जनरल, मुंबई विभाग, मुंबई जीपीओच्या सभागृहात स्वच्छता आणि पुनर्वापर या विषयावर एक विशेष लिफाफा प्रकाशित करणार आहे. त्यासोबतच, राष्ट्रीय टपाल सप्ताहात (9-15 ऑक्टोबर 2020) दरम्यान भारतीय टपाल खात्याच्या, मुंबई विभागाने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांच्या चित्रांकनातून चित्र पोस्टकार्डच्या संचाचे प्रकाशनही या कार्यक्रमामध्ये होईल. या स्पर्धेमध्ये देशभरातून 450 हून अधिक लोक सहभागी झाले होते.
विशेष लिफाफा आणि चित्र पोस्टकार्डचे प्रकाशन मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र व गोवा परिमंडळ, हरीश चंद्र अग्रवाल आणि पोस्टमास्टर जनरल, इंडिया पोस्ट - मुंबई विभाग, स्वाती पांडे यांच्या हस्ते होणार आहे.

प्रकाशित होणारा विशेष लिफाफा हा असाधारण आहे, कारण तो पुनर्वापर केलेल्या कागदापासून तयार करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या "स्वच्छ भारत" अभियानाबद्दल जागरूकता पसरविणे हे या लीफाफ्याचे उद्दीष्ट आहे.
देशातील तरुणांच्या कलागुणांना उत्तेजन देणे, त्यांच्यातील कलात्मकतेला ओळख मिळवून देणे आणि त्यांना स्वच्छतेची जाणीव करून देणे यासाठी देखील हा विशेष टपाल लिफाफा आणि चित्र पोस्टकार्डचा संच प्रकाशित केला जात आहे.
सर्व विजेते या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. जे मुंबईतील आहेत ते प्रत्यक्षरित्या तर देशातील इतर भागातील लोक आभासी पद्धतीने कार्यक्रमात सहभागी होतील.
* * *
M.Iyengar/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1675306)
Visitor Counter : 161