गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्पाईस हेल्थ आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या कोविड-19 आरटी-पीसीआर फिरत्या प्रयोगशाळेचे उद्‌घाटन


कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे-अमित शहा

Posted On: 23 NOV 2020 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  23 नोव्हेंबर 2020

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज कोविड-19 आरटी-पीसीआर फिरत्या प्रयोगशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले. या वाहनाची निर्मिती स्पाईस हेल्थ आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी संयुक्तपणे केली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव, स्पाईस जेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग आणि स्पाईस हेल्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी अवनी सिंग उपस्थित होते.

या चाचणी प्रयोगशाळा आणि आणखी नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या प्रयोगशाळांमुळे कोविड-19 रूग्णांच्या चाचणी क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. या प्रयोगशाळेला एनएबीएलची मान्यता आहे तसेच आयसीएमआरनेही मान्यता दिली आहे. कोविड-19 च्या विविध प्रकारच्या चाचण्यांपैकी आरटी-पीसीआर चाचणी सर्वात निर्णायक आहे. या प्रयोगशाळेमध्ये 499 रूपयांमध्ये चाचणी करता येणार आहे. तसेच हा खर्च आयसीएमआर वहन करणार आहे. सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरामध्ये कोविडची चाचणी करणे शक्य व्हावे, यासाठी ही उपाय योजना करण्यात आली आहे.

कोविडच्या इतर चाचणींचा अहवाल साधारणत: 24 ते 48 तासांमध्ये मिळू शकतो. मात्र या फिरत्या प्रयोगशाळेत घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल 6 ते 8 तासांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे.

यासंदर्भामध्ये स्पाईस हेल्थने आयसीएमआर बरोबर सामंजस्य करार केला असून त्यानुसार देशभरामध्ये अशी  फिरती चाचणी केंद्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचा प्रारंभ आज राजधानी दिल्ली येथे करण्यात आला. दिल्लीच्या विविध भागांमध्ये येत्या काही दिवसांत अशा प्रकारे चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 10 प्रयोगशाळा तयार करण्याचे नियोजन आहे. तसेच प्रारंभी प्रत्येक प्रयोगशाळेत दररोज एक हजार नमुने तपासणीसाठी संकलित करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळांची क्षमता हळू हळू वाढवून ती दररोज 3,000 चाचण्या करण्यापर्यंत नेण्यात येणार आहे. 

 

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675192) Visitor Counter : 203