PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
26 AUG 2020 7:30PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दिल्ली-मुंबई 26 ऑगस्ट 2020
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
व्यापक चाचण्यांच्या माध्यमातून वेळीच कोविड-19 संक्रमणाचे निदान याची भारतातील संक्रमणाविरोधातील रणनितीमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. केंद्र सरकारच्या ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ धोरणानूसार राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे देशात दररोज 10 लाख चाचण्यांची क्षमता निर्माण झाली आहे.
गेल्या 7 दिवसांतील चाचण्यांची संख्या ही केंद्र आणि राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रदेश या दिशेने असलेले निर्धारित, केंद्रित, सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्न दर्शवते. आतापर्यंतच्या एकूण चाचण्यांची संख्या 3,76,51,512 एवढी आहे. तर, गेल्या 24 तासांत 8,23,992 चाचण्या करण्यात आल्या आहेत. सातत्यपूर्ण चाचण्यांमुळे लवकर निदान होते. लवकर निदान झाल्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांचे अलगीकरण किंवा रुग्णालयात दाखल करण्याची संधी मिळते. यामुळे मृत्यूदर कमी होत आहे.
विस्तारित प्रयोगशाळा नेटवर्क आणि देशभरात सुलभ चाचणीसाठीच्या सुविधांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. यामुळेच प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण (TPM) वाढून 27,284 एवढे झाले आहे. यात सातत्याने वृद्धी होत आहे.
भारतातील चाचणी प्रयोगशाळांचे जाळे सातत्याने विस्तारत आहे, सध्या 1540 प्रयोगशाळा आहेत. 992 प्रयोगशाळा या सरकारी क्षेत्रात आणि 548 प्रयोगशाळा खासगी क्षेत्रात आहेत. यामध्ये:
- रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 790 : (शासकीय : 460 + खासगी : 330)
- ट्रू नॅट आधारित चाचणी चाचणी प्रयोगशाळा 632 : (शासकीय : 498 + खासगी 134)
- सीबीएनएएटी आधारित प्रयोगशाळा : 118 (शासकीय : 34 + खासगी : 84)
भारतातल्या सक्रिय रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज 3.5 पटीपेक्षाही जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,000 पेक्षा जास्त राहिली आहे. गेल्या 24 तासात कोविड-19 चे 63,173 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 24,67,758 झाली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी व सक्रिय रुग्णांच्या टक्केवारीतील फरकही झपाट्याने वाढतो आहे.
सक्रिय रुग्ण संख्येच्या तुलनेत(7,07,267) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 17,60,489 ने जास्त आहे. याबरोबरच भारतातील बरे होणाऱ्या कोविड रुग्णांची टक्केवारी आज 76% च्या वर (76.30%) गेली आहे.
बरे होणाऱ्या रुग्णांच्या विक्रमी संख्येमुळे प्रत्यक्ष कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येचा भार कमी होण्यास, म्हणजेच सक्रीय रुग्णांची संख्या आणखी कमी होण्यास मदत झाली आहे. एकूण पॉझिटिव रुग्णांच्या तुलनेत या सक्रिय रुग्णांची संख्या फक्त 21.87% आहे.
केंद्र, राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी एकत्रितपणे राबवलेल्या धोरणांच्या अंतर्गत आक्रमक पद्धतीने कोविड चाचण्या केल्यामुळे असे रुग्ण लवकर सापडत असून त्यानंतर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे कार्यक्षम वैद्यकीय व्यवस्थापनही होत असल्याने मृत्यूदर सतत खाली येत आहे. तो आज 1.84 % असून स्थिरगतीने कमी होत आहे.
इतर अपडेट्स:
- आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेट न देता आभासी माध्यमातून सीजीएचएस, केंद्रीय आरोग्य सेवा लाभार्थींना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला लाभावा यासाठी सीजीएचएसने 25.8.2020पासून टेली कन्स्लटेशन सेवा सुरु केली आहे. सुरवातीला ही सेवा दिल्ली/एनसीआरमधल्या लाभार्थींना उपलब्ध राहील. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ई सेवा उपलब्ध असेल. सीजीएचएस टेली कन्स्लटेशन सेवा, आरोग्य मंत्रालयाच्या सध्याच्या ई संजीवनी मंचाचा वापर करत आहे.
- कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, घरी परतलेल्या स्थलांतरित मजुरांना आणि त्यांच्याप्रमाणेच परिणाम झेलणाऱ्या ग्रामीण नागरिकांसाठी रोजगाराला चालना देण्यासाठी आणि उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु करण्यात आले आहे. नवव्या आठवड्यापर्यंत एकूण 24 कोटी मानव दिवस रोजगार पुरवण्यात आला तर अभियानाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आत्तापर्यंत 18,862 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
- ‘किरण’ या मानसिक आरोग्य विषयक निःशुल्क हेल्पलाईनची (1800-599-0019) 27-08-2020 ला आभासी पद्धतीने सुरवात करण्यात येणार होती. मात्र, हा कार्यक्रम आता लांबणीवर टाकण्यात आला आहे. या कार्यक्रमाची नवी तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. हा कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे कोणतीही गैरसोय झाली असल्यास त्याबद्दल मंत्रालयाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
- नीती आयोगाने स्पर्धात्मकता संस्थेच्या भागीदारीने आज निर्यात सज्जता निर्देशांक (ईपीआय) 2020 जारी केला. भारतातल्या राज्यांची निर्यातीबाबतची तयारी आणि कामगिरी यांचे परीक्षण करणाऱ्या या पहिल्या अहवालाचा (ईपीआय)चा उद्देश, आव्हाने आणि संधी ओळखणे, सरकारी धोरणाचा प्रभाव अधिक वाढवणे आणि सोयीचा नियामक ढाचा करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
- रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या बंगाल केमिकल्स अँड फ़ार्मास्यूटिकल लिमिटेड (बीपीसीएल) ने कोविड-19 महामारीमुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादनांचे प्रमाण वाढवले आहे. कंपनीने एकाच दिवसात फिनाईलच्या 51,960 बाटल्या इतके उत्पादन करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पश्चिम बंगाल च्या उत्तर 24-परगणा स्थित बीपीसीएल पनिहाटी या कारखान्याने ही कामगिरी केली आहे.
- कॅन्टोन्मेंट भागात केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी न राखण्याचे संरक्षणमंत्र्यांचे आवाहन : कॅन्टोन्मेंटमधील 10,000 कर्मचाऱ्यांसाठी विमा योजनेचा राजनाथ सिंग यांच्या हस्ते शुभारंभ
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल नाक्यावरील परतीच्या प्रवासातील सूट किंवा इतर कोणतीही सूट मिळविण्यासाठी फास्टटॅग अनिवार्य केला आहे. 24 तासांच्या आत परतीचा प्रवास करताना ज्या वाहनचालकांना (वापरकर्त्यांनी) सवलत हवी असेल किंवा इतर कोणतीही स्थानिक सूट हवी असेल, त्यांनी वाहनात वैध फास्टॅग लावणे आवश्यक आहे.
- तेल आणि वायू उद्योगाने 20.04.2020 पासून कोविड महामारीच्या सर्व प्रमाणित नियमावलीचे पालन करत 5.88 लाख कोटी रुपये अंदाजे खर्चासह 8,363 आर्थिक उपक्रम / प्रकल्पांची सुरूवात केली .
- भारतीय लोक कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खते विभागाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) ने नोएडा स्थित आपल्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या बाहेरच्या भिंती महाराष्ट्राच्या प्रसिद्ध वारली चित्रकलेने सजवल्या आहेत. गडद लाल रंगात साकारलेल्या या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केलेली कोरोना विषाणूवरील संभाव्य लस दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांसाठी पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली आहे. चाचण्या आजपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या 1,65,921 सक्रिय रुग्ण आहेत, तर 12,300 रुग्णांना मंगळवारी घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5,14,790 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आतपर्यंत 37,24,911 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
FACT CHECK


* * *
B.Gokhale/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648778)