• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
अल्पसंख्यांक मंत्रालय

कोरोना साथीचा आजार लक्षात घेत मुख्तार अब्बास नक्वी यांनी 30 हून अधिक राज्य वक्फ मंडळांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रमझानच्या पवित्र महिन्यात लॉकडाऊन, कर्फ्यू आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर आणि प्रामाणिकपणे पालन करण्याचे निर्देश केले

Posted On: 16 APR 2020 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2020

 

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे अध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यामतून 30 हून अधिक राज्य वक्फ मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि कोरोना साथीचा आजार लक्षात घेत 24 एप्रिल पासून सुरु होणाऱ्या रमझानच्या पवित्र महिन्यात लॉकडाऊन, कर्फ्यू आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर आणि प्रामाणिकपणे पालन करण्याचे निर्देश केले.

नक्वी यांनी राज्य वक्फ मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, रमजानच्या पवित्र महिन्यात लोकांनी घरी राहूनच नमाज अदा करावी आणि इतर धार्मिक विधी करावेत यासाठी जनजागृती करण्यास सांगितले.   

देशभरातील 7 लाखांहून अधिक नोंदणीकृत मशिदी, इदगाह, इमामवाडा, दर्गा आणि इतर धार्मिक संस्था या राज्य वक्फ मंडळाच्या अखत्यारीखाली येतात हे लक्षात घ्यावे लागेल. केंद्रीय वक्फ परिषद हि भारतीय राज्य वक्फ मंडळाची नियामक संस्था आहे. 

याप्रसंगी नक्वी म्हणाले की, या कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपल्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी काम करणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचारी, सुरक्षा दल, प्रशासकीय अधिकारी, स्वच्छता कामगार यांना आपण सहकार्य केले पाहिजे. विलगीकरण आणि अलगीकरण केंद्र हे कोरोना साथीच्या आजारापासून लोकांच्या, त्यांच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आले अशी जागरुकता निर्माण करून आपण विलगीकरण आणि अलगीकरण केंद्रांबाबत पसरविण्यात येणाऱ्या अफवा आणि खोट्या माहितीला आळा घातला पाहिजे.

नक्वी यांनी सर्व राज्य वक्फ मंडळे आणि धार्मिक व सामाजिक संघटनांना सांगितले कि, खोटी माहिती पसरविण्याच्या उद्देशाने पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्या आणि कारस्थानांपासून आपण सावध राहिले पाहिजे. प्रशासन कोणताही भेदभाव न करता देशातील नागरिकाच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी काम करत आहे. अशा प्रकारच्या अफवा आणि कारस्थान हि कोरोना विरुद्धच्या लढाईला कमकुवत बनविण्यासाठी रचली जात आहेत. कोणत्याही प्रकारची अफवा, खोटी माहिती, कारस्थान यावर मात करून कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे.

नक्वी यांनी राज्य वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांना, लोकं रमजानच्या पवित्र महिन्यात घरात राहूनच त्यांची धार्मिक जबाबदारी पार पाडण्यासोबतच केंद्रीय गृह मंत्रालय, राज्य सरकार आणि केंद्रीय वक्फ परिषदेच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर आणि प्रामाणिकपणे पालन करतील यासाठी सक्रीय आणि प्रभावी भूमिका बजावायला सांगितली आहे.  

नक्वी म्हणाले, कोरोना महामारीचे आव्हान लक्षात घेत देशभरातील देऊळे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च आणि इतर धार्मिक ठिकाणांची सर्व धार्मिक कार्ये बंद करण्यात आली आहेत. त्याप्रमाणेच, देशातील सर्व मशिदी आणि इतर मुस्लीम धार्मिक स्थळांवर मोठ्या संख्येने एकत्रित जमायला बंदी केली आहे. 

नक्वी यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील धर्मिक नेते आणि सर्व धार्मिक व सामाजिक संघटनांनी लोकांना लॉकडाऊन आणि सामजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत रमजानच्या पवित्र महिन्यात घरी राहूनच नामज अदा करण्याचे तसेच इतर धार्मिक विधी करण्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे. जगातील बहुतांश मुस्लीम देशांनी रमझानच्या महिन्यात मशिदी आणि धार्मिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित यायला प्रतिबंध केला आहे.

नक्वी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारांच्या सहकार्याने लोकंच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी प्रभावीपणे काम करत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत लोकांच्या सहकार्याने भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी देखील देशासमोर अजूनही अनेक आव्हाने आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर आणि प्रामाणिकपणे पालन करूनच आपण या कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करू शकतो. 

नक्वी यांनी लोकांना विनंती केली कि त्यांनी रमजानच्‍या पवित्र महिन्यात लॉकडाऊन आणि सामजिक अंतराच्या नियामचे पालन करत घरात राहूनच सर्व धार्मिक विधी करावेत. भारत आणि संपूर्ण जग कोरोनाच्या आजारातून मुक्त होऊ दे अशी आपण प्रार्थना करू या.

व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उत्तर प्रदेश (शिया आणि सुन्नी), आंध्रप्रदेश, बिहार(शिया आणि सुन्नी), दादरा आणि नगर हवेली, हरयाणा, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, आसाम, मणिपूर, राजस्थान, तेलंगणा, दिल्ली, छत्तिसगढ, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र, ओदिशा, पोंडेचरी, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड इत्यादी वक्फ मंडळाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane



(Release ID: 1615004) Visitor Counter : 247


Link mygov.in