56 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) ‘सिनेडब्स’च्या माध्यमातून वाढवणार सुलभता आणि समावेशकता
#IFFIWood, 26 नोव्हेंबर 2025
सर्वांसाठी सिनेमा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी देत, 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (इफ्फी) सिनेडब्स या बहुभाषिक ऑडिओ सपोर्ट ॲपची ओळख करून दिली. या ॲपच्या सहाय्याने प्रेक्षकांना निवडक महोत्सवी चित्रपट आवडत्या भाषेत अनुभवता येणार आहेत. हे नाविन्यपूर्ण पाऊल विविधतेला स्वीकारण्याचे, समावेशकतेला प्रोत्साहन देण्याचे आणि चित्रपट हा सर्वांसाठी समान अनुभव आहे याची खात्री करण्याच्या इफ्फीच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
सिनेडब्स: अडथळ्याविना चित्रपट
सिनेडब्स ॲप चित्रपट पाहणाऱ्यांना चित्रपटगृहांमध्ये त्यांच्या पसंतीच्या भाषेत चित्रपटांचा आनंद घेण्यास सक्षम करते— मग तो चित्रपट कोणत्याही भाषेत प्रदर्शित केला जात असला तरीही. वापरकर्ते सोप्या आणि अखंड प्रक्रियेद्वारे हे करू शकतात:
- ॲप मध्ये आपल्या पसंतीच्या भाषेतील ऑडिओ ट्रॅक डाउनलोड करा.
- पेटंट केलेल्या ऑडिओ-सिंक्रोनायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून ॲपला चित्रपटासह ऑटो-सिंक होऊ द्या
- एक तल्लीन करणारा, वैयक्तिक आणि अडथळा-मुक्त चित्रपट अनुभवा
भाषिक बंधन दूर करून ‘सिनेडब्स’ वेगवेगळ्या प्रदेशातील आणि भाषिक पार्श्वभूमीतील प्रेक्षकांना एकत्र आणते आणि खऱ्या अर्थाने समावेशक वातावरणात चित्रपट साजरा करण्यास अनुमती देते.
सिनेडब्स’चे लाभ
चित्रपटगृह आणि प्रदर्शनांमध्ये, सिनेडब्समुळे बहुभाषिक प्रेक्षकांना एकाच शोसाठी आकर्षित होऊ शकतात. ते भाषा-विशिष्ट शोमध्ये प्रतिसाद वाढवू शकते आणि अधिक कार्यक्षम प्रेक्षागृह संचालन अधिक कार्यक्षम होऊ शकते. अशा प्रकारे, सिनेडब्समुळे प्रेक्षक त्यांच्या पसंतीच्या भाषेत चित्रपट पाहू शकतात, भाषिक मर्यादा ओलांडून जास्तीत जास्त प्रादेशिक आणि जागतिक चित्रपट पाहू शकतात आणि त्यांचा आनंद घेऊ शकतात, तसेच वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या मित्र-परिवारासह चित्रपट अनुभव सामायिक करू शकतात.
इफ्फी 56 मध्ये वर्धित ‘ऑडिओ’ उपलब्धता
सुलभतेच्या ध्येयाला पुढे नेत, इफ्फीने विशेष स्क्रीनिंग सादर केले आहेत ज्यात समाविष्ट आहे:
‘ऑडिओ डिसक्रिप्शन’ (एडी):
दृश्य घटकांचे वर्णनात्मक निवेदन प्रदान केले जाते, ज्यामुळे दृष्टिहीन प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाचा संपूर्ण अनुभव घेता येतो.
क्लोज्ड डिसक्रिप्शन (सीसी):
संवाद, ध्वनी संकेत आणि महत्त्वाच्या ऑडिओ घटकांचे स्क्रीनवरील मजकूर स्वरूपात सादरीकरण, यामुळे कर्ण-बधीर प्रेक्षकांना चित्रपटाचा आनंद घेता येईल.
एडी आणि सीसी यांच्या साह्याने प्रत्येक प्रेक्षक, मग त्यांची इंद्रिय क्षमता काहीही असो - चित्रपटाचा जादुई अनुभव घेऊ शकतात असे अधिक समावेशक वातावरण निर्माण केले आहे.
अधिक समावेशक भविष्याकडे एक पाऊल
सिनेडब्स’च्या समकलनासह आणि वर्धित वैशिष्ट्यांच्या एकत्रीकरणासह, 56 वा इफ्फी जागतिक चित्रपट महोत्सवांच्या समावेशकतेच्या क्षेत्रात नवीन मानके निर्माण करत आहे. हा उपक्रम इफ्फी’ची अशी वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करतो की, जिथे भाषा आणि उपलब्धता हे अडथळे न राहता प्रेक्षकांना एकत्र आणणारे सेतू ठरतात, असा एक चित्रपटविश्व तयार करण्याचा त्यांचा ध्यास आहे.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, Click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2195033
| Visitor Counter:
4