PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 11 MAY 2021 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 11 मे 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटे शेरिंग यांच्यात आज दूरध्वनीवरून संभाषण झाले.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिक तसेच तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या सर्वांचे कौतुक केले आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या 8,900  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 5043 ऑक्सिजन सिलिंडर्स,18 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र, 5,698 व्हेंटिलेटर्स/बीआय पीएपी आणि 3.4 लाखांपेक्षा जास्त रेमडेसीवीर कुप्याचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्वरित पुरवठा करण्यात आला आहे जेणेकरून कोविड विरुद्ध लढाईत त्यांना मदत होईल.सीमाशुल्क विभागाकडून जलद मंजुरी  आणि हवाई आणि रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जागतिक स्तरावरची मदत जलद गतीने पुरवत आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या टप्पा -3 आणखी विस्तारण्यात आल्यामुळे देशभरात देण्यात आलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लसींच्या मात्रांची एकूण संख्या आज 17.27  कोटीच्या पुढे गेली  आहे.

दोन महिन्यांनंतर (61 दिवस) पहिल्यांदाच गेल्या 24  तासांत उपचाराधीन रुग्णसंख्येत 30,016 ने  घट झाली आहे. तसेच, 61 दिवसानंतर,प्रथमच  गेल्या 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार एकूण 25,15,519 सत्रांद्वारे एकूण 17,27,10,066  लसीच्या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये 95,64,242 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा),65,05,744 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,40,54,058 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 78,53,514  आघाडीवरील  कर्मचारी(दुसरी मात्रा),  18-44 वयोगटातील 25,59,339 (पहिली मात्रा ) 45 ते 60 वयोगटातल्या 5,55,10,630 (पहिली मात्रा), आणि 71,95,632 लाभार्थी (दुसरी मात्रा), 60 वर्षावरील 5,38,06,205 लाभार्थी (पहिली मात्रा), 1,56,60,702  (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी  66.7 टक्के  मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.

लसीकरण मोहिमेचा  तिसरा टप्पा सुरु झाल्यापासून  30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24  तासात 18-44  वयोगटातील 5,24,731 लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली . आतापर्यन्त  एकूण 25,59,339 लाभार्थ्यांना  पहिली मात्रा मिळाली आहे. 

गेल्या  24 तासात 25 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या. लसीकरण अभियानाच्या 115 व्या दिवशी (10 मे  2021)  25,03,756  लसीच्या  मात्रा देण्यात आल्या. 10,75,948 लाभार्थींना 18,542 सत्रात पहिली मात्रा  आणि 14,27,808 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,90,27,304 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 82.75 टक्के आहे. गेल्या  24 तासात  3,56,082 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 72.28 %  दहा राज्यांमधील आहेत.

गेल्या 24 तासात 3,29,942  नव्या रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांपैकी  69.88%  रुग्ण,  दहा राज्यांमध्ये आहेत.

कर्नाटकात 39,305 इतक्या  सर्वात जास्त  नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात 37,236  तर  तामिळनाडूमध्ये 28,978 नव्या रुग्णांची नोंद झाली

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या  37,15,221 पर्यंत खाली घसरली आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या16.16 % आहे.

दोन महिन्यांनंतर (61 दिवस) प्रथमच गेल्या 24 तासांत एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येत 30,016  ने घट झाली आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 82.68 टक्के  रुग्ण तेरा राज्यांमध्ये आहेत.

राष्ट्रीय मृत्यू दर सध्या 1.09  टक्के आहे. गेल्या 24 तासात 3,876 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी 73.09 टक्के  मृत्यू दहा राज्यातले  आहेत. कर्नाटकात सर्वाधिक 596 मृत्यू झाले असून महाराष्ट्रात 549 जणांचा मृत्यू झाला आहे.

इतर अपडेट्स :

  • कोविड-19 च्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मिळवलेल्या यशाबद्दल, आरोग्य मंत्रालयाने पुण्यातील आणि मुंबईतील  यंत्रणांचे कौतुक केले. संसर्गाचे प्रमाण कसे नियंत्रणात आणता येईल, यासाठी या उपाययोजना आदर्श उदाहरण ठरल्या आहेत.
  • लसीकरण हा केंद्र सरकारच्या महामारी नियंत्रण आणि व्यवस्थापन (चाचणी, शोध , उपचार आणि कोविड सुसंगत वर्तन यांचा  समावेश) या पाच सूत्री धोरणाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. केंद्र सरकार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लस विनामूल्य देऊन देशव्यापी लसीकरण मोहिमेला पाठिंबा देत आहे.
  • केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि कोविड-19 संसर्गाशी लढण्यासाठीचे तंत्रज्ञान तसेच माहिती व्यवस्थापन यासाठी नेमण्यात आलेल्या सक्षम गटाचे अध्यक्ष आणि लसीकरण विषयक राष्ट्रीय तज्ञ गटाचे सदस्य डॉ.आर.एस.शर्मा यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध राज्यांचे आरोग्य सचिव आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संवाद साधून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
  • देशात कोरोना संसर्गातल्या अभूतपूर्व वाढीचा सामना करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी जगभरातील विविध देश तसेच संस्थांकडून 27 एप्रिल 2021 पासून कोविड -19 आजारावरील उपचारात सहाय्यक ठरणाऱ्या वैद्यकीय सामुग्री आणि उपकरणे स्वरुपात भारताला आंतरराष्ट्रीय देणग्या आणि मदत प्राप्त होत आहे.
  • सर्व अडचणींवर मात करत आणि नवे तोडगे शोधून काढत, देशातील अनेक राज्यांमध्ये द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करीत भारतीय रेल्वेचे मदतकार्य अविरत सुरु आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने 375 पेक्षा अधिक टँकर्सद्वारे विविध राज्यांना जवळपास 5735 मेट्रिक टन प्राणवायू पोहोचविला आहे.
  • सध्या 650 मेट्रिक टन क्षमतेचे 12 टँकर्स व 20 आयएसओ कंटेनर्स या कामी लागले आहेत. महिना अखेरपर्यंत ही परिस्थिती सुधारुन 2314 मेट्रीक टन क्षमतेचे 26 टँकर्स व 117 आयएसओ कंटेनर्स उपलब्ध होतील, तर 1940 मेट्रिक टन क्षमतेचे 95 आयएसओ कंटेनर्स खरेदी करण्यात येणार आहेत.
  • केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना ग्रामीण भारतात कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याबाबत पत्र लिहिले आहे. कोविड 19 चा सामना करण्यासाठी मंत्रालयाने आपल्या पत्राद्वारे राज्यांना हे आव्हान पेलण्यासाठी आणि नेतृत्व प्रदान करण्यासाठी पंचायत/ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना संवेदनशील आणि सचेत करण्याची सूचना केली आहे.
  • केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री, स्मृती झुबिन इराणी यांनी असे म्हटले आहे की, देशभरातील सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांची तज्ज्ञांकडून काळजी घेण्याच्या उद्देशाने, महिला आणि बाल विकास मंत्रालय इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचे सहकार्य घेत आहे.
  • कोविड संकटाच्या आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याच्या उत्तम पध्दतीबाबत चर्चा करण्यासाठी 10 मे 2021 रोजी झालेल्या बैठकीत विविध विषयांवरील तज्ज्ञ एका सामायिक आभासी मंचावर एकत्र आले.
  • राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ या भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील दोन सार्वजनिक सेवा उपक्रमांनी त्यांच्या संयुक्त CSRम्हणजेच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेचा भाग म्हणून दुसऱ्या कोविड लाटेत कोविडबाधित रुग्ण व गरजूंच्या मदतीसाठी खालील कामे हाती घेतली आहेत.

महाराष्ट्र अपडेट्स :-

म्युकोरमायकॉसिसच्या रुग्णांवर राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअन्तर्गत विनामूल्य उपचार केले जातील, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषित केले आहे. कोविड-19 मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकोरमायकॉसिसचा संसर्ग होण्याचे तसेच त्यामुळे अंधत्व किंवा तीव्र आजारपण वा क्वचित मृत्यू येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे व महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.

सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 40,000 पेक्षा कमी (37,236) नवीन रुग्ण आढळले तर याशी संबंधित रोगांमुळे 549 जणांचा मृत्यू ओढवला. यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 51,38,973 आणि मृत्यूंची संख्या 76,398 झाली आहे.

गोवा अपडेट्‌स:-

गोव्यातील कोरोना-मृत्युदर कमी करण्यासाठी, 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व व्यक्तींना, कोरोना संसर्ग झालेला असो/नसो, आयव्हरमेक्टिन हे औषध दिले जाणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी जाहीर केले. जीएमसी मधील प्राणवायूच्या कमतरतेमुळे अनेक मृत्यू होत असल्याच्या वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जीएमसी  रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कोविड रुग्णांवर उपचार करताना दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजनेचे कार्ड नाकारल्यास कारवाईचा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खासगी रुग्णालयांना दिला. 'या योजनेअन्तर्गत विनामूल्य मिळणारे उपचार खासगी रुग्णालये नाकारू शकत नाहीत', असे सांगून, तशी तक्रार आल्यास कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. गोव्याच्या सीमेच्या आत प्रवेश करताना, 72 तास आधीचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नसल्यास गोव्याच्या रहिवाश्यांसह कोणत्याही व्यक्तीला, गोव्यात येण्यास बंदी घातली जाईल- असे आश्वासन गोवा सरकारने उच्च न्यायालयात आज दिले.

ST/MC/PM

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1717797) Visitor Counter : 152