महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला आणि बालविकास मंत्रालयाने, शासकीय बालसंगोपन संस्थांतील बालकांची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचे घेतले सहकार्य
Posted On:
11 MAY 2021 6:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2021
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री, स्मृती झुबिन इराणी यांनी असे म्हटले आहे की, देशभरातील सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांची तज्ज्ञांकडून काळजी घेण्याच्या उद्देशाने, महिला आणि बाल विकास मंत्रालय इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचे सहकार्य घेत आहे. आपल्या ट्वीटर संदेशात त्यांनी अशी माहिती दिली की, “बाल संरक्षण सेवा योजनेंतर्गत मुलांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त ही सेवा देण्यात येईल”.
महिला बालकल्याण मंत्री यांनी पुढे आपल्या ट्वीटमधे असे म्हटले की, “देशातील दूरदूरच्या कानाकोपऱ्यातील संस्थांमधून काळजी घेणारे सेवक/बाल संरक्षण अधिकारी आठवड्यातून 6 दिवस दररोज दुपारी या बालरोगतज्ञांकडून टेलिमेडिसिन सेवेचा लाभ घेऊ शकतील. या सेवेचा लाभ 2000 हून अधिक सीसीआयमधील हजारो मुलांना होईल.
आपल्या दुसऱ्या ट्विटर संदेशात इराणी यांनी असे नमूद केले आहे की, “असुरक्षित मुलांना सेवा देण्यासाठी, 30000 सदस्यांच्या इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) च्या मजबूत जाळ्यामधून तज्ञांची समिती मध्यवर्ती, विभागीय, राज्य आणि शहर पातळीवर तयार (नियुक्त) केली जात आहे. प्रत्येक शासकीय / अनुदानित सीसीआयकडे आयएपीने, नियुक्त केलेला तज्ज्ञ असला पाहिजे."
भारतीय बालरोगशास्त्र अकादमी आणि त्याचे सदस्य यांनी असुरक्षित मुलांसाठी त्यांची सेवा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत, महिला आणि बालकल्याण मंत्री यांनी असे ट्वीट केले आहे की ," या वैद्यकीय तज्ञांची वचनबद्धता आणि भारत सरकारच्या दृढ प्रयत्नांमुळे उत्तम वैद्यकीय सल्ला केवळ एका फोनद्वारे शासकीय बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांना मिळेल. ”
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717740)
Visitor Counter : 229