PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
15 OCT 2020 7:25PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 15 ऑक्टोबर 2020


(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याशी आज (15 ऑक्टोबर 2020) तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती महामहिम गुरबंगुली बेर्डीमुहमोदोव यांनी दूरध्वनी संवाद साधला. व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात अस्तित्त्वात असलेल्या अफाट क्षमतेबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली आणि औषधनिर्माण क्षेत्रातील भारतीय आणि तुर्कमेन कंपन्यांच्या संयुक्त सहकार्याच्या यशाची दखल घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 वरील संशोधन आणि लसीचा पुरवठा करण्यासाठी परिसंस्था, चाचणी तंत्र, संपर्क मागोवा, औषधे आणि उपचार यासंदर्भात आढावा बैठक घेतली. पंतप्रधानांनी कोविड-19 आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारतीय लस विकासक आणि उत्पादकांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि अशा सर्व प्रयत्नांना सरकारी सुविधा आणि पाठिंबा असाच सुरु राहिल, अशी कटीबद्धता व्यक्त केली.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारतात कोविड रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे तर कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत सुधारणा झाली असून हा कालावधी आता 73 दिवस (72.8 दिवस) इतका झाला आहे. यावरून दररोजच्या नवीन रुग्णांमध्ये घसरण होत असल्याचे स्पष्ट होते आणि परिणामी रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ होत आहे.
ऑगस्ट महिन्यात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 25.5 दिवस होता, तो आता सुमारे 73 दिवस झाला आहे. केंद्र सरकारच्या चाचणी, तत्पर आणि प्रभावी सर्वेक्षण आणि शोध, तात्काळ रुग्णालयीन उपचार हे धोरण आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी याला केलेले सहकार्य यामुळे ही सुधारणा दिसून येत आहे. तसेच डॉक्टर्स, पॅरामेडिक्स, आरोग्य कर्मचारी आणि सर्व कोविड योद्धे यांच्या नि:स्वार्थी सेवेमुळे हे शक्य झाले आहे. कोविड योग्य वर्तनाचा अवलंब करण्याबाबत देशभरात वाढणारी जागरूकता संसर्गाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आणि वेळेवर उपचार घेण्यास मदत करत आहे. गेल्या 24 तासात 81,514 नवीन रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 64 लाख (63,83,441) इतकी झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणामुळे रुग्ण बरे होण्याच्या राष्ट्रीय दरात सुधारणा होत आहे. ह्या दराने आता 87 टक्क्यांचा टप्पा पार केला असून तो आता 87.36 टक्के इतका झाला आहे.
नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 79 टक्के रुग्ण 10 राज्य/केंद्रशासितील आहेत. फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 19,000 कोविडबाधित रोगमुक्त झाले आहेत. त्याखालोखाल कर्नाटकात 8000 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 11.12% सक्रिय प्रकरणे आहेत. ही संख्या 8,12,390 इतकी आहे.
देशात गेल्या 24 तासात 67,708 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 77 टक्के नवीन रुग्ण 10 राज्य/केंद्रप्रदेशातील आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 10,000 पेक्षा जास्त बाधित नोंदले गेले, त्याखालोखाल कर्नाटक राज्यात 9,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत 680 कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 12 दिवसांपासून मृत्यू संख्या 1000 पेक्षा कमी आहे. त्यापैकी सुमारे 80 टक्के रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. यापैकी 23 टक्क्याहून जास्त म्हणजे 158 रुग्णांचे मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.
'ईट राईट इंडिया' चळवळीचे ‘व्हिजन 2050’ साध्य करण्यासाठी ‘सर्वसमावेशक सरकार’ दृष्टिकोन तयार करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज एफएसएसएआय आणि विविध मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आंतर-मंत्रिस्तरीय बैठक पार पडली. ‘ईट राइट इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ चळवळ देशाच्या आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला.
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
‘मिशन बिगेन अगेन’ चा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने आज ग्रंथालये, संशोधन किंवा प्रयोगशाळेची कामे आवश्यक असलेल्या उच्च शिक्षण संस्था, मेट्रो रेल सर्व्हिसेस, व्यवसाय प्रदर्शन आणि आठवडी बाजार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, या सर्व उपक्रमांना गुरुवारपासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व ठिकाणी उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे.


S.Thakur/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664880)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam