रसायन आणि खते मंत्रालय

भारत हा संपूर्ण जगातील जनौषधींच्या सर्वात मोठ्या उत्पादक आणि निर्यातदार देशांपैकी एक : केंद्रीय मंत्री डी व्ही सदानंद गौडा


भारतातील रसायने आणि खते उद्योगाची बाजारात सुमारे 165अब्ज डॉलर्सची उलाढाल, 2025 सालापर्यंत ही उलाढाल 300 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा

Posted On: 15 OCT 2020 2:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020

जागतिक स्तरावर भारत हा जनौषधींच्या सर्वात मोठ्या उत्पादक आणि निर्यातदार देशांपैकी एक देश आहे असे केंद्रीय रसायने आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी सांगितले. फिक्कीने बुधवारी रात्री आयोजित केलेल्या लीड्स 2020 या कार्यक्रमातील लॅटिन अमेरिकी आणि कॅरिबियन देशांच्या प्रतिनिधींसोबत आभासी पद्धतीने घेतलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.  कोरोना आपत्तीच्या सुरुवातीच्या काळात, एचसीक्यू आणि अझिथ्रोमायसिन ही औषधे गंभीर अवस्थेतील कोविड-19 बाधितांसाठीच्या उपचारपद्धतीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती, त्या काळात जगातील 120 देशांना या औषधांचा पुरवठा करून भारताने औषधांचा विश्वसनीय पुरवठादार देश म्हणून लौकिक प्राप्त केला, या मुद्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मंजुरी दिलेल्या आणि अमेरिकेबाहेर स्थापन झालेल्या सर्वात जास्त (262 पेक्षा जास्त)औषध कंपन्या असलेला भारत हा एकमेव देश आहे आणि अमेरिका तसेच युरोपसारख्या उच्च दर्जाची मानके अनिवार्य असणाऱ्या देशांसह जगातील अनेक देशांना भारत 20 अब्ज डॉलर्स किमतीच्या औषधांची निर्यात करीत आहे अशी माहिती त्यांनी दिली. भारतीय औषध क्षेत्र येत्या 2024 सालापर्यंत 65 अब्ज डॉलर्सपर्यंत विकसित होईल असे ते म्हणाले. सरकारने नुकतीच देशभरात औषधक्षेत्राशी संबंधित 7 प्रकल्पांची सुरुवात केली आहे, यापैकी, तीन घाऊक प्रमाणावर औषधनिर्मिती करणारे प्रकल्प आहेत तर वैद्यकीय साधनांची निर्मिती करणारे 4 प्रकल्प आहेत. नवीन औषध उत्पादक उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेला पात्र असतील आणि या योजनेतून त्यांच्या पहिल्या 5-6 वर्षांच्या विक्रीवर आधारित आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल असे त्यांनी सांगितले.

भारताच्या औषध निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करणे आणि उत्पादन क्षेत्रात नवीन उद्योग सुरु करणे यासाठी सध्याचा काळ अत्यंत उत्तम असून सहकारी तत्वावरील प्रकल्पांची देखील उत्तम सुरुवात होऊ शकते असे ते म्हणाले. या क्षेत्रात गुंतवणूक आणि उद्योग स्थापन करण्यास उत्सुक असणाऱ्यांना सरकारकडून शक्य असलेली सर्व मदत आणि सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भारतातील रसायने आणि खते उद्योगाची सध्याची उलाढाल सुमारे 165 अब्ज डॉलर्सची असून, 2025 सालापर्यंत ही उलाढाल 300 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळे भारतातील रसायने क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत असे ते म्हणाले. केंद्र सरकार रसायने आणि खते उद्योग क्षेत्राच्या धोरणांचा नव्याने अभ्यास करीत असून परदेशी गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने औषध क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रात देखील आर्थिक प्रोत्साहन योजनेचा विस्तार करण्याचा सरकारचा विचार आहे, असे ते म्हणाले. या सर्व सुधारणांद्वारे, भारतीय रसायने आणि खते क्षेत्रामध्ये व्यापार करण्यासाठी उत्तम वातावरण निर्माण करणारी धोरणे सरकार आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतातील खतनिर्मिती उद्योग देखील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असून देशातील शेतकऱ्यांकडून दर वर्षी खतांना मोठी मागणी असते, असे त्यांनी सांगितले. लॅटिन अमेरिकी आणि कॅरिबियन देशदेखील खतांचे मोठे आयातदार आहेत, अशावेळी स्पर्धक खरेदीदार म्हणून बाजारात उभे राहण्याऐवजी सहकारी तत्वावर पुरवठा साखळ्या निर्माण केल्या तर वाजवी दरात अत्यंत परिणामकारक पद्धतीने तसेच पुरेशा प्रमाणात सर्वांनाच खतांचा पुरवठा होईल असे मत डी व्ही सदानंद गौडा यांनी व्यक्त केले.   

 

U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1664721) Visitor Counter : 622