PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
09 OCT 2020 8:05PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दिल्ली-मुंबई, 9 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील इन्व्हेस्ट इंडिया परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बीजभाषण केले. पंतप्रधान म्हणाले, भारत निर्विवादपणे एकमेव देश आहे, ज्यात गुंतवणूकीसाठीचे सर्व निकष जसे राजकीय स्थैर्य, गुंतवणूक आणि उद्योग स्नेही धोरणे, शासकीय पारदर्शकता, कुशल मनुष्यबळ आणि मोठी बाजारपेठ आहे. ते म्हणाले, संस्थात्मक गुंतवणूकदार, उत्पादक, नवकल्पनांचे पाठिराखे आणि पायाभूत सुविधा कंपन्यांसह सर्वांना संधी आहे.
ग्रामीण भारतातील जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवून लाखो भारतीय नागरिकांना सक्षम करण्यासाठी हाती घेतलेल्या ऐतिहासिक उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात स्वामित्व योजनेद्वारे मालमत्ता पत्रांचे प्रत्यक्ष वाटप सुरु करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सकाळी 11 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान सुमारे एक लाख मालमत्ता धारकांच्या मोबाईल फोनमध्ये पाठविलेल्या एसएमएस लिंकच्या सहाय्याने त्यांना मालमत्ता पत्रे डाऊनलोड करणे शक्य होणार आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारतामध्ये सक्रीय कोविड बाधितांची संख्या सातत्याने कमी होण्याचा कल कायम राहिलेला दिसत आहे. एका महिन्यानंतर प्रथमच 9 लाखापेक्षा कमी सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आज 8.93 लाख सक्रीय रुग्ण आहेत तर काल ही संख्या 8.97 लाख इतकी होती. आजमितीला देशातील एकूण सक्रीय कोविड बाधितांची संख्या 8,93,592 इतकी असून एकूण रुग्णसंख्येच्या ती फक्त 12.94% आहे.
सक्रीय कोविड बाधितांच्या दरात सातत्याने घसरण नोंदली जात आहे आणि त्याच प्रमाणात रोगमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. देशात कोविड संसर्गातून रोगमुक्त झालेले एकूण 59,06,069 लोक आहेत. सध्या देशातील बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्या एकूणसंख्येतील तफावतीने 50 लाखाचा आकडा पार केला आहे. सध्या ही तफावत 50,12,477 इतकी आहे. मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असून ही तफावत सतत वाढताना दिसत आहे.
अधिकाधिक कोविड रुग्ण रोगमुक्त होत असल्यामुळे राष्ट्रीय रोगमुक्तता दर वाढून आता 85.52% झाला आहे.गेल्या चोवीस तासांत रोगमुक्त झालेल्या 78,365 जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले असून, या कालावधीत 70,496 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली आहे.
देशात नव्याने रोगमुक्त झालेल्यांची संख्या नव्या बाधित रुग्णांपेक्षा जास्त असण्याचा कल सलग तिसऱ्या आठवड्यात कायम राहिला आहे.
सार्वत्रिक तपासणी, बाधितांचा शोध, त्वरित रुग्णालयामध्ये उपचाराची सुरुवात तसेच प्रमाणित उपचारपद्धतीचा अवलंब यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये तसेच घरी उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना एकच विशिष्ट आरोग्य सेवा खात्रीलायकपणे उपलब्ध करून देणे या केंद्रसरकारने आखून दिलेल्या मार्गाचा अवलंब करीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे.
नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 75 टक्के रुग्ण देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामीळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि मध्यप्रदेश या 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
देशभरात महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे जिथे एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 15,000 कोविडबाधित रोगमुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासांत 70,496 नव्या कोविडबाधितांची नोंद झाली आहे.
नव्याने बाधित रुग्णांपैकी 78 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली असून या कालावधीत 13,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली, त्याखालोखाल कर्नाटक राज्यात 10,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत 964 कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यापैकी सुमारे 82 टक्के रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासितप्रदेशांमध्ये एकवटले आहेत.
मृत्युमुखी पडलेल्या एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रात 37 टक्क्याहून जास्त म्हणजे 358 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
बगीचे आणि तत्सम मनोरंजनाच्या ठिकाणी आराम करण्यासाठी आणि मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होते. अशा परिस्थितीत कोविड-19 संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बगीचे आणि मनोरंजनाच्या इतरठिकाणी घ्यायच्या सावधगिरीच्या उपाययोजनांची प्रमाणित कार्य पद्धती जारी केली आहे.
इतर अपडेट्स:
- निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांच्या नोंदणीसाठी सार्वजनिक सूचना कार्यकालामध्ये सवलत : सध्या कोविड-19 महामारीचा उद्रेक सर्वत्र आहे, अशा वेळी सर्वांनाच राजकीय पक्षाच्या सार्वजनिक सूचनेसाठी आवश्यक कार्यवाहीची पूर्तता करणे आणि नोंदणी करणे शक्य होणार नाही. यासंबंधीच्या सर्व पैलूंचा विचार करून, निवडणूक आयोगाने पक्षाच्या सार्वजनिक सूचनेचा कार्यकाळ 30 दिवस न ठेवता तो कमी करून सात दिवसांचा केला आहे.
- केंद्र सरकारने 6 मे 2020 पासून विविध देशांमध्ये कोरोना काळात अडकलेल्या 20 लाख पेक्षा अधिक भारतीय नागरिकांना विविध मार्गांनी मायदेशी परत आणणे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वंदे भारत अभियानाअंतर्गत, 17,11,128 प्रवासी भारतात परत आले आणि 2,97,536 प्रवासी भारताबाहेर गेले, अशी माहिती त्यांनी दिली.
- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी “मानसिक आरोग्य:कोविड 19च्या पल्याड दृष्टीकोन” यावरील व्हर्चुअल आंतरराष्ट्रीय परिषदेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन केले. ऑस्ट्रेलिया-भारत इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रोफेसर क्रेग जेफ्री हे परिषदेचे सहअध्यक्ष होते.
- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत) 3951 किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. कोविड -19 महामारीच्या संकट काळातही दिवसाकाठी 21.60 किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम करण्याचा दर साध्य केला आहे. मंत्रालयाने या आर्थिक वर्षात 11,000 किमी लांबीच्या रस्ते बांधकामाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
बृहन्मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम) आणि गुगल यांनी एकत्र येऊन गुगल मॅप वर मुंबई शहरातील कंटेनमेंट झोन चिन्हांकित करण्यासाठी सहकार्य केले आहे. गुगल मॅपवर या माहितीची उपलब्धता मुंबईकरांना फक्त एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुलभ होईल. कोविड-19 च्या जनजागृती मोहिमेला लोक चळवळीचे रूप प्राप्त झाले असून, काळी आणि पिवळी टॅक्सी चालविणारे चालक या चळवळीचा भाग बनले आहेत. कोविड-19 संसर्गाला आळा घालण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे याविषयी माहिती लोकांना देण्यासाठीची पत्रके टॅक्सींवर लावण्यात आली आहेत.
FACT CHECK



* * *
M.Chopade/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663229)
Visitor Counter : 265