पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचे कॅनडातील इन्व्हेस्ट इंडिया परिषदेत बीजभाषण


भारतात गुंतवणूकीसाठी सर्वाधिक अनुकूल वातावरण- पंतप्रधान

भारतात राजकीय स्थैर्य, गुंतवणूक स्नेही धोरणे, पारदर्शकता, कुशल मनुष्यबळ- पंतप्रधान

भारताची कथा आज आणि भविष्यातही सशक्त-पंतप्रधान

कृषी, श्रम आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांमुळे गुंतवणूकीच्या अपार संधी-पंतप्रधान

भारतीय मानसिकतेत आणि बाजारपेठेत वेगाने बदल होत आहे-पंतप्रधान

Posted On: 08 OCT 2020 10:04PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडातील इन्व्हेस्ट इंडिया परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बीजभाषण केले. 

पंतप्रधान म्हणाले, भारत निर्विवादपणे एकमेव देश आहे, ज्यात गुंतवणूकीसाठीचे सर्व निकष जसे राजकीय स्थैर्य, गुंतवणूक आणि उद्योग स्नेही धोरणे, शासकीय पारदर्शकता, कुशल मनुष्यबळ आणि मोठी बाजारपेठ आहे. ते म्हणाले, संस्थात्मक गुंतवणूकदार, उत्पादक, नवकल्पनांचे पाठिराखे आणि पायाभूत सुविधा कंपन्यांनासह सर्वांना संधी आहे.

पंतप्रधान म्हणाले, कोविड-नंतरच्या जागतिक परिस्थितीत, भारताने दृढनिश्चयाने उत्पादन, पुरवठा साखळी अशा विविध समस्यांवर मात केली आहे. ते म्हणाले, व्यवस्थित साधनांशिवाय 400 दशलक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम थेट जमा केली, गरीब आणि गरजूंना काही दिवसांतच मदत केली. संक्रमण परिस्थितीमुळे होणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी सरकारने घेतलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली आणि भर देऊन सांगितले की, गेल्या काही वर्षांतील कारभाराची आणि उभारलेल्या यंत्रणेची ताकद यातून दिसून येते.

पंतप्रधान म्हणाले, जेंव्हा देश कडक टाळेबंदीत होता, त्यावेळी भारताने 150 देशांना औषधं पुरवली आणि जागतिक फार्मसीची भूमिका निभावली. ते म्हणाले, यावर्षी मार्च-जून दरम्यान, कृषी निर्यातीत 23% वाढ झाली आहे. संक्रमण परिस्थितीपूर्वी, भारतात पीपीई कीटचे उत्पादन फार कमी होते पण आज भारत प्रत्येक महिन्याला कोट्यवधी पीपीई कीटचे उत्पादन करतो आणि निर्यातही करतो. त्यांनी कोविड-19 लसीची उत्पादन वाढ आणि संपूर्ण जगाला मदत करण्याची कटीबद्धता व्यक्त केली.

पंतप्रधानांनी व्यवसायस्नेही वातावरण निर्माण करण्याच्या सरकारच्या पुढाकारांची यादी सांगितली आणि भारतीय गाथा आणखी मजबूत कशी होत गेली हे स्पष्ट करुन सांगितले. त्यांनी एफडीआय प्रणाली, सार्वभौम संपत्ती आणि पेन्शन फंडसाठी सुलभ कर प्रणाली, बाँड बाजारात व्यापक सुधारणा, चॅम्पिअन उद्योगांसाठीच्या प्रोत्साहन योजना याविषयी माहिती दिली. औषधनिर्माण क्षेत्र, वैद्यकीय उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रांविषयीच्या योजना लवकरच लागू होतील. त्यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांकडे लक्ष पुरवण्यासाठी आणि प्रभावीपणे हाताळणी करण्यासाठी सचिवांच्या सक्षम गटाची स्थापना केली आहे. विमानतळ, रेल्वे, महामार्ग, ऊर्जा पारेषण यासारख्या क्षेत्रातील मालमत्तांतून सक्रिय कमाई करण्यावर भर दिला. ते म्हणाले, रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट ट्रस्ट सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांतून कमाईसाठी पूर्णपणे सक्षम आहेत.

पंतप्रधान म्हणाले सध्या भारतीय मानसिकतेत आणि बाजारपेठेत वेगाने परिवर्तन घडून येत आहे. कंपनी अधिनियमांतर्गत अनेक गुन्ह्यांचे विनिमयन आणि गैर-गुन्हेगारीकरण केले आहे. ते म्हणाले, भारत जागतिक गुंतवणूक निर्देशांकात 81 व्या स्थानाहून 48 व्या स्थानी पोहोचला आहे आणि जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशांकात गेल्या 5 वर्षांत 142 व्या स्थानावरुन 63 व्या स्थानी पोहोचला आहे.

पंतप्रधान म्हणाले, या सुधारणांमुळे भारतात संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून जानेवारी 2019 ते जुलै 2020 दरम्यान 70 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी गुंतवणूक आली आहे. 2013 ते 2017 या चार वर्षांदरम्यानच्या गुंतवणूकीएवढी ही गुंतवणूक आहे. जागतिक गुंतवणूकदार समुदायाच्या सातत्यपूर्ण विश्वासामुळे 2019 मध्ये भारताच्या थेट परकीय गुंतवणूकीत 20% वाढ झाली आहे, त्याचवेळी जागतिक गुंतवणूक 1% ने खाली आली.

पंतप्रधान म्हणाले, चालू वर्षात जगात सगळीकडे कोविड-19 संक्रमण परिस्थिती शिखरावर असताना गेल्या सहा महिन्यांत भारतात 20 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. त्यांनी सांगितले भारताने कोविड-19 संक्रमण परिस्थितीत भारताने अनोखा दृष्टीकोन स्वीकारला आहे. ते म्हणाले की गरीब आणि लघु उद्योगांना दिलासा व प्रोत्साहन पॅकेजेस देण्यात आली आहेत आणि त्याचबरोबर संरचनात्मक सुधारणेची ही संधी असून यामुळे अधिक उत्पादनक्षमता आणि समृद्धी सुनिश्चित होईल.

पंतप्रधान म्हणाले, शिक्षण, कामगार आणि कृषी क्षेत्रात भारताने त्रिसूत्री स्वीकारली आहे. एकत्रितरित्या, याचा जवळजवळ प्रत्येक भारतीयावर परिणाम होतो. ते म्हणाले, भारताने कामगार आणि कृषी क्षेत्रात जुन्या कायद्यांमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत. या सुधारणांमुळे सरकारच्या संरक्षित जाळ्याला बळकटी देताना खासगी क्षेत्रातील अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करतात आणि उद्योजक तसेच आमच्या कष्टकरी वर्गासाठी समान अशी परिस्थिती निर्माण करतात. ते म्हणाले शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांमुळे युवकांच्या प्रतिभेत आणखी वृद्धी होईल आणि अधिक परदेशी विद्यापीठांना भारतात येण्याची संधी मिळेल.

पंतप्रधान म्हणाले, कामगार कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे कामगार संहितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि या संहिता कामगार आणि मालक दोघांनाही अनुकूल आहेत तसेच यामुळे व्यवसायसुलभता वाढेल. कृषी क्षेत्रातील सुधारणा दूरगामी आहेत आणि केवळ शेतकऱ्यांसमोर अधिक पर्याय उपलब्ध असणार नाहीत तर निर्यातीलाही चालना मिळेल, असे ते म्हणाले. या प्रयत्नांमुळे आत्मनिर्भर भारत किंवा स्वावलंबी भारताच्या प्रयत्नांना चालना मिळेल, आम्ही जागतिक कल्याण आणि भरभराटीमध्ये योगदान देऊ इच्छितो. शिक्षण क्षेत्रामध्ये भागीदारी, उत्पादन किंवा सेवांमध्ये गुंतवणूक करणे आणि कृषी क्षेत्रात सहयोग करणे यासाठी भारत हे भागीदारीसाठीचे स्थान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान म्हणाले भारत-कॅनडा द्वीपक्षीय संबंध लोकशाही मुल्ये आणि अनेक समान हितांवर आधारीत आहेत. ते म्हणाले की आपले व्यापार आणि गुंतवणूकीतील संबंध बहुआयामी आहेत. कॅनडामध्ये काही सर्वात मोठे आणि अनुभवी पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूकदार आहेत, हे त्यांनी अधोरेखीत केले. ते म्हणाले की कॅनेडियन पेन्शन फंडांनीच भारतात थेट गुंतवणूकीस सुरुवात केली. यापैकी अनेकांना महामार्ग, विमानतळ, लॉजीस्टीक्स, दूरसंचार आणि रिअल इस्टेट क्षेत्रात अनेक संधी मिळाल्या आहेत. ते म्हणाले की बरीच वर्षे भारतात असलेले कॅनेडियन गुंतवणूकदार आता आमचे सर्वोत्कृष्ट ब्रँड अँबेसेडर होऊ शकतात. त्यांचा अनुभव, विस्तार आणि भांडवल गुंतवण्याची त्यांची योजना इतर कॅनेडियन गुंतवणूकदारांसाठी देखील येथे येण्याचा सर्वात विश्वासार्ह पुरावा असू शकते. कॅनेडियन गुंतवणूकदारांना भारतात कसलाही अडथळा येणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.   

***

B.Gokhale /S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1662896) Visitor Counter : 229