नागरी उड्डाण मंत्रालय

6 मे 2020 पासून 20 लाख पेक्षा अधिक लोकांना मायदेशी परत आणणे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली- हरदीप सिंग पुरी

Posted On: 08 OCT 2020 8:23PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारने 6 मे 2020 पासून विविध देशांमध्ये कोरोना काळात अडकलेल्या 20 लाख पेक्षा अधिक भारतीय नागरिकांना विविध मार्गांनी  मायदेशी परत आणणे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वंदे भारत अभियानाअंतर्गत, 17,11,128 प्रवासी भारतात परत आले आणि 2,97,536 प्रवासी भारताबाहेर गेले, अशी माहिती त्यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय प्रवासाविषयी माहिती देतांना त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने 16 देशांसोबत एअर बबल व्यवस्था केली आहे. जेव्हा सामान्य विमान वाहतूक काही कारणाने बंद केली जाते, त्यावेळी दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी हि एअर बबल व्यवस्था  केली जाते. सरकार, इटली, बांगलादेश, कझाकस्तान, युक्रेन आणि इतर काही देशांसोबतही ही व्यवस्था सुरु करण्या विषयी चर्चा करत आहे, अशी महिती त्यांनी दिली.

देशांतर्गत विमानसेवाही 25 मे  2020 पासून टप्प्याटप्याने सुरु करण्यात आली असुन आता ती 60 टक्कयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.  25 मे पासून आतापर्यंत 1.2 कोटी प्रवाशांनी देशांतर्गत विमानप्रवास केला, अशी माहिती त्यांनी दिली.

 

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे उपक्रम

लाईफ लाईन उडान

लाईफलाईन उडान ही सेवा कोविडच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात वस्तू आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आली. या काळात 588 विमानांनी 5 लाख किलोमीटर्स पेक्षा अधिक प्रवास केला आणि 1000 टन मालाची वाहतूक केली. त्याशिवाय 1928 टन वैद्यकीय सामुग्री एअर इंडियाच्या माध्यमातून भारतात आणली गेली आणि 30 टन सामान परदेशात पाठवण्यात आले.

 

उडान- प्रादेशिक हवाई क्षेत्राच्या प्रगतीचे इंजिन

वाजवी दरात देशांतर्गत विमानसेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उडान ही योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 766 हवाई मार्ग सुरु केले जाणार आहेत, सध्या त्यापैकी 105 विमानतळांना जोडणारे 284 पेक्षा अधिक हवाई मार्ग सुरु झाले आहेत. 50 उड्डान विमानतळे गेल्या तीन वर्षात विकसित करण्यात आली आहेत. आतापर्यंत 4.8 दशलक्ष प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. 30 पेक्षा अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी या संदर्भात करार करण्यात आला आहे.  या योजनेत काही छोट्या हवाई कंपन्यांना देखील संधी देण्यात आली आहे. प्रादेशिक मार्गांवर भर देण्यात आला आहे. त्यातही पर्यटन स्थळे, ईशान्य भारत आणि बेटांवर हवाई वाहतूक सुरु करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

 

हवाई क्षेत्रासाठीच्या उपाययोजना :

जानेवारी 2020 मध्ये हवाई इंधनाच्या किंमती तर्कसांगत करण्यात आल्या. हवाई टर्बाईन इंधनवरचा अबकारी कर 11% पर्यंत कमी करण्यात आला. MRO वरच्या वस्तू आणि सेवा करात कपात करण्यात आली असून, ही कपात एक एप्रिल 2020 पासून लागू झाली. याआधी, नागरी विमान वाहतुकीसाठी केवळ 60 टक्के हवाई अवकाश उपलब्ध होता, मात्र आता हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे हवाई कंपन्यांची दरवर्षी 1000कोटी रुपयांची बचत होणार आहे. 

****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1662864) Visitor Counter : 191