PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2020 8:40PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दिल्ली-मुंबई, 7 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चशिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आपले विचार व्यक्त केले.
तीन-चार वर्षांपेक्षा अधिक काळ चर्चा, मंथन आणि लाखो सूचना-हरकतींचा विचार करुन नवे शैक्षणिक धोरण, तयार करण्यात आले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर संपूर्ण देशभरात, अत्यंत सकस वादविवाद आणि चर्चा सुरु आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश, आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांनाही भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करणे, त्याचवेळी राष्ट्रीय मूल्ये आणि उद्दिष्टांवर भर देणे हा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
हे धोरण नव्या भारताचा, पाया रचणारे आहे असे सांगत, पंतप्रधान म्हणाले की एकविसाव्या शतकात भारताला अधिक मजबूत करण्यासाठी, युवकांना जे शिक्षण आणि कौशल्ये आवश्यक आहेत ती देऊन , विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि देशातील नागरीकांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि येणाऱ्या संधींसाठी अधिकाधिक सज्ज करण्यासाठी, म्हणून हे धोरण उपयुक्त ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
कोविड-19 च्या रुग्णांच्या बरे होण्याच्या दरात सतत होणारी वृद्धी आणि जागतिक परिस्थितीच्या तुलनेत भारतातील कमी मृत्यू दर या दोन महत्वपूर्ण कामगिरींसोबत भारत कोविड-19 व्यवस्थापनाच्या मार्गावर आगेकूच करत आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 68% तर मृत्यू दर 2.05% या नवीन पातळीवर पोहचल्याने कोविड-19 रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे सुनिश्चित झाले आहे. या दोन महत्वपूर्ण कामगिरींमुळे भारतात बरे झालेल्या रूग्णांची संख्या आणि सक्रिय रुग्णांमधील फरक (7.7 लाखांहून अधिक) वाढला आहे.
गेल्या 24 तासात कोविड-19 चे 49,769 रुग्ण बरे झाल्याने कोविड-19 च्या बरे झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा 13,78,105 वर पोहोचला आहे.
रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि केंद्राने जारी केलेल्या क्लिनिकल ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट असलेल्या स्टँडर्ड ऑफ केअरच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांवर कार्यक्षम उपचार करण्यावर भर दिला गेला आहे. गेल्या दोन आठवड्यात सरासरी दररोज रुग्ण बरे (7 दिवसांची सरासरी) होण्याच्या संख्येत वाढ होऊन ती 26000 वरून 44000 झाली आहे.
इतर अपडेट्स:
- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आग्नेय आशिया साथीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांच्यासह प्रदेशातील सदस्य देशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत आभासी बैठकीत सामील झाले. या बैठकीत कोविड -19 साथीच्या आजाराच्या संदर्भात आवश्यक आरोग्य सेवा आणि सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम सुरु ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेचे रोडेरिको ओफ्रिन यांनी कोविड-19 कालावधी दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या लॉजिस्टिक सहाय्याची तर सुनील बहल यांनी लस विकास आणि वितरणाच्या धोरणासाठी संघटनेच्या कार्यक्रमाची माहिती दिली. डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी भारताने कोविड-19 व्यवस्थापनासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
- गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी आज पीएम स्वनिधी योजनेसाठी शिफारस पत्राचे मॉड्यूल आज प्रसिद्ध केले. ज्या फेरीवाले विक्रेत्यांकडे ओळखपत्र (आयडी) आणि विक्रेता प्रमाणपत्र नाही (सीओव्ही) नाही आणि या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वेक्षण केलेल्या यादीमध्ये समावेश नाही अशांना सामावून घेण्यासाठी हे मॉड्यूल तयार केले आहे. मॉड्यूलमध्ये डिजिटली सक्षम प्रक्रियेची तरतूद आहे ज्यात पात्र विक्रेता शहरी स्थानिक संस्थेकडे शिफारस पत्रासाठी विनंती करु शकतो आणि ते प्राप्त झाल्यावर पीएम स्वनिधी अंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतो.
- भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने 24 मार्च ते 30 जून 2020 दरम्यान 139 लाख मेट्रीक टन अन्नधान्याची वाहतूक करण्यात आली. सुमारे 5,000 रेक्स आणि सुमारे 14.7 लाख मेट्रीक टन अन्नधान्याची वाहतूक 91,874 ट्रकांच्या माध्यमातून देशभरात केली. अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटाला सुनिश्चित केलेला साठा जहाजांच्या माध्यमातून पोहोचवला. पुरवठा सुरळीत आणि यशस्वीरित्या होण्यासाठी रेल्वेमंत्रालय, नौवहन मंत्रालय आणि भारतीय हवाई दलाची भूमिका महत्त्वाची ठरली. एफसीआय, सीडब्ल्युसी, सीआरडब्ल्युसी, राज्य वखार मंडळ आणि राज्य/ केंद्रशासित प्रदेशांचे नागरी पुरवठा विभाग/महामंडळ यांनी योग्य समन्वयातून हे कार्य यशस्वी केले. लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहचवण्यासाठी देशभरातील 5.4 लाख स्वस्त धान्य दुकानांचा वापर केला. दुकानांमध्ये कोविड-19 संबंधीचे सर्व निकष जसे सामाजिक अंतर, मास्कचा वापर, हात धुण्यासाठी सॅनिटायजर, साबण आणि पाण्याची व्यवस्था, दुकानांच्या विविध वेळा, नियमित निर्जंतुकीकरण, ईपीओएस मशीनचा वापर करण्यात आला.
- केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक कोविड सहकार्यासाठी पाया रचला आहे. ते म्हणाले की, गेल्या सहा वर्षात मोदींच्या असाधारण व्यापक परदेशी संपर्कांमुळे महामारीविरोधात आंतरराष्ट्रीय आघाडी निर्माण करण्यात मोठ्या प्रमाणात मदत झाली. भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार (आयटीईसी), परराष्ट्र मंत्रालय आणि नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स (एनसीजीजी), प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “'कोविड -19 -महामारीच्या काळात सुशासन पद्धती” या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन केल्यांनतर ते बोलत होते.
- आदिवासी व्यवहार मंत्रालयांतर्गत असलेल्या आदिवासी सहकार विपणन विकास मंडळाने (ट्रायफेड) 6 ऑगस्ट 2020 रोजी 33 व्या वर्धापनदिनानिमित्त आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करण्याच्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार केला. उद्योग आणि व्यापाराच्या माध्यमातून आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी स्थैर्याने कार्य करणे, विशेषतः सध्याच्या आव्हानात्मक काळात आदिवासींना रोजगार आणि उपजिविकेच्या संधीमध्ये मदत करण्यासाठीचे प्रयत्न ट्रायफडने दुप्पट केले आहेत.
- केंद्र सरकार कृषी क्षेत्राला उच्च प्राधान्य देते. शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हातभार लावण्यासाठी आणि तरुणांना रोजगार मिळावा यासाठी स्टार्ट अपना प्रोत्साहन दिले जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत घटक, नाविन्यपूर्ण संशोधन आणि कृषी-उद्योजकता विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या द्वारे नवसंशोधन आणि कृषी उद्यमशीलतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी आर्थिक मदत पुरवणे आणि इनक्युबेशन इकोसिस्टमला मदत केली जाणार आहे. हे स्टार्ट-अप कृषी प्रक्रिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल शेती, शेती यांत्रिकीकरण, कचऱ्यापासून संपत्ती, दुग्धव्यवसाय मत्स्यपालनासारख्या विविध क्षेत्रात आहेत.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), सीआयएससीई आणि सीबीएसई या शिक्षण मंडळांच्या सहकार्याने सीआयएससीई शाळांमधील शारीरिक शिक्षण (पीई) देणाऱ्या शिक्षकांना "शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खेलो इंडिया सुदृढता मूल्यमापन ” यावर प्रशिक्षण देण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. 7 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात दोन विभागातील 2615 सीआयएससीई शाळांमधील 7500 सहभागींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सदृढतेच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि तळागाळातील असंख्य प्रतिभावान मुलांमधून भविष्यातील संभाव्य विजेते ओळखण्यासाठी हे व्यापक प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे , शाळा बंद आहेत आणि ऑनलाईन वर्ग किंवा वेबिनरच्या रूपाने नवीन शैक्षणिक सत्र संपूर्ण भारतात सुरू झाले आहे. या सद्य परिस्थितीत, मूळ स्वरुपात प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण (TOTs) आणि शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शारीरिक मूल्यांकन शक्य नाही जोवर मुले व शिक्षक शाळेत जायला सुरुवात करत नाहीत.
महाराष्ट्र अपडेट्स :
मुंबई आणि पुण्यानंतर आता ठाण्यात कोविड रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. ठाण्यात गुरुवारी कोविड ची रुग्णसंख्या 1,00,875 वर पोहचली. राज्यात एकूण रुग्णसंख्या 4.79 लाख इतकी झाली आहे. यापैकी 1.46 लाख सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत गुरुवारी 910 नवीन रुग्णांची नोंद झाली असून शहरातील एकूण रुग्णसंख्या 1,20,150 वर पोहचली आहे. राज्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येतला मुंबईचा वाटा कमी होत चालला आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोविडचे एका दिवसातील सर्वाधिक 11,514 नवीन रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईचा वाटा 8 टक्के राहिला.

* * *
DW/ST/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1644225)
आगंतुक पटल : 243
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam