PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 20 JUL 2020 7:32PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, July 20, 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पंतप्रधानांनी आयबीएमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आम्ही स्वावलंबी भारताच्या दृष्टीने मार्गाक्रमण करत आहोत जेणेकरुन जागतिक स्तरावर सक्षम आणि लवचीक स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊ शकेल असे यावेळी पंतप्रधान म्हणाले. किफायतशीर आणि त्रास-मुक्त अशा एकात्मिक, तंत्रज्ञान व डेटा आधारीत आरोग्य सेवा प्रणालीच्या विकासाकडे भारताची वाटचाल सुरु असून भारतात गुंतवणुकीसाठीची ही योग्य वेळ असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यावेळी आयबीएम सीईओंनी आत्मनिर्भर भारताच्या ध्येयावर विश्वास व्यक्त केला आणि आयबीएमच्या भारतातील भव्य गुंतवणूक योजनेची माहिती पंतप्रधानांना दिली.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

देशात कोविड मुळे होणाऱ्या मृत्यूचा दर सतत कमी होत आहे. आता तो 2.46 टक्क्यांवर आला आहे. जागतिक स्तरावर सर्वात कमी मृत्युदर असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. आधारभूत वैद्यकीय नियमावलीच्या आधारे मध्यम आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांमध्ये उत्तमपणे राबवण्यात आलेल्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापना मुळे रुग्णांच्या बरे होण्याचा दर वाढत आहे.

कोविडने आजारी असलेले सात लाखाहून जास्त लोक आतापर्यंत बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. त्यामुळे कोविडचे सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णां मधला फरक [3,09,627] वाढत चालला आहे. 22,664 रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत. बरे होण्याचा दर सध्या 62.62 टक्के आहे.

सध्या सक्रिय असलेल्या या 3,90,459 रुग्णांना रुग्णालयात तसेच घरी असलेल्या विलगीकरण कक्षात वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत.

कोविड-19 चा मृत्यू दर कमी करण्यासाठी भारत सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना अजून बळकट करताना अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने अतिदक्षता विभागातल्या डॉक्टरांसाठी एक व्हिडीओ चिकित्सा कार्यक्रम 8 जुलै 2020 पासून सुरू केला आहे.  कोविड-19 वर उपचार करणाऱ्या देशभरातल्या रुग्णालयातल्या डॉक्टरांमध्ये चर्चा घडवून आणणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. देशभरातल्या रुग्णालयात तसेच अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णांच्या संबंधात डॉक्टरांचे असलेले प्रश्न ,शंका आणि त्यांचे रुग्ण व्यवस्थापनाचे  अनुभव यांच्याबद्दल अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या तज्ञांशी आणि  देशातील अनेक डॉक्टरांशी या व्हिडिओ व्यासपीठावर चर्चा घडवून आणू शकतील.

अतिदक्षता विभागातल्या तसेच ऑक्सिजन यंत्रणा असलेल्या आणि विलगीकरण कक्षात वापरल्या जाणाऱ्या खाटांसह एक हजार पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या देशभरातल्या रुग्णालयांमधील  कोविड-19 वर उपचार देणाऱ्या डॉक्टरांनी आपापले अनुभव एकमेकांना सांगून, तसेच त्यावर चर्चा करून जर काही नवीन शिकण्यासारखे असेल तर  ते या व्यासपीठावर यावेत, त्याचा फायदा कोविड- 19 चा मृत्युदर कमी करण्यासाठी होऊ शकतो.

 मुंबई(10),  गोवा(3),  दिल्ली(3),  गुजरात(3),  तेलंगण(2),  आसाम(5),  कर्नाटक(1),  बिहार(1), आंध्र प्रदेश(1),  केरळ(1),  आणि तामिळनाडू (13),  अशा एकूण 43 वैद्यकीय  संस्थांचा समावेश  असणारी चार चर्चासत्रे आतापर्यंत घेण्यात आलेली आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेली ही चर्चासत्रे दीड ते दोन तास चालली. या चर्चासत्रांमध्ये कोविड-19 च्या व्यवस्थापना संबंधातले सर्व मुद्दे घेण्यात आले होते. रेमेडेजीवीर, टोसिलिझुमब, तसेच प्लाझ्मा चिकित्सा यांचा उपयोग तर्कशुद्ध पद्धतीने करण्याच्या गरजेवर या चर्चेमध्ये भर देण्यात आला.  कोविड 19 चे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या , तसेच इतर अनेक तपासण्यांच्या धोरणावरही यावेळी चर्चा झाली.

येत्या काळात  हा ' e- ICU' कार्यक्रम  छोट्या रुग्णालयांसाठी  (500 पेक्षा कमी खाटा असणाऱ्या)  उपलब्ध करून दिला जाईल.

इतर

  • केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग आणि रस्ते व वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सुक्ष्म/लहान उद्योग जसे मच्छीमार, फेरीवाले, रिक्षा चालक, भाजी विक्रेते, गरीब, बचतगट यांच्यासाठी आर्थिक योजना किंवा प्रारुप असावे यावर भर दिला. त्यांनी काल पॅन आयआयटी ग्लोबल ई-कॉन्क्लेव, एमएसएमई आणि उपजीविकेबाबत फेरविचारया परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले.
  • केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज म्हटले आहे की,सुधारणा हे केवळ नियमन नसून देश आणि मानव जातीच्या प्रगतीसाठी केलेला निर्धार आहे. देश आणि पिढ्यान पिढ्यांच्या विकासासाठी पत्रकारिता, माध्यमे आणि चित्रपटांची भूमिका या विषयावर ते बोलत होते. नवी दिल्ली विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणामधील व्यावसायिक विकास केंद्राचे उद्‌घाटन करताना देश आणि पिढ्यांच्या विकासासाठी पत्रकारिता, माध्यमे आणि चित्रपटांची भूमिका या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की सरकार ,राजकारण ,चित्रपट आणि माध्यमे समाजाच्या एका नाजूक धाग्याने एकमेकांशी जोडलेली आहेत . धैर्य, निष्ठा आणि सावधानता ह्या, या परस्पर संबंधांना बळकटी देण्यारे मंत्र आहेत.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2019 च्या परीक्षेसाठी 2,304 उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरु होती. त्याचवेळी सरकारने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर आयोगाने 23 मार्च 2020 रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन राहिलेल्या 623 उमेदवारांची मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.टाळेबंदी टप्प्याटप्याने शिथिल होत आहे, त्यामुळे आयोगाने उर्वरीत उमेदवारांच्या मुलाखती 20 ते 30 जुलै 2020 दरम्यान घेण्याचे निश्चित केले आहे. उमेदवारांना तसे कळविण्यातही आले आहे. उमेदवार, तज्ज्ञ सल्लागार आणि आयोगाचे कर्मचारी यांच्या सुरक्षेची व आरोग्याची चिंता लक्षात घेता योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.
  • राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे टोळधाड नियंत्रण कार्यालयांकडून 11 एप्रिल ते 19 जुलै दरम्यान 1,86,787 हेक्टर क्षेत्रावर टोळधाड नियंत्रण मोहीम राबवण्यात आली. 19 जुलै 2020 पर्यंत राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड आणि बिहार राज्य सरकारांनी 1,83,664 हेक्टर क्षेत्रावर टोळधाड नियंत्रण मोहीम राबवली. राजस्थानमध्ये टोळधाड नियंत्रणासाठी बेल हेलिकॉप्टर्सचा वापर करुन हवाई फवारणी क्षमता वृद्धिंगत केली आहे, तसेच वाळवंटी प्रदेशात भारतीय हवाई दलाने टोळधाड नियंत्रणासाठी एमआय-17 हेलिकॉप्टरची चाचणीही केली आहे.  गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार आणि हरियाणा राज्यात पीक नुकसानीची नोंद नाही. तथापी, राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ नुकसान झाले आहे.
  • सध्याच्या खरीप हंगामात देशभरात खतांच्या मागणीत लक्षणीय वाढ झालेली असून ही गरज पूर्ण करण्यासाठी सरकार खते उत्पादक आणि राज्य सरकारे यांच्यात योग्य समन्वय राखून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही सदानंद गौडा यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या मागणीची पूर्तता करण्यासाठी आयातीचा कालावधी देखील कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या देशात सर्वत्र खतांची पुरेशी उपलब्धता आहे आणि राज्यांकडे खतांचा यापूर्वीच पुरेसा साठा आहे मात्र सध्याच्या पेरण्यांच्या काळात अतिरिक्त मागणी निर्माण झाली तर त्यानुसार पुरवठ्यात वाढ केली जाईल आणि शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन गौडा यांनी दिले.

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग, बंदर विकास आणि मत्स्य उद्योग मंत्री अस्लम शेख हे कोविड-19  पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते मुंबई शहराचे पालकमंत्री देखील आहेत. उद्धव ठाकरे सरकार मधील ते कोविड-19  पॉझिटिव्ह झालेले चौथे मंत्री आहेत. रविवारी महाराष्ट्रामध्ये 9518 केसेस नोंद झाल्या. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,10,455 झाली आहे.

***

MC/SP/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1640000) Visitor Counter : 311