PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 17 JUL 2020 7:24PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 17 जुलै 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

सध्या भारतात कोविडच्या चाचण्यांचे प्रमाण आणि व्याप्ती वाढल्यामुळे, कोविडच्या रुग्णांची संख्या अधिक दिसत असली तरीही, रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ ही देखील समाधानाची बाब आहे. रुग्ण बरे होत असल्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण बरे होण्याचा दर जूनच्या मध्यापर्यंत 52% इतका होता, तो आता जुलैच्या मध्यापर्यंत 63 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशभरात कोविड-19 च्या सक्रीय रुग्णांची संख्या 3,42,756 इतकी आहे तर आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे 6.35 लाख असून त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 63% झाला आहे.

महाराष्ट्रात, मुंबईत एकूण रुग्णसंख्या लवकरच एक लाखांचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. मात्र, त्याचवेळी हे ही लक्षात घ्यायला हवे की मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दरदेखील सुमारे 70 टक्के इतका म्हणजे, राष्ट्रीय सरासरी दरापेक्षा 7 टक्के अधिक आहे आणि एकूण महाराष्ट्रापेक्षा तो 15% अधिक आहे. महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दर 55.62% इतका आहे. राज्यातल्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईत उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 24,307 इतकी आहे तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 67,830 इतकी आहे.

मुंबईत जूनच्या मध्यापर्यंत रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 50 टक्के इतका होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मिशन झिरो अभियानाची सुरुवात केली, ज्या अंतर्गत, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जलद कृती आराखडा तयार करण्यात आला. एक जुलैपर्यंत हा दर 57 टक्क्यांपर्यंत वाढला आणि आता 15 जुलैपर्यंत हा दर 70 टक्के इतका झाला आहे. आता कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांचे लक्ष्य मुंबईलगतच्या-ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भायंदर या शहरांकडे वळले आहे.

संपूर्ण देशभरात, दिल्लीत एकूण 118,645 रुग्णांच्या तुलनेत, सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 82% इतका आहे. तर राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे.

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे, ज्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण-तपसणी,संपर्क शोधून काढणे, प्रतिबंधक आणि बफर क्षेत्रात सर्वेक्षण, विशिष्ट परिघात केलेली नियंत्रण कामे, व्यापक प्रमाणात चाचण्या आणि वेळेत निदान या सर्व उपाययोजनांमुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीची लवकर ओळख पटणे आणि त्यावर लवकर उपचार होणे शक्य झाले आहे. कोविड-19 च्या वेगवेगळ्या पातळीवरील, म्हणजे सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळे प्रमाणित प्रोटोकॉल पाळले जात आहेत. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने हे वैद्यकीय उपचार व्यवस्थापन विषयक प्रोटोकॉल निश्चित केले आहेत. या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन धोरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.लक्षणविरहीत किंवा सौम्य लक्षणे असलेल्या 80 टक्के रुग्णांना गृह अलगीकरणात वैद्यकीय देखरेखेखाली राहण्याचा सल्ला दिला जात आहे, ज्यामुळे रुग्णालय यंत्रणांवरचा ताण कमी होतो आहे. तसेचगंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करुन मृत्यू कमी करण्यावर भर दिला जात आहे. हे ही लक्षात घेण्यासारखे आहे, की सध्या उपचारांखाली असलेल्या सक्रीय रूग्णांपैकी, 1.94% पेक्षा कमी रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत, 0.35% रुग्ण व्हेंटीलेटर वर आहेत आणि  2.81%रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज आहे.

या सर्व एकत्रित, सामाईक प्रयत्नांमुळे, कोविड-19 च्या रूग्णांसाठीच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा आता मजबूत झाल्या आहेत. सध्या देशात, 1,383 कोविड समर्पित रुग्णालये, 3107 कोविड आरोग्य केंद्र आणि 10,382 कोविड केअर सेन्टर्स आहेत.

इतर अपडेट्स:

  • देशात सध्या कोविड-19 रुग्णांची वास्तविक संख्या केवळ 3,42, 756 आहे. 6.35 लाखाहून (63.33%) अधिक रुग्ण बरे झाले आहेत.  भारत हा 1.35 अब्ज लोकसंख्येंचा,  जगातली सर्वात मोठी लोकसंख्या असलेला दुसरा देश असून इथे दहा लाख लोकसंख्येत 727.4 रुग्ण आढळतात. हे प्रमाण जागतिक स्तरावर काही युरोपियन देशांच्या तुलनेत चार ते आठ पटीने कमी आहे. दहा लाख लोकसंख्येत 18.6 मृत्यू ही भारतातली  आकडेवारी जगातल्या सर्वात कमी मृत्यू असलेल्या पैकी आहे.
  • सामानातून संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी इंटरनॅशनल अ‍ॅडव्हान्स रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटर्ल्जी अ‍ॅन्ड न्यू मटेरियल, एआरसीआय, हैदराबाद हे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे  स्वायत्त संशोधन आणि विकास केंद्र आणि नोएडाचे वेहंत टेक्नोलॉजी यांनी मिळून KritiScan® युव्ही सामान निर्जंतुक प्रणाली विकसित केली आहे. सरकत्या पट्ट्यावरून जाणारे सामान,युव्हीसी कन्व्हेयर प्रणाली  काही सेकंदातच प्रभावीपणे निर्जंतुक करू शकते आणि विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, हॉटेल, व्यावसायिक आणि खासगी आस्थापने  अशा ठिकाणी सामान निर्जंतुक करण्याकरिता वापरण्यासाठी सुयोग्य आहे. युव्हीसी आधारित निर्जंतुकीकरण प्रणाली जलद निर्जंतुकीकरण क्षमतेसाठी ओळखली जाते. ही प्रक्रिया कोरडी आणि रसायन मुक्त असते.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि उद्योग संशोधन विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ- एन आर डी सी ने याच मंत्रालयाच्या अधीन असलेली स्वायत्त संस्था, एस एन बोस राष्ट्रीय मूलभूत विज्ञान संस्था, कोलकाताने विकसित केलेल्या दोन कोविड-19 शी संबंधित तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी,  त्याबाबत मेसर्स पौलमेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार केला आहे.
  • भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाअंतर्गत उपक्रम, राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाने,  कोविड-19 संबंधित तंत्रज्ञान वृद्धींगत होण्याकरिता व्यावसायीकरणासाठी नवनिर्मितीकारांकडून प्रस्ताव मागवले आहेत. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या अनुदान कार्यक्रमा अंतर्गत हे प्रस्ताव मागवण्यात आले होते. जाहिरातीला प्रतिसाद देत 65 प्रस्ताव प्राप्त झाले होते. तीन सदस्यीय बाह्य तंत्रज्ञान तज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती, त्यांनी 16 तंत्र दृष्ट्या मजबूत आणि समर्पक प्रकल्पांची शिफारस केली.
  • जैवतंत्रज्ञान विभाग आणि त्यांच्या संशोधन संस्थांच्यावतीने कोविड-19 चे निदान, औषधोपचार आणि लस विकसित करण्याच्या कार्याला वेग : विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत, येणाऱ्या जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी) आणि त्यांच्या 16 संशोधन संस्थांच्यावतीने कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. कोविड महामारीवर संभाव्य समाधान शोधण्यासाठी अनेकविध स्तरावर संशोधन करण्यात येत आहे.
  • यंदाच्या म्हणजेच खरीप हंगाम 2020 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत शेतकऱ्यांनी उत्साहात नोंदणी सुरु केली आहे. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रकिया निःशुल्क केली असून त्यांना केवळ विम्याचे हप्ते भरावे लागणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांची अन्नपिके (तृणधान्ये आणि तेलबिया) यांचा विमा अगदी किरकोळ हप्ता दरात म्हणजे 2 टक्के दरात मिळू शकेल. तर व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी 5 टक्के दराने विमा होऊ शकेल. उरलेल्या हप्त्याची रक्कम केंद्र आणि राज्य सरकारांकडून अनुदान स्वरुपात दिली जाईल. खरीप 2020 हंगामासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशातली विमा उतरवण्यासाठीची मुदत 31 जुलै 2020 रोजी संपण्याची शक्यता आहे.
  • खरीप हंगामात महाराष्ट्रात युरियाची टंचाई नाही : केंद्र सरकारचा खत विभाग देशातील सर्व राज्यांना वेळेवर आणि पुरेसा खत पुरवठा सुनिश्चित करतो. राज्यांनी पेरणीपूर्वी दिलेल्या अंदाजित आवश्यकतेनुसार खतपुरवठा केला जातो. महाराष्ट्रासाठी पूर्ण खरीप हंगामासाठी (1 एप्रिल ते 20 सप्टेंबर) 15 लाख मेट्रिक टन युरियाची आवश्यकता वर्तवण्यात आली होती. पुरवठादारांनी मान्य केलेल्या पुरवठा आराखड्यानुसार पुरवठा करावा अशा सूचना देण्यात आल्या असून त्यावर खत विभागाकडून दैनंदिन देखरेखही ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेत वाढ झाल्यास हा विभाग योग्य ती पावले उचलत आहे. 1 एप्रिल ते 16 जुलै या काळात 8.83 लाख मेट्रिक टनाची आवश्यकता असताना 11.96 लाख मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये सुरवातीच्या 4.02 लाख मेट्रिक टन साठ्याचा समावेश आहे.
  • रेल्वे मंत्रालयाच्या वतीने ऑनलाईन वर्कमेन संगोष्टी आयोजित करण्यात आली. या परिषदेत भारतभरातील रेल्वे कर्मचारी युनियन्सचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.यावेळी केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पीयुष गोयल,रेल्वे राज्यमंत्री श्री. सुरेश सी.अंगडी आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्ष श्री. व्ही.के.यादव यांच्यासह रेल्वे मंडळातील अनेक वरीष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या परिषदेला संबोधित करताना पीयुष गोयल यांनी टाळेबंदीच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी अविश्रांतपणे बजाविलेल्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात गुरूवारी एका दिवसात सर्वाधिक 8641 रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात कोरोना बधितांची एकूण संख्या 2,84,281 इतकी झाली आहे. तसेच गुरुवारी राज्यात एकूण 5527 रुग्ण बरे झाले तर 266 जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण 1,14,648 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 1,58,140 वर उहचला आहे आणि एकूण 11,194 मृत्यू झाले आहेत. मुंबईत 1498 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 707 रुग्ण बरे झाले आहेत आणि 56 जणांचा मृत्यू झाला आहे. ताज्या माहितीनुसार मुंबईत कोविड19 रुग्णांची संख्या 97751 वर पोहचली आहे तर सक्रिय रुग्णांची संख्या 23,694 इतकी झाली आहे. मुंबईत एकूण 68,537 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 5520 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 55.63% आहे तर मुंबईत हा दर 70% आहे.

BG/SP/ST/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639422) Visitor Counter : 228