PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 02 JUL 2020 7:07PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 2 जुलै 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि रशियाच्या घटना दुरुस्तीवरील मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पुतीन यांचे अभिनंदन केले. 24 जून 2020 रोजी मॉस्को येथे आयोजित केलेल्या लष्करी संचलनात भारतीय पथकाचा सहभाग म्हणजे रशिया आणि भारताच्या जनतेमध्ये असलेल्या घनिष्ठ मैत्रीचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. कोविड-19 च्या जागतिक महामारीच्या नकारात्मक परिणामांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या प्रभावी उपाययोजनांची दोन्ही नेत्यांनी नोंद घेतली आणि कोविड-19 पश्चात जगात निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यातील अतिशय दृढ संबंध महत्त्वाचे असल्याबाबत सहमती व्यक्त केली.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सर्व स्तरातील शासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत सातत्याने वाढत आहे. आजमितीस सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 1,32,912 हून अधिक आहेत. कोविड -19 रुग्णांच्या वेळेवरील रुग्णालयीन व्यवस्थापनामुळे दररोज 10,000 हून जास्त रुग्ण बरे होत आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 11,881 कोविड -19 रूग्ण बरे झाले असून त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,59,859 पर्यंत पोहोचली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 59.52% इतका झाला आहे. सध्या 2,26,947 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

इतर अपडेट्स:

  • देशात कोविड -19  चाचण्या घेण्यात आलेल्या एकूण लोकांची संख्या लवकरच एक कोटींचा टप्पा गाठेल. केंद्र सरकारकडून सर्व अडथळे दूर करण्यात आल्यामुळे हे शक्य झाले आहे. केंद्र सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोविड -19.साठी चाचण्या वाढवण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जलद गतीने विस्तारत असलेल्या निदान चाचणी नेटवर्कद्वारे आतापर्यंत  90,56,173 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात आता सार्वजनिक क्षेत्रात  768 आणि  297 खाजगी अशा एकूण 1065 प्रयोगशाळा आहेत.रोजची चाचणी क्षमता देखील वेगाने वाढत आहे. काल, कोविड -19 साठी तब्बल 2,29,588 जणांची चाचणी झाली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण उपायाद्वारे कोविड-19 चाचणी केवळ सरकारी डॉक्टरांच्या  नाही तर आता कोणत्याही नोंदणीकृत प्रॅक्टिशनरच्या शिफारशीनुसार  करता येईल, आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चाचणीचे निकष पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोविड  चाचणीची शिफारस लिहून देण्यासंबंधी खासगी डॉक्टरांसह  सर्व पात्र वैद्यकीय डॉक्टरांना सक्षम करून लवकरात लवकर चाचणी पार पाडण्यासाठी सुलभ करण्यासाठी त्वरित पावले उचलावी, असा सल्ला केंद्राने राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.
  • चाचण्यांमधील सर्व अडथळे दूर करण्याच्या हेतूने, केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान आणि 'आयसीएमआर'चे महासंचालक डॉ बलराम भार्गव, यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना, चाचण्यांची व्यवस्था व वेग वाढवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची विनंती केली आहे. कोविड-19च्या रुग्णांचा त्वरित  शोध व प्रतिबंधन यासाठी, 'चाचण्या-माग-उपचार' ही त्रिसूत्री सर्वात प्रभावी आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये, चाचणी प्रयोगशाळांच्या, विशेषतः खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळांच्या वापराची क्षमता, अत्यंत कमी आहे, याची नोंद घेत, अशी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-19 च्या प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
  • ओदिशामधील आशा सेविका - कोविड संबंधित गैरसमजुती आणि भेदभाव दूर करण्यात अग्रणी : ओदिशाच्या खुर्दा जिल्ह्यातील कांदले या गावी असलेली आशा मंजू जीना कोविड -19 संबंधित कामांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजातील व्यक्तींना अत्यावश्यक व इतर आरोग्य सेवां उपलब्ध करून देण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. समाजसेवेशी वचनबद्धता पाळताना मंजू यांनी महत्त्वपूर्ण सामाजिक दायित्वाची पूंजी जमविली  आहे, ज्यामुळे त्यांना कोविडशी संबंधित गैरसमज आणि परिणामी भेदभाव दूर करण्यासाठी प्रभावीपणे वाटाघाटी करण्यास सक्षम केले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही येत्या नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. एप्रिल - नोव्हेंबर 2020 दरम्यान अन्नधान्य (तांदूळ व गहू) आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत डाळींच्या वाटपासाठी अंदाजे खर्च 1,48,938 कोटी रुपये आहे.
  • भारतीय नौदलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या समुद्र सेतू अभियानाअंतर्गत आयएनएस जलाश्वने इराणमधल्या 687 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्‍यात आले. इराणमधल्या बंदर अब्बास येथून निघालेले हे जहाज आज (दि.1 जुलै, 2020 रोजी ) सकाळी तुतिकोरीन बंदरामध्ये दाखल झाले. भारतीय नौदलाच्या जहाजांनी इराणमधून आत्तापर्यंत 920 भारतीय नागरिकांना मायदेशी आणले आहे.
  • 1 जुलै 2020 रोजी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या देशभरातील सर्व कार्यालयांमध्ये तिसरा जीएसटी दिन साजरा करण्यात आला. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी जीएसटी अत्यंत उपयुक्त ठरले असून, ‘एक देश एक करही बाजारपेठ निर्माण करण्याचे उद्दिष्ट यातून साध्य होत आहे. सध्या कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, या दिवसानिमित्त, बहुतांश भागधारकांशी चर्चा आणि कार्यक्रम डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन आभासी स्वरूपात घेण्यात आले.
  • शेतीला फायदेशीर बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा पोत विचारात घेऊन विविध प्रकारच्या पिकांची लागवड करावी, असे आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केले आहे. त्यांनी देशातील शेतकऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिले असून त्यामध्ये शेतकऱ्यांना विविध सूचना केल्या आहेत. देशाच्या बहुतेक भागात मान्सून सक्रिय झाला असल्याने, बऱ्याच भागात पिकांच्या पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत आणि इतर भागात ही कामे सुरू आहेत असे त्यांनी सांगितले. उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करावा, यासाठी आपण शेतकऱ्यांशी संपर्क साधत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
  • रसायन आणि खते मंत्रालय अंतर्गत, आरसीएफ म्हणजेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स देशातल्या शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीतही आरसीएफने खरीप पेरण्यांची गरज लक्षात घेवून उज्ज्वलायूरिया आणि सुफलायासारख्या अव्वल खतांची उपलब्धता सुनिश्चित केली आहे.
  • केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी आज खते विभागातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले; तसेच 30 जून 2020 या एकाच दिवशी 73 खतांचे (रेक्स) पोहचविण्यास मदत केली म्हणून, रेल्वे मंत्रालयाबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. एकाच दिवसात एवढे खतांचे रेक्स पोहचविणे हा आतापर्यंतचा  एक विक्रमच आहे, असे गौडा यावेळी म्हणाले. यावर्षी जून महिन्यात साधारणतः दरदिवशी 56.5 रेक्स पोहचविली जात होती. पण हा ऐतिहासिक विक्रमी आकडा आहे.
  • केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील (एनएफएसए) तरतुदीनुसार सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व लाभार्थींना पीएमजीकेएवाय म्हणजेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेनुसार नोव्हेंबर 2020 पर्यंत मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. त्याबद्दल पासवान यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
  • गेल्या अनेक वर्षात, दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) अत्यंत चिंतेचा विषय झाला आहे. त्यात दिल्लीतील आयटीओ क्रॉसिंग भागात तर हवेतील प्रदूषणाची पातळी उच्च असल्याची नोंद झाली आहे. या सर्व घटना लक्षात घेता आणि सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून, भारत सरकारच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयाने आपल्या बहादूर शहा जाफर मार्ग कार्यालय परिसरात,नगरवन विकसित करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र अपडेट्स :

  • महाराष्ट्रात कोविड 19 च्या एकूण रुग्णांची संख्या 180298 इतकी झाली आहे. बुधवारी 5537 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 2243 रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारपर्यंत  राज्यातील बरे झालेल्या एकूण 93154 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. एकूण 79075 सक्रिय रुग्ण आहेत.

R.T/S.T/P.M

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1635957) Visitor Counter : 230