पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या नवी दिल्लीतील कार्यालय परिसरात विशेष नगरवनाचे उद्‌घाटन


नगरवने म्हणजे शहरांची फुफुस्से, शहरांची ऑक्सिजन बँक आणि कार्बन शोषक : प्रकाश जावडेकर

Posted On: 02 JUL 2020 4:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

गेल्या अनेक वर्षात, दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) अत्यंत चिंतेचा विषय झाला आहे. त्यात दिल्लीतील आयटीओ क्रॉसिंग भागात तर हवेतील प्रदूषणाची पातळी उच्च असल्याची नोंद झाली आहे. या सर्व घटना लक्षात घेता आणि सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून, भारत सरकारच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयाने आपल्या बहादूर शहा जाफर मार्ग कार्यालय परिसरात,नगरवन विकसित करण्याचा निर्णय घेतला.

कार्यालयातील परीसराची मर्यादा लक्षात घेता, या भागात घनदाट वनीकरण करण्यासाठी, स्थानिक रोपांचा वापर करण्यात आला. स्थानिक  वृक्ष लागवडीतून तयार होत असलेल्या या जंगलासाठी त्रिमितीय आणि बहुस्तरीय उंची  असलेली देशी वृक्ष लावण्यात आली आहे. यामुळे या वनात इतर वनांच्या तुलनेत 30 पट अधिक हरित भाग असेल. तसेच, नैसर्गिक संकटापासून जमिनीचे रक्षण करण्याची आणि पर्यावरण संरक्षणाची क्षमताही 30 पट अधिक असेल.

या नगरवनाचे उद्‌घाटन करतांना, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आनंद व्यक्त केला आणि या विशेष वनामुळे, या भागात घनदाट वनाच्छादान उपलब्ध होईल असे सांगितले. या जंगलात 59 देशी प्रजातीची  12000  रोपटी लावली जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

नगर वनांचे महत्व अधोरेखित करतांना जावडेकर यांनी सांगितले की, ही नगरवने शहरांची फुफुस्से म्हणून काम करतात, ऑक्सिजनचा संचय आणि कार्बन शोषून घेण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते, असे त्यांनी सांगितले. वन विकसित करण्याच्या मियावाकी पद्धतीचे त्यांनी कौतुक केले, या पद्धतीतून लावलेल्या जंगलामुळे,दिल्लीतील तापमान 14 अंश सेल्सियसने कमी होईल आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढेल, अशी माहिती त्यांनी दिली.

अगदी कमी देखभालीत, ज्यात फक्त पाणी आणि तण काढणे, एवढ्याच मशागतीवर या वनात ऑक्टोबर 2021 पर्यंत झाडं टिकतील.  या नगरवनांमध्ये एक परिसंस्थाही विकसित होण्याची क्षमता असून तिथे पक्षी, मधमाशा, फुलपाखरे आणि इतर सूक्ष्म जीव-कीटक वाढू शकतील. झाडांचे आणि फळांचे  परागीभवन होण्यासाठी आणि परिसंस्था समतोल राखण्यासाठी प्राणी-पक्षी-कीटक आवश्यक आहे.  या परिसरातल्या सुमारे एक एकर भागावर हे घनदाट अरण्य लावले जात आहे. या बहुस्तरीय जंगलात,छोटी रोपटी, मध्यम उंचीची आणि उंच वाढणारी झाडे अशी काळजीपूर्वक निवड करण्यात आली आहे.

या वनात लावण्यात आलेल्या काही स्थानिक प्रजातींमध्ये, धौरा, लोहारी, अजानवृक्ष, काळा-कुडा, कळम, पळस, खजूर, मुरडशेंग अशा दुर्मिळ झाडांची लागवड करण्यात आली आहे. दिल्लीच्या वनस्पती आणि त्या भागातील हवामानाला, तसेच भूमीला सुसंगत अशा झाडांची निवड करण्यात आली आहे.

पर्यावरण संरक्षक वने कमी झाल्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी या नगरवनाच्या रूपाने  कृतीतून दिलेला हा संदेश आहे. या परिसरातील मूळ नैसर्गिक झाडे, देशी प्रजातींची लागवड आणि संवर्धन ही आता काळाची गरज आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून आपल्याला शहरांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असा विश्वास महालेखापाल कार्यालयाने व्यक्त केला. दिल्लीच्या परिसंस्थेसाठी दिलेले हे छोटे पण महत्वाचे योगदान, अनेकांना आपल्या आजूबाजूच्या परिसरात निसर्ग संरक्षण आणि संवर्धनाची प्रेरणा देणारे ठरेल.

नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनी, केंद्र सरकारने ‘नगरवन’योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत, येत्या पाच वर्षात, देशभरात 200 नगरवने विकसित केली जाणार आहेत. जनसहभागावर भर देत, वनविभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र आणि नागरीक मिळून नगरवने विकसित करणार आहेत.

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1635895) Visitor Counter : 296