आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्र सरकारकडून कोविड-19च्या चाचण्यांमधील अडथळे दूर


चाचण्यांचा वेग वाढवण्याची राज्यांना विनंती

Posted On: 01 JUL 2020 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जुलै 2020

चाचण्यांमधील सर्व अडथळे दूर करण्याच्या हेतूने, केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान आणि 'आयसीएमआर'चे महासंचालक डॉ बलराम भार्गव, यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना, चाचण्यांची व्यवस्था व वेग वाढवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची विनंती केली आहे. कोविड-19च्या रुग्णांचा त्वरित  शोध व प्रतिबंधन यासाठी, 'चाचण्या-माग-उपचार' ही त्रिसूत्री सर्वात प्रभावी आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये, चाचणी प्रयोगशाळांच्या, विशेषतः खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळांच्या वापराची क्षमता, अत्यंत कमी आहे, याची नोंद घेत, अशी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-19 च्या प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना (ज्यात खाजगी डॉक्टर्स देखील समाविष्ट आहेत) 'आयसीएमआर'च्या मार्गदर्शक सूचनांच्या आधीन राहून कोणत्याही व्यक्तीला कोविड-19ची चाचणी करण्याची चिठ्ठी लिहून देता येईल, अशी चाचण्यांची व्यवस्था लवकरात लवकर करावी, असे देखील सांगण्यात आले आहे.

'आयसीएमआर'च्या मार्गदर्शक सूचनांच्या अंतर्गत, सर्व प्रयोगशाळांना कोणत्याही व्यक्तीची चाचणी करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे; तसेच, राज्य सरकारच्या प्रशासनाने, कोणत्याही व्यक्तीला चाचणी करण्यापासून रोखू नये, कारण लवकर चाचण्या झाल्या तरच, आपल्याला विषाणूचे संक्रमण रोखणे आणि लोकांचा जीव वाचवणे शक्य होईल, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

कोविड-19 च्या निदानासाठी- RT-PCR ही 'गोल्ड स्टॅण्डर्ड' चाचणी आहे, मात्र 'आयसीएमआर'ने अलीकडेच, कोविड-19च्या लवकर निदानासाठी, 'पॉईन्ट ऑफ केअर रॅपिड अँटीजेन टेस्ट'ला मंजुरी दिली आहे. ही चाचणी जलद, सोपी व सुरक्षित आहे. ती प्रतिबंधित क्षेत्रे व रुग्णालयात 'आयसीएमआर'च्या निकषांचे पालन करत, 'पॉईन्ट ऑफ केअर' म्हणून वापरली जाऊ शकते. अशा आणखी किट्सना 'आयसीएमआर'कडून मान्यता दिली जाणार आहे. जनतेला चाचण्यांसाठी इतर पर्यायही उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. 'आयसीएमआर'ने आतापर्यंत कोविड-19च्या चाचण्यांसाठी 1,056 प्रयोगशाळांना मंजुरी दिली आहे. यापैकी, 764 प्रयोगशाळा सरकारी, तर 292 प्रयोगशाळा खाजगी आहेत.

चाचण्यांची व्यवस्था वाढवण्यासाठी, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 'मोहिमेच्या’ स्वरुपात काम करावे, तसेच ज्या ठिकाणी अनेक रुग्ण आढळले आहेत, अशा भागात शिबिरे आयोजित करुन (मोबाईल गाड्यांचा वापर करत) 'रॅपिड अँटीजेन टेस्ट' कराव्यात, असा सल्लाही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. पॉझिटिव्ह व्यक्तींना उपचाराच्या प्रोटोकॉलनुसार, उपचार दिले जावेत. तसेच, निगेटिव्ह व्यक्तींची RT-PCR चाचणी करावी. खाजगी प्रयोगशाळांमध्ये RT-PCR चाचण्यांसाठीचे दर निश्चित करण्याचे निर्देशही राज्ये/केंद्रशासित प्रदेशाना देण्यात आले आहेत. चाचण्यांविषयीची सर्व आकडेवारी, सर्व प्रयोगशाळांनी 'आयसीएमआर'च्या माहिती पत्रकावर टाकणे अनिवार्य केले जावे, अशी सूचना करण्यात आली आहे. राज्ये/जिल्हा/शहर प्रधिकरण यांनीही सर्वेक्षण व रुग्णांच्या शोध घेणाऱ्या मोहिमेची आकडेवारी पाठवावी, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

चाचण्यांची व्यवस्था व चाचण्यांना वेग देण्याव्यतिरिक्त, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ कडे लक्ष द्यावे, कारण त्यातूनच विषाणूचा माग काढता येईल. कोविड-19च्या प्रभावी व्यवस्थापनावर पूर्ण देखरेख ठेवावी, व सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. 

S.Pophale/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635845) Visitor Counter : 346