• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
शिक्षण मंत्रालय

कोविड -19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्र्यांचा देशातल्या पालकांशी वेबिनारद्वारे संवाद


विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षणाच्या तरतुदीसाठी केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालय कटिबद्ध- रमेश पोखरीयाल निशंक

Posted On: 27 APR 2020 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27  एप्रिल 2020

कोविड -19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी आज देशातल्या पालकांशी  वेबिनारद्वारे संवाद  साधला.मंत्रालयाकडून ऑनलाइन शिक्षणासाठी चालवल्या जाणाऱ्या विविध मोहिमा आणि  योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. मंत्रालयाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमाबाबत काळजी असल्यामुळे युद्धपातळीवर या सध्याच्या योजना राबवल्या जात असून त्याचा देशातल्या 33 कोटी विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

देशातल्या पालकांचे आभार मानत देश सध्या अभूतपूर्व  कठीण परिस्थितीतून जात असल्याचे त्यांनी सांगितले.पालकांना त्यांच्या पाल्याच्या अभ्यास आणि भवितव्याची चिंता असल्यामुळे त्यांच्यासाठी हा काळ अधिकच कठीण असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालय कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी, ई पाठशाळा,एनआरओईआर म्हणजे राष्ट्रीय खुली शैक्षणिक संसाधने भांडार, स्वयंम,डीटीएच वाहिनी स्वयंम प्रभा इत्यादी मार्गांनी मंत्रालय प्रयत्न करत आहे.

ऑनलाईन  शिक्षण धोरण अधिक दृढ करण्यासाठी 'भारत पढे' ऑनलाईन  मोहीम मंत्रालयाने सुरु केली असून  त्या द्वारे देशभरातल्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

10,000 पेक्षा जास्त सूचना मंत्रालयाला प्राप्त झाल्या असून  यासंदर्भात मंत्रालय लवकरच मार्गदर्शक सूचना आणणार आहे. विद्यादान 2.0 बाबत त्यांनी पालकांना माहिती दिली.या मोहिमेचा भाग म्हणून अभ्यासक्रमानुसार विविध ई मंचावर मजकूर विकसित करण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन मंत्रालयाने देशातल्या विविध शैक्षणिक संस्था आणि शिक्षण तज्ञांना केले आहे.या अंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी लवकरच मोठ्या प्रमाणात मजकूर सामग्री उपलब्ध होईल असे ते म्हणाले.

यावेळी पालकांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले.एनसीईआरटी पुस्तकांच्या उपलब्धतेबाबत पालकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर एनसीईआरटीची पुस्तके जवळजवळ सर्वच राज्यात पाठवण्यात आली असून लवकरच विद्यार्थ्यांना ती उपलब्ध होतील असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. सीबीएसई, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा कधी घेणार याबाबत  विचारणा केली असता 29 महत्वाच्या विषयांची परीक्षा शक्यतो  पहिल्यांदा  घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

लॉक डाऊन मधे विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान कसे  कमी करावे याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्रालयाच्या विविध ऑनलाईन मंचा द्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मंत्रालयाच्या DIKSHA या मंचावर 80,000 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही आठवड्यात देशात ई -शिक्षणात प्रशंसनीय वाढ दिसून आली आहे.

लॉक डाऊनमुळे शैक्षणिक  नुकसान टाळण्यासाठी एनसीईआरटीने पर्यायी कॅलेंडर आणले आहे. सीबीएसईलाही नवे  शैक्षणिक कॅलेंडर जारी करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी उपस्थित केलेल्या विद्यार्थ्यांची  शैक्षणिक कारकीर्द तसेच परीक्षा आणि संबंधित मुद्यावर केंद्रीय मंत्र्यांनी  माहिती देत त्यांचे निरसन केले.

मनुष्य बळ विकास मंत्रालय, सर्व  राज्यांचे  शिक्षण मंत्री आणि  शिक्षण सचिवांच्या सातत्याने  संपर्कात असून त्यांच्याशी 28 एप्रिलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आपण संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी या काळातही आपलेशिक्षण सुरु ठेवावे यासाठी, कोविड-19 संदर्भातले मुद्दे, माध्यान्न भोजन, समग्र शिक्षण यासारख्या विषयांवर यावेळी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

या वेबिनार मधे सहभागी झाल्याबद्दल पोखरीयाल यांनी पालकांचे आभार मानले. पुढच्या आठवड्यात वेबिनारद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती त्यांनी दिली. लॉक डाऊन संदर्भातल्या  सूचनांचे  संयमाने पालन  करत असल्याबद्दल आणि सोशल डीस्टन्सिंगचे पालन करत असल्याबद्दल त्यांनी पालकांचे आभार मानले. 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1618806) Visitor Counter : 180


Link mygov.in