राष्ट्रपती कार्यालय
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा राष्ट्राप्रति संदेश
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2026 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली - 25 जानेवारी 2026
माझ्या प्रिय देशवासियांनो
नमस्कार!
देशात आणि परदेशी राहणारे, आपण भारतीय, उत्साहाने प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करणार आहोत. मी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देते.
प्रजासत्ताक दिनाचा पवित्र उत्सव म्हणजे, आपला इतिहास, वर्तमान आणि भविष्य यातल्या देशाच्या दशा आणि दिशेचं अवलोकन करण्याचा क्षण. स्वातंत्र्यसंग्रामाच्या बळावर 15 ऑगस्ट 1947 च्या दिवसापासून आपल्या देशाची दशा बदलली. भारत स्वतंत्र झाला. आपल्या राष्ट्रीय नियतीचे आपण निर्माते झालो.
26 जानेवारी 1950 या दिवसापासून, आपण आपल्या प्रजासत्ताकाला संवैधानिक आदर्शांच्या दिशेने पुढे नेत आहोत. त्याच दिवशी आपण आपलं संविधान पूर्णपणे अमलात आणलं. लोकशाहीची जननी भारतभूमी वसाहतवादाच्या राजवटीच्या जोखडातून मुक्त झाली आणि आपलं लोकशाही गणराज्य अस्तित्वात आलं.
आपलं संविधान जगाच्या इतिहासातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या प्रजासत्ताकाचा आधारग्रंथ आहे. आपल्या संविधानात विचारपूर्वक सांगितलेले न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आदर्श आपल्या प्रजासत्ताकाची व्याख्याच करतात. संविधानाच्या रचनाकर्त्यांनी राष्ट्रीयतेची भावना आणि देशाची एकता यांसाठी, संविधानातल्या तरतुदींचा भक्कम आधार दिला आहे.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या राष्ट्राचं एकीकरण केलं. गेल्या वर्षी 31 ऑक्टोबरला कृतज्ञ देशवासीयांनी त्यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी केली. त्यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या पावन क्षणाशी जोडलेल्या स्मरण उत्सवांचेच सोहळे साजरे होत आहेत. हे उत्सव देशवासीयांमध्ये राष्ट्रीय एकतेच्या आणि गौरवाच्या भावनेला दृढ करतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आपल्या प्राचीन सांस्कृतिक एकतेचे धागे आपल्या पूर्वजांनी विणले होते. राष्ट्रीय एकतेच्या स्वरूपांना जिवंत राखण्याचा प्रत्येक प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे.
गेल्यावर्षीच्या 7 नोव्हेंबरपासून - आपलं राष्ट्रीय गीत 'वन्दे मातरम्'च्या रचनेला एकशे पन्नास वर्षं पूर्ण झाल्याचं औचित्य साधून- उत्सव साजरे केले जात आहेत. भारतमातेच्या दैवी स्वरूपाला वंदन करणारं हे गीत, जनमानसात राष्ट्रप्रेमाचा जागर करतं. राष्ट्रीयतेचे महाकवी सुब्रमण्यम भारती यांनी तमिळ भाषेत ‘वंदे मातरम येन्बोम’ म्हणजे - ‘आपण वंदे मातरम गाऊ’ या गीताची रचना करून वंदे मातरम् च्या भावनेला आणखी व्यापक स्तरापर्यंत जनमानसाशी जोडलं. अन्य भारतीय भाषांमध्येही या गीताचे अनुवाद लोकप्रिय झाले. श्री ऑरोबिंदो यांनी वंदे मातरम चा इंग्रजी अनुवाद केला. ऋषितुल्य बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेलं वंदे मातरम् म्हणजे आपल्या राष्ट्रवंदनेचा सूर आहे.
दोन दिवसांपूर्वी म्हणजे 23 जानेवारीला देशवासीयांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली. वर्ष 2021 पासून नेताजींची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली जाते, जेणेकरून देशवासीय- विशेषतः तरुणवर्ग- त्यांच्या दुर्दम्य देशभक्तीतून प्रेरणा घेऊ शकेल. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी पुकारलेला ‘जय हिंद’ चा नारा म्हणजे आपल्या राष्ट्रगौरवाचा उद्घोष आहे.
प्रिय देशवासीयांनो,
आपण सर्व आपल्या चैतन्यमयी प्रजासत्ताकाला शक्तिशाली करत आहात. आपल्या तिन्ही सैन्यदलांचे शूर सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव दक्ष असतात. आपले कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे जवान देशबांधवांच्या अंतर्गत सुरक्षेसाठी तत्पर असतात. आपले अन्नदाते शेतकरी देशवासीयांसाठी पोषण सामग्री उत्पन्न करतात. आपल्या देशाच्या कार्यकुशल आणि प्रतिभाशाली स्त्रिया अनेक क्षेत्रांमध्ये यशाचे नवे मापदंड प्रस्थापित करत आहेत. आपले सेवाधर्मी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य क्षेत्रातील सर्व कर्मचारी देशबांधवांच्या आरोग्याची काळजी घेतात. आपले निष्ठावान स्वच्छतामित्र देशाला स्वच्छ राखण्यासाठी प्रमुख भूमिका बजावतात. आपले जागृत शिक्षक भावी पिढ्या घडवतात. आपले जागतिक स्तरावरचे वैज्ञानिक आणि अभियंते देशाच्या विकासाला नव्या दिशा देतात. आपले कष्टाळू श्रमिक बंधू-भगिनी राष्ट्राची नवनिर्मिती करतात. आपले होतकरू तरुण आणि बालकं, त्यांच्या प्रतिभा आणि योगदानाच्या बळावर देशाच्या सुवर्णमयी भविष्याप्रति आपला विश्वास दृढ करतात. आपले प्रतिभावान कलाकार, शिल्पकार आणि साहित्यिक आपल्या समृद्ध परंपरांना आधुनिक अभिव्यक्ती देत आहेत. अनेक क्षेत्रांचे विशेषज्ञ देशाच्या बहुआयामी विकासाला दिशा देत आहेत. आपले ऊर्जावान उद्योजक देशाला विकसित आणि आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांचं योगदान देत आहेत. नि:स्वार्थ भावनेने समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था अगणित लोकांच्या जीवनात प्रकाश आणत आहेत. शासकीय आणि अशासकीय कार्यालयांमध्ये आणि संस्थांमध्ये काम करणारे सर्व कर्तव्यपरायण लोक, राष्ट्राच्या उभारणीत आपल्या सेवा समर्पित करत आहेत. लोकसेवेसाठी कटिबद्ध असणारे लोकप्रतिनिधी देशवासीयांच्या आकांक्षांनुसार कल्याण आणि विकासाची लक्ष्यं प्राप्त करत आहेत. अशा रीतीने सर्व जागरूक आणि संवेदनशील नागरिक आपल्या प्रजासत्ताकाच्या प्रगतीचा प्रवास पुढे नेत आहेत. आपल्या प्रजासत्ताकाला बळकट करण्याच्या प्रयत्नांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व देशवासीयांचं मनापासून कौतुक वाटतं. अनिवासी भारतीय बांधव आपल्या प्रजासत्ताकाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावतात. मी त्यांचं विशेष कौतुक करते.
प्रिय देशवासीयांनो,
आजच्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला आपल्या देशात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला जातो. लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी आपले प्रौढ नागरिक उत्साहाने मतदान करतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, मताधिकार वापरण्याने राजकीय शिक्षणाची खात्री पटते. आपले मतदार, बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून आपल्या राजकीय जागरूकतेचा परिचय देत आहेत. स्त्रियांचा मतदानातला वाढता सहभाग हा आपल्या प्रजासत्ताकाचा एक शक्तिशाली पैलू आहे.
स्त्रिया सक्रिय आणि समर्थ असणं देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पातळीवर केल्या जात असणाऱ्या प्रयत्नांमुळे अनेक क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढला आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळालं आहे. ‘प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत’ आतापर्यंत 57 कोटीहून अधिक बँक खाती उघडली गेली आहेत. यामध्ये जवळपास 56% खाती स्त्रियांची आहेत.
आपल्या बहिणी आणि कन्या पारंपरिक रूढींच्या बेड्या तोडून पुढे जात आहेत. देशाच्या समग्र विकासात स्त्रिया योगदान देत आहेत. 10 कोटींहून अधिक बचतगटांशी जोडलेल्या भगिनी विकासाची नवी व्याख्या लिहीत आहेत. स्त्रिया शेतीवाडीपासून अंतराळापर्यंत, स्वयंरोजगारापासून सैन्यापर्यंत आपली प्रभावशाली ओळख निर्माण करत आहेत. क्रीडाक्षेत्रात आपल्या कन्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यशाचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारताच्या कन्यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक आणि त्यानंतर अंध महिला टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकून सुवर्णमय इतिहास घडवला. गेल्यावर्षीच बुद्धिबळ विश्वचषकाचा अंतिम सामना भारताच्याच दोन कन्यांमध्ये खेळला गेला. या उदाहरणावरून क्रीडाजगतात आपल्या मुलींचं वर्चस्व सिद्ध होतं. अशा मुलीबाळींचा देशवासीयांना अभिमान वाटतो.
पंचायत राज्य संस्थांमध्ये स्त्री लोकप्रतिनिधींची संख्या जवळपास 46% आहे. स्त्रियांच्या राजकीय सक्षमीकरणाला नवी उंची देणाऱ्या ‘नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे’ महिलांच्या नेतृत्वात विकासाच्या विचाराला अभूतपूर्व शक्ती मिळेल. विकसित भारताच्या निर्मितीत नारीशक्तीची भूमिका महत्त्वाची ठरेल. त्यांच्या वाढत्या योगदानाने, आपला देश स्त्री-पुरुष समानतेवर आधारित असं, सर्वसमावेशक प्रजासत्ताकाचं उदाहरण जगासमोर ठेवेल.
सर्वसमावेशक विचारासह, वंचित वर्गांच्या कल्याण आणि विकासासाठी अनेक योजना अंमलात आणल्या जात आहेत. गेल्या वर्षी 15 नोव्हेंबरला देशवासीयांनी, धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी पाचवा जनजातीय गौरव दिवस साजरा केला आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त साजऱ्या झालेल्या उत्सवांचा समारोप झाला. ‘आदि कर्मयोगी’ अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समुदायांच्या लोकांमधल्या नेतृत्व क्षमतेचा परिपोष करण्यात आला. गेल्या काही वर्षात सरकारने आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाची देशाला ओळख करून देण्यासाठी संग्रहालयं उभारण्यासह अनेक पावलं उचलली आहेत. त्यांच्या कल्याणाला आणि विकासाला प्राधान्य देण्यात आलं आहे. ‘राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन अभियानां’तर्गत आतापर्यंत ६ कोटींहून अधिक तपासण्या केल्या गेल्या आहेत. ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये’ जवळपास 1 लाख 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा-परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. आरोग्य आणि शिक्षणाच्या अशा मोहिमा, आदिवासी समुदायांचा वारसा आणि विकास यामध्ये समन्वय साधत आहेत. ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ आणि ‘पीएम जनमन योजनेद्वारे’ PVTG म्हणजे विशेषत्वाने असुरक्षित आदिवासी समुदायांसह सर्व आदिवासी समुदायांचं सक्षमीकरण झालं आहे.
आपले अन्नदाते शेतकरी आपल्या समाजाचे आणि अर्थव्यवस्थेचे मेरूदंड आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाळू पिढ्यांनी आपल्या देशाला अन्नधान्यात आत्मनिर्भर केलं आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमाच्या बळावरच आपण शेतकी उत्पादनांची निर्यात करू शकत आहोत. अनेक शेतकऱ्यांनी यशस्वितेची अतिशय प्रभावी उदाहरणं घालून दिली आहेत. शेतकरी बंधुभगिनींना त्यांच्या उत्पादनाचं उचित मूल्य मिळावं, सवलतीच्या दरात व्याजावर कर्ज मिळावं, प्रभावी विमा सुरक्षा मिळावी, शेतीसाठी चांगलं बियाणं मिळावं, सिंचनसुविधा मिळाव्यात, अधिक उत्पादनासाठी खतं उपलब्ध असावीत, त्यांना आधुनिक शेती पद्धतींशी जोडलं जावं आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावं- या सर्व विषयांना प्राधान्य दिलं जात आहे. ‘पीएम किसान सन्माननिधीच्या’ माध्यमातून शेतकरी बंधू भगिनींच्या योगदानाचा आदर केला जात आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना बळकटी दिली जात आहे.
कित्येक दशकांपासून गरीबीशी झुंज देणाऱ्या कोट्यवधी देशवासीयांना दारिद्र्यरेषेवरून वर उचलण्यात आलं आहे. त्याबरोबरच ते पुन्हा दारिद्र्याने गांजू नयेत असेही प्रयत्न केले जात आहेत. अंत्योदयाच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणारी जगातली सर्वात मोठी योजना, ‘पीएम गरीब कल्याण अन्न योजना’ या विचारावर आधारित आहे की, 140 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात कोणीही उपाशी राहू नये. या योजनेतून जवळपास 81 कोटी लाभार्थ्यांना मदत मिळत आहे. गरीब कुटुंबांसाठी वीज-पाणी आणि शौचालय सुविधांनी युक्त अशी 4 कोटींहून अधिक पक्की घरं उभारून त्यांना सन्मानाचं जीवन जगण्यासाठी आणि प्रगती करून घेण्यासाठी आधार दिला गेला आहे. गरिबांच्या कल्याणासाठी होत असलेल्या अशा प्रयत्नांमुळे, महात्मा गांधींची सर्वोदयाची आदर्श संकल्पना साकारली जात आहे.
जगातली सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. आपल्या युवकांमध्ये असीम प्रतिभा आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. आपले तरुण उद्यमी, खेळाडू, वैज्ञानिक आणि व्यावसायिक देशाला नवी ऊर्जा देत आहेत आणि जागतिक पातळीवर आपली ओळख तयार करत आहेत. आज आपले बहुसंख्य तरुण स्वयंरोजगाराच्या यशस्वितेची दमदार उदाहरणं घालून देत आहेत. आपल्या राष्ट्राच्या विकासयात्रेचा ध्वज आपल्या तरुणांकडेच आहे. ‘मेरा युवा भारत’ किंवा ‘माय (MY) भारत’ ही तंत्रज्ञानाच्या मदतीने चालणारी आणि अनुभवांवर आधारित अशी एक शिक्षणव्यवस्था आहे. नेतृत्व आणि कौशल्यविकासासह अनेक क्षेत्रांमध्ये उपलब्ध संधींशी युवकांना जोडण्याचं काम यातून होतं. आपल्या देशात स्टार्टअप च्या प्रभावी सफलतेचं श्रेय युवा उद्यमींना जातं. युवा पिढीच्या आकांक्षांभोवती केंद्रित धोरणं आणि कार्यक्रमांच्या बळावर देशाच्या विकासाला गती मिळणार आहे. मला खात्री आहे की वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीत युवाशक्तीची भूमिका प्रमुख राहील.
प्रिय देशबांधवांनो,
भारत जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जागतिक पटलावर अनिश्चितता असूनही भारतात सातत्याने आर्थिक विकास होत आहे. नजीकच्या भविष्यात जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचं ध्येय साध्य करण्याच्या दिशेने आपण पुढे जात आहोत.
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीत गुंतवणूक करून, आपण उच्च स्तरावर आपल्या आर्थिक संरचनेची पुनर्निर्मिती करत आहोत. आपल्या आर्थिक भविष्याला आकार देण्याच्या प्रवासात आत्मनिर्भरता आणि स्वदेशी हे आपले मूलमंत्र आहेत.
देशाच्या आर्थिक एकात्मतेसाठी स्वातंत्र्योत्तर काळात सगळ्यात महत्त्वाचा ठरलेला GST चा निर्णय अमलात आणण्याने, ‘एक देश, एक बाजारपेठ’ अशी व्यवस्था प्रस्थापित झाली आहे. जीएसटी व्यवस्थेला अधिक परिणामकारक करण्याच्या नुकत्याच झालेल्या निर्णयानं आपल्या अर्थव्यवस्थेला आणखी बळ मिळेल. कामगार सुधारणांच्या क्षेत्रात चार ‘कामगार संहिता’ लागू करण्यात आल्या आहेत. यातून आपल्या कामगार बंधुभगिनींना लाभ होईल आणि उद्योगांच्या विकासालाही गती मिळेल.
प्रिय देशवासीयांनो,
प्राचीन काळापासूनच अखिल मानवतेला आपल्या सभ्यता, संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांचा उपयोग होत आला आहे. जागतिक समुदायानं आयुर्वेद, योग आणि प्राणायामाची प्रशंसा करून त्यांचा स्वीकार केला आहे. अनेक महान विभूतींनी आपल्या आध्यात्मिक आणि सामाजिक एकतेचा प्रवाह सतत वाहता ठेवला आहे. केरळमध्ये जन्मलेले महान कवी, समाजसुधारक आणि आध्यात्मिक विभूती श्री नारायण गुरु यांच्या मते, जिथे जातीपंथांच्या भेदभावांपासून मुक्त होऊन सर्व लोक बंधुभावाने एकत्र राहतात ते स्थान आदर्श मानलं जातं. श्री नारायण गुरु यांचा हा विचार त्यांच्या भाषेत उद्धृत करण्याचा मी प्रयत्न करते–
जाति-भेदम् मत-द्वेषम्, एदुम्-इल्लादे सर्वरुम्
सोद-रत्वेन वाडुन्न, मात्रुका-स्थान मानित।
आजचा भारत नव्या आत्मविश्वासाने आपल्या गौरवशाली परंपरांप्रति जागरूक होऊन पुढे जात आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. अलीकडच्या काळात आपल्या आध्यात्मिक परंपरेची पवित्र स्थळं लोकांमधल्या चैतन्याशी जोडली गेली आहेत.
उरल्यासुरल्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून ठराविक कालमर्यादेत बाहेर पडण्याचा समयबद्ध संकल्प सोडण्यात आला आहे. भारतीय ज्ञानपरंपरेत तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, साहित्य आणि कला यांचं महान संचित सामावलेलं आहे. भारतीय परंपरेतली रचनात्मकता ‘ज्ञान भारतम् मिशन’सारख्या प्रयत्नांच्या माध्यमातून जपली जात आहे आणि प्रसारित होत आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. भारताच्या लक्षावधी अमूल्य हस्तलिखितांमध्ये जपलेला वारसा आधुनिक संदर्भातून पुढे नेण्याचं काम या अभियानाद्वारे होईल. भारतीय भाषांमध्ये आणि भारतीय ज्ञानपरंपरेला प्राधान्य देऊन आपण, आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांना सांस्कृतिक आधार प्रदान करत आहोत.
संविधानाच्या आठव्या अनुसूचीत समाविष्ट सर्व भारतीय भाषांमध्ये भारताचं संविधान आता उपलब्ध आहे. संविधान भारतीय भाषांमध्ये वाचून समजून घेण्याने, देशवासीयांमध्ये संवैधानिक राष्ट्रीयतेचा प्रसार होईल आणि आत्मगौरवाची भावना दृढ होईल.
सरकार आणि जनसामान्यांमधलं अंतर सातत्यानं कमी करण्यात येत आहे. परस्पर विश्वासावर आधारित सुशासनावर भर दिला जात आहे. अनेक अनावश्यक नियम काढून टाकले गेले आहेत, कित्येक अटी-शर्तींना पूर्णविराम दिला आहे आणि जनहितासाठी व्यवस्था सुटसुटीत केल्या गेल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने लाभार्थ्यांना सुविधांशी थेट जोडलं जात आहे. दैनंदिन जीवनाचा स्तर उंचावण्याबरोबर जीवनसुलभतेला प्राधान्य दिलं जात आहे.
गेल्या दशकभरात राष्ट्रीय ध्येयं साध्य करण्याचा प्रयत्न लोकसहभागातून केला गेला आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय अभियानांना जन-आंदोलनाचं रूप देण्यात आलं आहे. प्रत्येक गावात आणि शहरात, स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रगतिशील सुधारणांचं माध्यम करण्यात आलं आहे. विकसित भारताची निर्मिती हे सर्व देशवासीयांचं सामूहिक दायित्व आहे. समाजात असीम शक्ती सामावलेली असते. सरकारच्या प्रयत्नांना समाजाकडून सक्रिय समर्थन मिळण्याने क्रांतिकारी बदल घडून येतात. उदाहरण घ्यायचं तर, आपल्या देशवासीयांनी डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला. आज जगभरातले अर्ध्याहून अधिक डिजिटल व्यवहार भारतात होतात. छोट्या छोट्या दुकानांतून खरेदी करण्यापासून ते रिक्षाचं प्रवासभाडं देण्यापर्यंत पैसे देण्याच्या डिजिटल पद्धतीचा अवलंब जागतिक समुदायासाठी प्रभावी उदाहरण ठरला आहे. याच पद्धतीने इतर राष्ट्रीय लक्ष्यांची प्राप्ती करण्यात सर्व देशवासीय आपला सक्रिय सहभाग नोंदवतील, अशी मला आशा आहे.
प्रिय देशवासीयांनो,
गेल्या वर्षी आपल्या देशानं ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाच्या तळांवर अचूक प्रहार केला. यात दहशतीचे अनेक तळ उद्ध्वस्त केले गेले आणि कित्येक दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. संरक्षण क्षेत्रातल्या आपल्या आत्मनिर्भरतेनं ऑपरेशन सिंदूरच्या ऐतिहासिक यशाला आणखी बळ दिलं.
सियाचेन बेस कॅंपला भेट दिली तेव्हा, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही देशाच्या रक्षणासाठी पूर्णपणे तत्पर आणि जोशपूर्ण अशा शूर सैनिकांना मी भेटले. भारतीय वायुदलाच्या सुखोई आणि राफेल या युद्धविमानांतून उड्डाण करण्याची संधीही मला मिळाली. मला वायुदलाच्या युद्धकौशल्याचीही माहिती मिळाली. भारतीय नौदलाच्या INS विक्रांत या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेच्या असामान्य क्षमता मी बघितल्या. नौदलाच्या INS वाघशीर या पाणबुडीतून मी खोल समुद्रात जाऊन आले. भूदल, वायुदल आणि नौदल यांच्या सामर्थ्याच्या बळावर, आपल्या सुरक्षा क्षमतांवर देशवासीयांचा पूर्ण विश्वास आहे.
प्रिय देशबांधवांनो,
पर्यावरण संरक्षणाला आज मोठं प्राधान्य आहे. पर्यावरणाशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये भारत जागतिक समुदायाला मार्गदर्शन करत आला आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. निसर्गाला अनुकूल अशी जीवनशैली हा भारताच्या सांस्कृतिक परंपरेचाच भाग आहे. हीच जीवनशैली आपण जागतिक समुदायाला शिकवलेल्या ‘Lifestyle for Environment’ म्हणजे ‘लाईफ (LiFE)’ चा आधार आहे. धरणीमातेची अनमोल साधनसंपत्ती पुढच्या पिढ्यांसाठीही उपलब्ध राहील, असे प्रयत्न आपण केले पाहिजेत.
अखिल सृष्टीत शांतता नांदण्यासाठी आपल्या परंपरेत प्रार्थना केली जाते. अवघ्या विश्वात शांतिपूर्ण व्यवस्था प्रस्थापित होऊनच मानवतेचं भवितव्य सुरक्षित राहू शकतं. जगाच्या अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेल्या अशांत वातावरणात भारत वैश्विक शांतीचा संदेश प्रसारित करतो आहे.
प्रिय देशवासीयांनो,
आपण भारतभूमीवर राहतो, हे आपलं सद्भाग्य आहे. आपल्या जननी जन्मभूमीसाठी कविवर्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात,
ओ आमार देशेर माटी, तोमार पोरे ठेकाइ माथा।
अर्थात,
हे माझ्या देशाच्या मातीमाये, मी तुझ्या चरणांशी नतमस्तक आहे.
प्रजासत्ताक दिन म्हणजे देशभक्तीच्या या प्रबळ भावनेला आणखी सुदृढ करण्याच्या संकल्पाची संधी आहे, असं मला वाटतं. या... आपण सगळे मिळून ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेतून कार्य करत आपल्या प्रजासत्ताकाचा गौरव उंचावूया.
मी पुन्हा एकदा, आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आपलं सर्वांचं जीवन सुख, शांती, सुरक्षा आणि सौहार्दाने परिपूर्ण राहील, याची मला खात्री आहे. मी आपणा सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगल कामना करते.
धन्यवाद!
जय हिन्द!
जय भारत!
***
अंबादास यादव/मुंबई दूरदर्शन केंद्र/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218583)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Malayalam
,
Assamese
,
English
,
Khasi
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada