पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील जामनगर येथे 1450 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या बहुविध प्रकल्पांचे पंतप्रधानांकडून लोकार्पण आणि पायाभरणी
"महत्ता आणि भव्यता यात स्मृतिवन 9/11 किंवा हिरोशिमा स्मारकापेक्षा कमी नाही"
"पोलंड सरकारच्या मदतीमागे महाराजा दिग्विजय सिंह यांच्या दयाळूपणाचा मोठा वाटा"
"जनशक्ती, ज्ञान शक्ती, जल शक्ती, ऊर्जा शक्ती आणि संरक्षण शक्ती या पाच भक्कम आधारशीलांवर गुजरात नवीन उंची गाठत आहे"
“सौनी योजनेंतर्गत माता नर्मदा प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचत आहे”
"महामारीमुळे निर्माण अडचणींवर मात करण्यासाठी 80 कोटींहून अधिक लोकांना मोफत धान्य दिले जात आहे"
"उत्पादन आणि किनारपट्टीप्रणित विकासाचे केंद्र म्हणून जामनगर उदयास येत आहे"
"सुमारे 33 हजार अनुपालन आणि नियम रद्दबातल करण्यात आले आहेत "
Posted On:
10 OCT 2022 10:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जामनगर येथे सिंचन, वीज, पाणीपुरवठा आणि नागरी पायाभूत सुविधांशी संबंधित सुमारे 1450 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये कलावड /जामनगर तालुक्यातील मोरबी-मालिया-जोडिया गट वाढीव पाणीपुरवठा योजना, लालपूर बायपास जंक्शन उड्डाणपूल, हापा मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग आणि सांडपाणी संकलन पाईपलाईन आणि पंपिंग स्टेशनचे नूतनीकरण यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी सौराष्ट्र अवतारण सिंचन (सौनी) योजना लिंक 3 (उंड धरण ते सोनमती धरण), सौनी योजना लिंक 1 (उंड -1 धरण ते सानी धरण) मधील टप्पा 5 आणि हरिपार 40 मेगावॅट सौर पीव्ही प्रकल्प समर्पित केले.
मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी येताना झालेले त्यांचे भव्य स्वागत आणि आशीर्वाद याबद्दल लोकांचे आभार मानले. पाणी, वीज आणि कनेक्टिव्हिटीशी संबंधित आठ प्रकल्पांचे समर्पण आणि पायाभरणी बद्दल पंतप्रधानांनी जनतेचे अभिनंदन केले. वाल्मिकी समाजातील लोकांसाठी कम्युनिटी हॉलची पायाभरणी करण्यात आली असून त्याचा त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूप उपयोग होईल,असे पंतप्रधानांनी सांगितले.
दोन दशकांपूर्वी झालेल्या भूकंपामुळे झालेल्या विनाशाची पंतप्रधानांना आठवण झाली. भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनेने आणि विध्वंसामुळे संपूर्ण राज्यात हताश वातावरण निर्माण झाले. मात्र, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर गुजरात पुन्हा एकदा उभा राहिला आणि नैराश्य आणि विनाश मागे सोडून देशात उच्च स्थानावर पोहोचला . कच्छच्या भूकंपात बळी पडलेल्या लोकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिवनाला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी जामनगरच्या लोकांना केले. ते म्हणाले की महत्ता आणि भव्यता यात हे स्मारक 9/11 किंवा हिरोशिमाच्या स्मारकापेक्षा कमी नाही.
पंतप्रधानांनी जामसाहेब महाराजा दिग्विजय सिंह यांचे स्मरण केले आणि दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या लोकांप्रती त्यांनी दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल अभिवादन केले. यामुळे पोलंडच्या लोकांशी एक चिरस्थायी बंध निर्माण झाला ज्यामुळे चालू संकटाच्या काळात युक्रेनमधून भारतीयांची सुखरूप सुटका करताना खूप मदत झाली. “पोलंड सरकारच्या मदतीमागे कुठेतरी महाराजा दिग्विजय सिंग यांच्या दयाळूपणाचा मोठा वाटा आहे”, ते म्हणाले. जामसाहेब शहराला नव्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. जामनगरने क्रिकेट क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. सौराष्ट्रच्या रणजी क्रिकेट संघाने 2020 मध्ये चषक परत मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली.
विकासाच्या पाच संकल्पांनी गुजरात राज्यासाठी भक्कम पाया रचल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. पहिला संकल्प जनशक्ती, दुसरा ज्ञान शक्ती, तिसरा जल शक्ती, चौथा ऊर्जा शक्ती आणि पाचवा संरक्षण शक्ती. "या पाच भक्कम आधारशीलांवर गुजरात नवीन उंची गाठत आहे", असे मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की तरुण पिढी भाग्यवान आहे की त्यांना या प्रदेशात आणि राज्यात 20-25 वर्षांपूर्वी ज्या समस्या होत्या त्यांना तोंड द्यावे लागले नाही. दिवस बदलले आहेत. जेव्हा पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री यायचे त्या दिवसांपासून ते आजच्या एका दौऱ्यात पूर्वीच्या तरतुदीपेक्षा कितीतरी अधिक पट किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन होण्यापर्यंत बरेच बदल झाले आहेत. आज सौनी योजनेंतर्गत माता नर्मदा प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचत असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे जल जीवन मिशन प्रत्येक घरापर्यंत पाईपने पाणी पोहोचवत आहे. केंद्र सरकारच्या योजना समर्पण आणि गतीने राबवल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
गरिबांचे कल्याण हे त्यांच्या सरकारचे पहिले प्राधान्य असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. महामारीदरम्यान कोणतेही कुटुंब उपाशी राहू नये,या बाबीकडे सर्वप्रथम लक्ष द्यायचे होते. 80 कोटींहून अधिक लोकांना उपाशी न ठेवता महामारीमुळे निर्माण अडचणींवर मात करण्यासाठी मोफत धान्य दिले जात आहे. कोणत्याही गरीब कुटुंबाला त्यांच्या कठीण काळात रिकाम्या पोटी झोपावे लागू नये यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना यावर्षी डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. त्यांनी वन नेशन वन रेशन कार्ड -एक देश एक रेशन कार्ड योजनेच्या फायद्यांचाही उल्लेख केला आणि भारताच्या सर्व भागातून जामनगरला उदरनिर्वाहासाठी येणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जामनगरच्या तेल रिफायनरी आणि तेलाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की याच भूमीवर कच्चे तेल शुद्ध केले जाते याचा प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. केंद्र आणि राज्यातील दुहेरी इंजिन सरकारने राज्याच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे, असे मोदी म्हणाले. शहरातील वाहतूककोंडीच्या काळाची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी नियोजित रस्ते, उड्डाणपूल आणि निम्न मार्ग तयार करून कनेक्टिव्हिटी वाढविण्याचे काम केले जात आहे. 26000 कोटी रुपये खर्च करून अमृतसर-भटिंडा-जामनगर कॉरिडॉर बांधला जात आहे. जामनगर हे उत्पादन आणि किनारपट्टीप्रणित विकासाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय पारंपरिक औषधे केंद्राचे मुख्यालय जामनगरमध्ये आहे, हे जामनगर आयुर्वेदिक विद्यापीठासाठी मुकुटमणी आहे, ज्याने राष्ट्रीय विद्यापीठ म्हणून स्थान मिळवले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. बांगड्या, सिंदूर, बांधणी इत्यादी शुभ गोष्टींशी निगडीत जामनगराचे रूपांतर ‘सौभाग्य नगर’ मध्ये होत आहे ,असे पंतप्रधान म्हणाले.
व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. अनुपालन ओझे कमी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सुमारे 33 हजार परवानग्या आणि नियम रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कंपनी कायद्याअंतर्गत गुन्हे मागे घेतल्यामुळे व्यापारी समुदायाला मदत होत आहे. विविध आर्थिक निर्देशांकांमध्ये भारताची होत असलेली सुधारणा, विशेषत: भारतीय अर्थव्यवस्था 2014 मधील 10 व्या क्रमांकावरून 5 व्या स्थानावर पोहोचल्याचाही त्यांनी उल्लेख केला. व्यवसाय सुलभतेतही भारत 2014 मधील 142 व्या क्रमांकावरून 20१९ मध्ये 63 व्या क्रमांकावर पोहोचला. प्रगतीशील औद्योगिक धोरण आणल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारची प्रशंसा केली. अतिक्रमण हटवणे आणि राज्याची किनारपट्टी स्वच्छ करण्याशी संबंधित राज्य सरकारने केलेल्या कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की जामनगर किनारपट्टीवर पर्यावरण संबंधित पर्यटनाच्या संधी आहेत. तिथे जैवविविधतेचा खजिना आहे.
पंतप्रधानांनी गुजरातमधील सुधारित कायदा आणि सुव्यवस्थेचीही दखल घेतली . ते म्हणाले की नरेंद्र-भूपेंद्र सरकारचे दुहेरी इंजिन समर्पण आणि वेगाने विकास योजना राबवत आहे.
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि खासदार सी आर पाटील तसेच पूनमबेन मदाम आदी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी जामनगरमध्ये सुमारे 1450 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प सिंचन, वीज, पाणीपुरवठा आणि शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित आहेत. पंतप्रधानांनी सौराष्ट्र अवतरण सिंचन (सौनी) योजना लिंक 3 (उंड धरण ते सोनमती धरण)चे पॅकेज 7 , सौनी योजना लिंक 1 (उंड -1 धरण ते सानी धरण) च्या पॅकेज 5 आणि हरिपार 40 मेगावॅट सौर पीव्ही प्रकल्पांचे लोकार्पण केले.
पंतप्रधानांच्या हस्ते ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यामध्ये जामनगर तालुक्यात कालवड गट संवर्धन पाणीपुरवठा योजना, मोरबी-मलिया-जोडिया गट संवर्धन पाणीपुरवठा योजना, लालपूर बायपास जंक्शन येथील उड्डाणपूल, हापा मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग आणि सांडपाणी संकलन करणारी पाईपलाईन तसेच पंपिंग स्टेशनचे नूतनीकरण यांचा समावेश आहे.
* * *
S.Kane/S.Kakade/Sushma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866616)
Visitor Counter : 241
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam