पंतप्रधान कार्यालय
100 व्या किसान रेल्वेला झेंडा दाखवताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
28 DEC 2020 11:25PM by PIB Mumbai
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर,रेल्वे मंत्री पियुष गोयल, खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो, सर्व प्रथम देशातल्या करोडो शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो.
ऑगस्ट महिन्यात देशाची पहिली शेतकरी आणि शेतीसाठी पूर्णपणे समर्पित रेल्वे सुरु करण्यात आली. उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम देशाच्या प्रत्येक भागातली शेती, शेतकरी यांना रेल्वे द्वारे जोडले जात आहे. कोरोनाच्या आव्हानात्मक काळातही गेल्या चार महिन्यात किसान रेल्वेचे नेटवर्क 100 वर पोहोचले आहे. आज 100 वी किसान रेल्वे थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्राच्या सांगोला इथून पश्चिम बंगाल मधल्या शालीमारकडे रवाना झाली आहे. म्हणजेच एक प्रकारे पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना, पशुपालकांना आणि मच्छिमारांना मुंबई, पुणे,नागपुर सारख्या महाराष्ट्राच्या मोठ्या बाजारापर्यंत पोहोचण्यासाठी स्वस्त आणि सुलभ सुविधा प्राप्त झाली आहे. जी रेल्वे आतापर्यंत संपूर्ण देशाला आपसात जोडत होती ती रेल्वे आता देशाच्या संपूर्ण कृषी बाजारालाही जोडत आहे, एक करत आहे.
मित्रहो,
किसान रेल सेवा, देशाच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यामुळे शेतीशी निगडीत अर्थव्यवस्थेत परिवर्तन येईल.यामुळे देशाच्या शीत पुरवठा साखळीची क्षमता वाढेल.सर्वात मोठी गोष्ट म्हणजे किसान रेल्वे मुळे देशाच्या 80 % अधिक छोट्या आणि अल्प भू धारक शेतकऱ्यांना मोठे बळ प्राप्त झाले आहे.
हे मी सांगतो कारण या गाडीमध्ये शेतकऱ्यांसाठी किमान प्रमाण ठेवण्यात आलेले नाही. एखादा शेतकरी 50-100 किलोचे पार्सल पाठवू ईच्छित असेल तर तो ते पाठवू शकतो. म्हणजेच छोट्या शेतकऱ्याचे छोट्यात छोटे उत्पादनही कमी किमतीत आणि सुरक्षितपणे बाजारात पोहोचेल. आतापर्यंत रेल्वेतून माल पाठवणाऱ्या छोट्या शेतकऱ्याने डाळींबाचे 3 किलोचे पाकीट रेल्वेतून पाठवले आहे. एवढेच नव्हे तर एका कुक्कुट पालकाने 17 डझन अंडी किसान रेल्वे द्वारे पाठवल्याची माहिती मला मिळाली आहे.
मित्रहो,
साठवणूक आणि शीत गोदामाच्या अभावी होणारे देशाच्या शेतकऱ्याचे नुकसान हे नेहमीच आव्हान राहिले आहे. आमचे सरकार,साठवणुकीच्या आधुनिक व्यवस्था,पुरवठा साखळीच्या आधुनिकीकरणावर कोट्यवधींची गुंतवणूक करण्याबरोबरच किसान रेल्वे सारखे आगळे उपक्रमही राबवत आहे.
स्वातंत्र्या पूर्वीही भारताकडे मोठे रेल्वे जाळे होते. शीत गोदाम तंत्रज्ञानही उपलब्ध होते. किसान रेल द्वारे या क्षमतेचा सर्वोत्तम उपयोग सुरु करण्यात आला आहे.
मित्रहो,
छोट्या शेतकऱ्यांना कमी खर्चात मोठी आणि नवी बाजारपेठ देण्यासाठी आमचा दृष्टीकोन आणि आमचे धोरणही स्पष्ट आहे. अर्थसंकल्पात आम्ही याच्याशी निगडीत महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.पहिली म्हणजे किसान रेल आणि दुसरी कृषी उडान.म्हणजेच आम्ही जेव्हा हे सांगतो की आमचे सरकार आपल्या शेतकऱ्याला दूरवरच्या भागात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचणे शक्य करत आहे तेव्हा आम्ही केवळ पोकळ घोषणा करत नाही.मी संपूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो की आम्ही योग्य मार्गावर आहोत.
मित्रहो,
किसान रेल्वे सुरवातीला साप्ताहिक होती. काही दिवसात रेल्वेची मागणी इतकी वाढली की आता आठवड्यातून तीन वेळा ही रेल्वे चालवण्यात येत आहे. विचार करा की इतक्या कमी वेळेत शंभरावी रेल्वे ही किरकोळ बाब नाही. देशाच्या शेतकऱ्याला काय हवे याचे हे द्योतक आहे.
मित्रहो,
हे काम शेतकऱ्यांच्या सेवेप्रती आमची कटीबद्धता दर्शवते.त्याचबरोबर आपला शेतकरी नव्या संधींसाठी किती तत्पर आहे याचेही द्योतक आहे. शेतकऱ्याला दुसऱ्या राज्यातही आपला कृषी माल विकता यावा यामध्ये किसान रेल आणि कृषी उडान यांची महत्वाची भूमिका आहे. देशाच्या ईशान्य भागातल्या शेतकऱ्यालाही याचा लाभ होऊ लागला आहे याचा मला आनंद आहे. अशा सज्जतेनंतरच आम्ही ऐतिहासिक कृषी सुधारणांच्या दिशेने पुढे जात आहोत.
मित्रहो,
किसान रेल्वे मुळे शेतकऱ्याला नवी बाजारपेठ कशी मिळत आहे, त्याचे उत्पन्न कसे सुधारत आहे आणि खर्च कसा कमी होत आहे याचे एक उदाहरण मी देतो. काही वेळा आपण बातम्या पाहतो की काही कारणांमुळे टोमाटोच्या किमती काही ठिकाणी कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांचे काय हाल होतात ते आपण पाहतो,ही परिस्थिती अतिशय दुःखदायी असते. शेतकरी आपली मेहनत आपल्या डोळ्यासमोर वाया जाताना पाहतो, असहाय्य होतो. मात्र आता नव्या कृषी सुधारणांमुळे. किसान रेल्वे सुविधेनंतर त्याला आणखी एक पर्याय मिळाला आहे. आता आपला शेतकरी आपला कृषी माल देशाच्या त्या भागापर्यंत पोचवू शकतो जिथे टोमॅटोला जास्त मागणी आहे, जिथे त्याला उत्तम किंमत मिळू शकते. फळे आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीवर अनुदानाचा लाभ घेऊ शकतो.
बंधू आणि भगिनींनो,
किसान रेल्वेची आणखी एक विशेष गोष्ट आहे. ही किसान रेल्वे म्हणजे एक चालते-फिरते शीतगृहही आहे. याचा अर्थ यामध्ये फळ असो, भाजीपाला असो, दूध असो, मासे असो, जो काही नाशवंत माल असेल, तो संपूर्ण सुरक्षितपणे एका स्थानावरून दुसरीकडे पोहोचवला जात आहे. आधी हाच माल शेतकरी बांधवांना मालमोटारीने पाठवावा लागत होता. रस्त्याने मालाची वाहतूक करताना अनेक समस्या येतात. एकतर वेळ खूप लागतो. मालमोटारीने माल पाठवायला भाडेही जास्त द्यावे लागते. म्हणजेच गावांमध्ये पिकवणारा असो अथवा शहरामध्ये खाणारा असो, दोन्ही बाजूंनी ते महागच पडते. आता ज्याप्रमाणे आज ही रेल्वे पश्चिम बंगालसाठी निघाली आहे. यामध्ये महाराष्ट्राची डाळींबे, द्राक्षे, संत्री आणि सीताफळे अशी उत्पादने पाठविण्यात येत आहेत.
ही रेल्वे जवळ-जवळ 40 तासांमध्ये तिथे पोहोचेल. मात्र हाच माल रस्ते मार्गाने वाहतूक करून पाठवायचा असेल तर दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापण्यासाठी काही दिवस लागतात. या प्रवासाच्या काळामध्ये ही रेल्वे, मार्गात येणा-या काही राज्यांमधल्या मोठ-मोठ्या रेल्वे स्थानकांवरही थांबणार आहे. तिथूनही जर काही कृषी माल पाठवायचा असेल तर किंवा तिथून कोणी मागणी नोंदवली असेल तर इथला माल तिथे उतरवता येणार आहे. हे कामही किसान रेल्वेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. याचा अर्थ या इतक्या दूरच्या प्रवासामध्ये वाटेत येणा-या अनेक बाजारांपर्यंत किसान रेल्वे माल पोहोचवणार आणि त्यांच्याकडचा माल दुस-या गावांसाठी नेणारही आहे. आता यामध्ये भाड्याची गोष्ट करायची तर या मार्गावर रेल्वेचे मालभाडे मालमोटारीपेक्षा जवळपास 1700 रुपये कमी आहे. किसान रेल्वे भाड्यामध्ये सरकार 50 टक्के सवलतही देत आहे. याचाही शेतकरी बांधवांना लाभ होत आहे.
मित्रांनो,
किसान रेल्वेसारखी सुविधा मिळाल्यामुळे नगदी पिके किंवा जास्त पैसा मिळवून देणारी पिके, जास्त पोषक पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. लहान शेतकरी आधी या सर्व गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नव्हता, कारण त्याला शीतगृह आणि मोठी बाजारपेठ मिळण्यास त्रास होत होता. दूरच्या बाजारापर्यंत माल पोहोचवायचा तर त्याला भाड्यापोटी खूप खर्च करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन तीन वर्षांपूर्वी आमच्या सरकारने टॉमेटो, कांदा, बटाटा यांच्या वाहतुकीसाठी 50 टक्के सवलत दिली होती. आता आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत यामध्ये आणखी डझनभर फळे आणि भाजीपाला यांचा समावेश केला आहे. याचा थेट लाभ देशातल्या शेतकरी बांधवांना मिळत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आजपासून पश्चिम बंगालच्या शेतकरी बांधवांना ही सुविधा उपलब्ध होत आहे. पश्चिम बंगालमध्ये बटाटा, फणस, कोबी, वांगी यासारख्या अनेक भाज्या खूप मोठ्या प्रमाणावर पिकतात. याचप्रमाणे अननस, लिची, आंबे, केळी अशी अनेक फळेही तिथले शेतकरी पिकवतात. मासे, मग गोड्या पाण्यातले असतील अथवा खा-या पाण्यातले, माशांची पश्चिम बंगालमध्ये कमतरताच नाही. समस्या आहे ती, या नाशवंत मालाला देशभरातल्या मंडईपर्यंत पोहोचविण्याची आहे. आता किसान रेल्वेसारख्या सुविधेमुळे पश्चिम बंगालच्या लाखो लहान- लहान शेतकरी बांधवांना एक खूप मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. आणि हा पर्याय शेतक-यांबरोबरच स्थानिक बाजारपेठेचे जे लहान-लहान व्यापारी आहेत, त्यांनाही मिळाला आहे. ते शेतक-यांना जास्त दाम देऊन जास्त माल खरेदी करू शकतात आणि किसान रेल्वेच्या माध्यमातून दुस-या राज्यांमध्ये मालाची विक्री करू शकतात.
बंधू आणि भगिनींनो,
गावांमध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी, शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, नवीन उपाय योजना करणे आवश्यक आहे. हे लक्ष्य निश्चित केल्यानंतर आता एकापाठोपाठ एक कृषी सुधारणा करण्यात येत आहेत. शेतीशी संलग्न असलेले तज्ज्ञ आणि त्यांनी दुनियेचा घेतलेला अनुभव त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा भारतीय कृषीमध्ये समावेश केला जात आहे. भंडारणासंबंधित पायाभूत सुविधा असो की शेती उत्पादनांच्या मूल्यवर्धनाशी संबंधित अन्न प्रक्रिया उद्योग असो, या सर्व गोष्टींना आमच्या सरकारने प्राधान्य दिले आहे. रेल्वे स्थानकांच्या जवळ देशभरामध्ये नाशवंत माल साठवणूक (कार्गो) केंद्र बनविण्यात येत आहेत. या केंद्रांमध्ये शेतकरी आपल्या कृषी मालाची साठवणूक करू शकणार आहेत. जितका भाजीपाला आणि फळे थेट घरापर्यंत पोहोचवला जाऊ शकतो, तितका पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त जे काही उत्पादन होते, त्याचा रस, लोणची, सॉस, चटण्या, चिप्स या गोष्टी बनविण्यासाठी उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यात येईल.
प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेअंतर्गत मेगा फूड पार्कस्, शीतगृह पायाभूत सुविधा साखळी, कृषी प्रक्रिया केंद्र, प्रक्रिया प्रकल्प अशा जवळपास साडे सहा हजार प्रकल्पांना स्वीकृती देण्यात आली आहे. यापैकी अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि लाखो शेतकरी बांधवांचे परिवार त्याचा लाभ घेत आहेत. आत्मनिर्भर अभियान पॅकेजअंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी 10 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.
मित्रांनो,
आज जर सरकार देशवासियांच्या लहान-लहान गरजाही पूर्ण करू शकत आहे, यामागे कारण आहे ते सहभागिता! कृषी क्षेत्रामध्ये ज्या ज्या सुधारणा होत आहेत, त्यामागे सर्वात मोठी ताकद गावांतल्या लोकांची, शेतकर-यांची, युवकांची आहे, त्यांच्या भागीदारीमुळे हे सगळे होत आहे. एफपीओ म्हणजेच कृषी उत्पादन संघ असो आणि इतर कोणतेही सहकारी संघ असो, महिलांचे स्वमदत समूह असो, कृषी व्यापारामध्ये आणि कृषी पायाभूत सुविधांच्या निर्माणामध्ये त्याला प्राथमिकता देण्यात येत आहे. नवीन कृषी सुधारणांमध्ये कृषीसंबंधित जो काही व्यापार- व्यवसाय वाढणार आहे, त्याचा खूप मोठा लाभ शेतकरी बांधवांच्या, ग्रामीण युवकांच्या, महिलांच्या या संघटनांनाच मिळणार आहे.
कृषी व्यवसायामध्ये जी काही खाजगी गुंतवणूक होईल, त्यामुळे सरकारच्या या प्रयत्नांना ताकदच मिळणार आहे. आम्ही संपूर्ण निष्ठेने, पूर्ण ताकदीने भारतीय कृषी क्षेत्राला आणि शेतक-याला सशक्त बनविण्याच्या मार्गावर चालत राहणार आहोत. पुन्हा एकदा देशातल्या शेतक-यांना 100 किसान रेल्वेसाठी आणि त्यामुळे निर्माण होणा-या नवीन संधी, शक्यतांसाठी मी खूप-खूप शुभेच्छा देतो. रेल्वे मंत्रालयाचे अभिनंदन करतो. कृषी मंत्रालयाचे अभिनंदन करतो आणि देशातल्या कोटी-कोटी शेतकरी बांधवांना अनेक-अनेक शुभेच्छा देतो.
खूप-खूप धन्यवाद!
----
U.Ujgare/N.Chitale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1684302)
Visitor Counter : 237
Read this release in:
Manipuri
,
Hindi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Punjabi
,
Tamil
,
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Odia