PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 18 AUG 2020 8:28PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 18 ऑगस्ट 2020

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

Image

शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ARIIA-2020 म्हणजेच अटल अभिनव उपलब्धी क्रमवारी संस्थेच्या ऑनलाईन पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या कामाची माहिती वेळेत पुरवण्यापासून ते शेतमालासाठी शीतगृहे बांधणे आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे या सगळ्या गोष्टींसाठी संशोधकांनी पुढे येण्याची गरज आहे. असे नायडू यांनी सांगितले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी म्हणजेच 20 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल जाहीर करतील. देशाच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणांची ही पाचवी आवृत्ती आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरे व राज्यांना “स्वच्छ महोत्सव” या कार्यक्रमात 192 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पंतप्रधान स्वच्छ भारत मिशन-अर्बन (एसबीएम-यू) अंतर्गत देशाच्या विविध भागातील निवडक लाभार्थी, स्वच्छाग्रही आणि सफाई कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. पंतप्रधान यावेळी स्वच्छ सर्वेक्षण 2020 डॅशबोर्डचे अनावरण करतील.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारताने कोविड-19 चाचण्यांचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एका दिवसात सुमारे 9 लाख (8,99,864) चाचण्या केल्या असून एका दिवसात केलेल्या आजवरच्या या सर्वात अधिक चाचण्या आहेत. यामुळे, आजपर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या 3,09,41,264 इतकी झाली आहे.

चाचण्यांची संख्या वाढत असल्यामुळे, रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर, 8.81% टक्के इतका कमी राहिला आहे, गेल्या आठवड्यात राष्ट्रीय सरासरी दर 8.84%.इतका होता.

भारतात गेल्या चोवीस तासात, कोविडचे 57,584 रुग्ण बरे झाले असून हा ही नवा विक्रम आहे. याच काळात, देशात 55,079 नवे रुग्ण आढळले आहेत. आता अधिकाधिक रुग्ण बरे होत असल्यामुळे आणि त्याना उपचारानंतर सुट्टी दिली जात असल्याने, आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 19 लाखांच्या वर (19,77,779) पोहोचली आहे. यामुळे, बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि सक्रीय रुग्णांची संख्या यातील तफावत 13 लाखांच्याही (13,04,613). पुढे गेली आहे.

दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, रुग्ण बरे होण्याचा दर आता 73.18% टक्के इतका झाला आहे आणि कोविडचा मृत्यूदर 1.92% टक्यांपर्यंत कमी झाला आहे. केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सरकारांच्या एकत्रित प्रयत्नामुळे तसेच केंद्र सरकारच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रीट धोरणामुळे 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये CFR चा दर राष्ट्रीय सरासरी दरांपेक्षा कमी आहे. आक्रमक चाचण्यांमुळे लवकरात लवकर रुग्ण शोधणे आणि पॉझिटिव्ह रुग्णांना योग्य वेळी अलगीकरणात ठेवता आले. त्याशिवाय, गंभीर रूग्णांवर प्रभावी उपचार पद्धतीचा वापर केल्यामुळे,रुग्णांचा मृत्यूदर देखील कमी झाला आहे.

सध्या देशात एकून सक्रीय रुग्णांची संख्या 6,73,166 इतकी असून एकून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत हा दर 24.91% इतका आहे. देशात कोविडची रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याचेच या आकड्यांवरुन सिध्द झाले आहे.

देशभरात कोविडच्या चाचण्यांसाठीच्या प्रयोगशाळांमध्ये देखील सातत्याने वाढ होत आहे. सध्या देशात, एकूण 1476 प्रयोगशाळांमध्ये कोविडच्या चाचण्या होत आहेत. त्यापैकी 971 प्रयोगशाळा सरकारी तर 505 प्रयोगशाळा खाजगी आहेत.

यात,

• रियल टाईम RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 755 (सरकारी: 450 + खाजगी: 305)

• TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 604 (सरकारी: 487 + खाजगी: 117)

• CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा : 117 (सरकारी: 34 + खाजगी: 83)

 

इतर अपडेट्स:

भारत आणि अमेरिकेच्या संशोधकांचा समावेश असलेल्या आठ द्विपक्षीय दलांना भारत -अमेरिका व्हर्च्युअल नेटवर्क्सच्या माध्यमातून कोविड-19 आजार आणि त्याच्या व्यवस्थापनामध्ये अत्याधुनिक संशोधन करण्यासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या संशोधन क्षेत्रांमध्ये अँटीव्हायरल कोटिंग्ज, इम्म्युन मॉड्युलेशन, सांडपाण्यात सार्स सीओव्ही-2 चे ट्रॅकिंग, रोग शोधण्याची यंत्रणा, रिव्हर्स जेनेटिक रणनीती आणि औषधांचा बहुउद्देशीय वापर यांचा समावेश आहे.

प्रशासनावरील राष्ट्रीय तज्ञ गटाने देशातील आघाडीचे लस उत्पादक-सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे, भारत बायोटेक, हैदराबाद; झायडस कॅडिला, अहमदाबाद; जिनोवा बायोफार्मास्युटिकल्स, पुणे; आणि बायोलॉजिकल ई, हैदराबाद.यांची भेट घेतली. ही बैठक परस्पर हिताची आणि परिणामकारक होती. या बैठकीत राष्ट्रीय तज्ज्ञ गटाला देशातील उत्पादकांकडून तयार करण्यात येत असलेल्या विविध ींच्या सध्याच्या टप्प्याविषयी तसेच केंद्र सरकारकडून त्यांच्या अपेक्षांबाबत माहिती देण्यात आली.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून 20.05.2020 ला आंशिक पत हमी योजना (पीसीजीएस) 2.0 सुरु करण्यात आली. एनबीएफसी, एचएफसी,एमएफआय कडून जारी AA किंवा त्याखालील रेटिंग असणारे रोखे किंवा कमर्शियल पेपर (सीपी), सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून खरेदी करण्यासाठी पोर्ट फोलिओ हमी पुरवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार सांख्यिकीनुसार 2017 मधील जागतिक कृषी व्यापारात भारताच्या कृषी निर्यातीचा आणि आयातीचा हिस्सा अनुक्रमे 2.27% आणि 1.90 % होता. महामारीमुळे लॉकडाऊनच्या कठीण काळातही, जागतिक अन्न पुरवठा साखळीत खंड पडू नये यासाठी भारताने काळजी घेतली आणि निर्यात सुरूच ठेवली. मार्च 2020 ते जून 2020 या कालावधीत कृषी वस्तूंची निर्यात 25552.7 कोटी रुपये झाली असून 2019 मधील याच कालावधीतील 20734.8 कोटी रुपये निर्यातीच्या तुलनेत त्यात 23.24% वाढ झाली आहे.

पोलाद आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्थलांतरीत कामगारांना कमी किंमतीमध्ये घर उपलब्ध करून देण्यासाठी पोलाद उद्योजकांनी सरकार सोबत भागीदारी करावी असे आवाहन केले आहे. आज नवी दिल्ली येथे 'आत्मनिर्भर भारत: गृहनिर्माण व बांधकाम आणि उड्डयन क्षेत्रातील पोलाद वापर' या विषयावर आयोजित वेबिनार मध्ये मुख्य अतिथी म्हणून संबोधित करताना त्यांनी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या योजनेचा उल्लेख करत पीएसयू आणि स्टील उद्योजकांनी या प्रकल्पात सरकार सोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले. अशी एक लाख घरे उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे परंतु या उद्योगाने पोलादाचा वापर अधिक असणारी, कमी किंमतीची घरे बधली पाहिजेत, जे इतरांसाठी एक मॉडेल असेल असे प्रधान म्हणाले.

आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आज दिल्लीत अनेक उपक्रमांची घोषणा केली, यामध्ये आदिवासी आरोग्य आणि पोषण पोर्टल – ‘स्वास्थ्य’ आणि आरोग्य व पोषण विषयक ई-वृत्तपत्र आलेख (ALEKH); तसेच नॅशनल ओवरसीज पोर्टल आणि राष्ट्रीय आदिवासी शिष्यवृत्ती पोर्टल सुरु करणे यांचा समावेश आहे. यावेळी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा, आदिवासी व्यवहार राज्यमंत्री. रेणुकासिंग सरुता उपस्थित होत्या.

एनईपी 2020 मुळे आपल्या देशात येणारी सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे बहुविध विषय, बहुविध संकल्पना, बहुविध भाषांवर लक्ष केंद्रीत केले जाईल असे मत आयआयएम इंदूरचे संचालक प्रा. हिमांशू राय यांनी व्यक्त केले. प्रादेशिक आउटरिच ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांनी पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभाग यांच्या सहकार्याने आज (18 ऑगस्ट 2020) “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: भारतातील उच्च शिक्षणासाठी नवी दृष्टी” या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले होते त्यावेळी राय बोलत होते. दुबईतील माकेडेमिया एज्युकेशन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ सुब्रमण्यम कृष्णमूर्ती यांनी जगभरातील विचारवंतांनी मांडलेल्या मतांच्या आधारे या धोरणाबद्दल त्यांनी त्यांचे परीक्षण मांडले.

 

महाराष्ट्र अपडेट्स :

पुण्यातील सेरॉलॉजिकल सर्व्हेक्षणाच्या निष्कर्ष असे सूचित करत आहे की 50 टक्के हुन अधिक जनतेला यापूर्वीच कोरोना विषाणू संक्रमण झालेले आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या अन्य काही शहरांमध्ये केलेल्या अशाच सेरॉलॉजिकल सर्वेक्षणांच्या निष्कर्षांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. मात्र या निष्कर्षांमुळे पुण्यातील निम्म्या जनतेमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे असा अर्थ काढू नये असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. सर्वच अँटीबॉडीज संरक्षक नसतात. केवळ विषाणू निष्क्रिय करू शकणाऱ्या अँटीबॉडीज व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारक्षमता निर्माण करू शकतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पुण्यात एकूण 1.32 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईला मागे टाकत पुणे, महाराष्ट्रातील नवीन कोविड हॉटस्पॉट बनले आहे.

 

FACT CHECK

****

B.Gokhale/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1646798) Visitor Counter : 16