Posted On:
28 JUL 2020 8:15PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 28 जुलै 2020


(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)

पंतप्रधान मोदी उद्या संध्याकाळी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील हितधारकांबरोबर भविष्यासाठी कल्पना आणि रुपरेषेबाबत व्यापक चर्चा करणार आहेत. चर्चेच्या मुद्द्यांमध्ये पत उत्पादने आणि सेवेसाठी कार्यक्षम मॉडेल्स, तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक सबलीकरण, वित्तीय क्षेत्राची स्थिरता आणि शाश्वतता यासाठी धोरणात्मक पद्धती यांचा समावेश आहे. वित्तपुरवठा संबंधी पायाभूत सुविधा, शेती, एमएसएमईसह स्थानिक उत्पादन याद्वारे भारताच्या आर्थिक वाढीत योगदान देण्यात बँकिंग क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. तंत्रज्ञानाद्वारे वित्तीय सबलीकरणामध्ये आर्थिक समावेशकता मोठी भूमिका पार पाडू शकेल. सरकारमधील वरिष्ठ अधिकारीही या संवादात सहभागी होतील.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारताच्या कोविड मृत्यू दरात आणखी घट होत तो आता 2.25% इतका झाला आहे. जागतिक स्तरावर सर्वात कमी मृत्युदर असणाऱ्या देशांमध्ये असलेले स्थान भारताने कायम राहिले आहे. प्रतिबंधात्मक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, अधिकाधिक कोविड चाचण्या, सर्वांगीण वैद्यकीय उपचार सेवेवर आधारित वैद्यकीय व्यवस्थापन नियमावली, रुग्णालय यंत्रणांवरचा ताण कमी करण्यासाठी लक्षणविरहीत रुग्णांसाठी वैद्यकीय देखरेखेखाली गृह अलगीकरण या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणून मृत्युदर सतत कमी होत आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांनी कोविड मुळे होणारे मृत्यू कमी करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी गंभीर लक्षणे असलेल्या तसेच कोविडची रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने प्रभावीपणे व्यवस्थापन केले जात आहे. यामुळे देशभरात कोविड मृत्यू दरात घट दिसून येत आहे. जूनच्या मध्यावर 3.33 टक्के असलेला हा मृत्यदर आज 2.25 टक्के इतका झाला आहे.
तीन स्तरीय आरोग्य सुविधा आणि रुग्ण व्यवस्थापन यामुळे रुग्ण बरे होण्याचा दरही सातत्याने सुधारत आहे. प्रतिदिन तीस हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचा आजचा सलग पाचवा दिवस आहे. केंद्र व राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांचा रोख हा अधिकाधिक कोविड चाचण्या करून लवकरात लवकर बाधित रुग्ण शोधणे आणि त्यांचे विलगीकरण करून त्वरित वैद्यकीय व्यवस्थापन करण्यावर आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर जूनच्या मध्यावर 53 टक्के होता तो आज 64 टक्क्यांहून अधिक झाला आहे. गेल्या 24 तासात 35,176 इतके रुग्ण बरे झाले असून यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9,52,743 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सुधारणा होत असल्यामुळे सक्रिय रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांच्यातील तफावत देखील वाढते आहे. सध्या हा फरक 4,55,755 इतका आहे. म्हणजेच सध्या 4,96,988 इतके सक्रिय रुग्ण असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
इतर अपडेट्स:
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी, (डीआयएटी) या पुण्याच्या अभिमत विद्यापीठाने कोविड रूग्णाकडून संक्रमित होणाऱ्या विषाणूचा / संसर्गाचा प्रसार थांबवून / कमी करुन कोविड- 19 चा सामना करण्यासाठी आश्रय ही एक वैद्यकीय बेड अलगीकरण प्रणाली विकसित केली आहे. श्वासोच्छवासाजवळ सक्शन / नकारात्मक दबाव निर्माण करून आणि एरोसोलचे फिल्टरिंग आणि निर्जंतुकीकरण करून कोविड -19 रूग्णांचे योग्य अलगीकरण राखण्यासाठी हा कमी खर्चाचा, पुनर्वापराचा उपाय आहे.
सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड -19 हेल्थ क्रिसिस (कवच ), या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) उपक्रमाने लिफास कोविड स्कोअर नावाचे कोविड जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल विकसित करण्यासाठी बंगळुरूमधील स्टार्टअप अकुली लॅबची निवड केली आहे. अकुली लॅब कडे लवकर निदान , मूळ कारण विश्लेषण, तीव्र जोखीम मूल्यांकन, रोगनिदान आणि दीर्घकालीन रोगांवर घरी देखरेख यासाठी 'लिफास' हे क्लिनीकल-ग्रेड, नॉन-इन्व्हेसिव्ह , डिजिटल फंक्शनल बायोमार्कर स्मार्टफोन साधन आहे. राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळ (एनएसटीईडीबी), डीएसटी, केंद्र सरकार यांचा कवच हा उपक्रम कोविड च्या नियंत्रणासाठी बाजारात आणण्यासाठीच्या नवकल्पना आणि स्टार्टअप कल्पनांना बळ देत आहे.
जागतिक हेपेटायटीस दिनानिमित्त दुसरी एम्पथी ई-परिषद आयोजित करण्यात आली. याला लोकसभा सभापती ओम बिरला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद (डिजिटली सहभाग) उपस्थित होते. केंद्रिय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सन्माननिय अतिथीपद भुषवले. यकृत आणि पित्तशास्त्र संस्थेने (ILBS) भारतीय विमानतळ प्रधिकरणाच्या सहयोगाने संसद सदस्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला. कोविड-19 महामारीशी लढा देताना गेल्या चार महिन्यांपासून SARS-Cov-2 नमुने तपासणीसाठी डॉ एस के सरीन तसेच यकृत आणि पित्तशास्त्र संस्थेची (ILBS) संपूर्ण टीम घेत असलेल्या अथक कष्टांबद्दल हर्षवर्धन यांनी त्यांचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. या दिशेने रेल्वे आणि वाणिज्य-उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनीही पुढाकार घेतला आहे. देशाला आत्मनिर्भर बनवण्याबरोबरच जगामध्ये देश सामर्थ्यवान बनला पाहिजे, याचा विचार करून भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी या कंपनीने आणि भारतीय स्टेट बँकेने एकत्र येवून ‘रूपे’ माध्यमातून नवीन संपर्कविरहित क्रेडिट कार्ड प्रचलनामध्ये आणले आहे. हे नवीन कार्ड रेल्वे आणि वाणिज्य-उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी देशाच्या सेवेसाठी आज समर्पित केले.
जैव तंत्रज्ञान विभागाच्या नॅशनल बायोफार्मा मिशन अंतर्गत रीकॉम्बीनंट बीसीजी लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या आयोजित करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसआयआयपीएल) ला सहाय्य देण्यात आले आहे. या चाचणीचा हेतू उच्च-जोखीम असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा सह-आजार आणि उच्च-जोखीम असणार्या आरोग्यसेवा (एचसीडब्ल्यू) कर्मचाऱ्यांमधील संसर्ग कमी करणे आणि कोविड-19 चे गंभीर परिणाम कमी करण्यामध्ये व्हीपीएम 1002 च्या क्षमतेचे मूल्यांकन करणे हा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 4 जुलै रोजी प्रारंभ केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत ॲप इनोव्हेशन चॅलेंज’ला देशभरातल्या तंत्रज्ञ उद्योजक आणि स्टार्टअप्सकडून अतिशय उत्साही प्रतिसाद मिळाला आहे. आव्हानामध्ये सहभागी होण्यासाठी दि. 26 जुलै ही अंतीम तारीख देण्यात आली होती. या काळामध्ये वेगवेगळ्या आठ श्रेणींमध्ये 6,940 प्रवेशिका आल्या आहेत. यामध्ये 3939 जणांनी व्यक्तिगत प्रवेशिका दाखल केल्या आहेत. तर 3,001 वेगवेगळ्या कंपन्या आणि संस्थांचा समावेश आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री रामविलास पासवान यांच्या हस्ते भारतीय मानक ब्युरोच्या मोबाईल अॅप ‘बीआयएस केअर’ आणि तीन पोर्टल- प्रमाणीकरण, अनुरुप मुल्यांकन आणि ई-बीआयएसचे प्रशिक्षण पोर्टलचा www.manakonline या संकेतस्थळावर ग्राहकांसाठी शुभारंभ करण्यात आला. बीआयएस-केअर मोबाईल अॅप सर्व अँड्रॉईड फोनच्या माध्यमातून वापरता येईल. हे अॅप हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असून ते गुगल प्ले स्टोअरवरुन मोफत डाऊनलोड करता येईल. ग्राहक या अॅपचा वापर करुन आयएसआय-मार्क व हॉलमार्क उत्पादनांच्या सत्यतेची पडताळणी करु शकतात आणि तक्रारी नोंदवू शकतात. ग्राहकांचे हित जपण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलले असल्याची मंत्री म्हणाले.
देशामध्ये मोठ्या प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय उपकरणे उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय रसायन व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे औषधनिर्मिती विभागाच्या चार योजनांचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी बोलताना गौडा म्हणाले की हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार आणि औषध निर्मिती क्षेत्रामध्ये भारताला आत्मनिर्भर करण्याच्या त्यांच्या आवाहनाला हे अनुसरून आहे. यासाठी भारत सरकारने मोठ्या प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय साधनांच्या पार्कसाठी प्रत्येकी चार योजना मंजूर केल्या आहेत. उद्योग व राज्यांना पुढे येऊन योजनांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात कोविड रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूत सर्वाधिक वाढ झाल्यानंतर सोमवारी कोविड रुग्ण संख्या आणि मृत्यू यामध्ये घट झाली. तसेच सोमवारी नवीन रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात सोमवारी 7,924 नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या 13 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. या 7,924 रुग्णांपैकी 1,033 रुग्ण मुंबईतील आहेत. राज्यात 8,706 रुग्ण बरे झाले आहेत, यापैकी 1,706 मुंबईतील आहेत. राज्यात कोविडचे एकूण 3.83 लाख रुग्ण असून यापैकी 1.47 लाख सक्रिय रुग्ण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय संस्थेमध्ये दीर्घ क्षमतेचे कोविड19 चाचणी सुविधा केंद्र सुरू केल्यामुळे कोविड चाचण्यांना चालना मिळाली आहे.


****
B.Gokhale/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com