Posted On:
25 JUL 2020 8:10PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 25 जुलै 2020



(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)


आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारतात पहिल्यांदाच 4,20,000पेक्षा जास्त अशा सर्वाधिक कोविड चाचण्या एकाच दिवसात करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,20,898 नमुने तपासण्यात आले, दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या चाचण्यांच्या संख्येत वाढ होऊन आता ही संख्या 11,485 झाली असून एकूण चाचण्यांची संख्या 1,58,49,068 झाली आहे. दोन्हीतही सातत्यने वाढ दिसत आहे.
प्रयोगशाळांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. 2020 च्या जानेवारीत एकच प्रयोगशाळा होती आता ही संख्या 1301 झाली आहे. यामध्ये 902 सरकारी तर 399 खाजगी प्रयोग शाळांचा समावेश आहे. चाचण्यांसाठी आयसीएमआर कडून सुधारित मार्गदर्शक तत्वे आणि सरकारकडून होणारे सर्वतोपरी प्रयत्न यामुळे चाचण्यांची व्यापकता वाढण्यासाठी मदत झाली आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना तपासणी, शोध आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना केल्या असून त्याबरोबरीने चाचण्याही मोठ्या प्रमाणात करण्याचे धोरण अवलंबावे असे सांगितले आहे. यामुळे सुरवातीला रुग्णांची संख्या वाढलेली दिसली तरी त्यानंतर ती हळूहळू घटत जाईल, दिल्ली , राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये केंद्र सरकारच्या लक्ष्य केंद्री प्रयत्नामुळे याची प्रचीती आली आहे.
सर्वंकष प्रमाणित देखभाल दृष्टिकोनावर आधारित प्रभावी आणि प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन नियमामुळेमृत्यू दरात घट होत आहे याचाच अर्थ केंद्र आणि राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नातून कोविड- 19 मृत्यू दर कमी होत आहे. आज हा दर 2.35% आहे. भारतातला मृत्यू दर हा जगातल्या सर्वात कमी मृत्यू दरापैकी एक आहे.
गेल्या 24 तासात 32,223 कोविड रुग्ण बरे झाले. बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 8,49,431झाली. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 63.54%. झाला आहे. बरे झालेले आणि सक्रीय कोविड-19 रुग्ण यांच्यातले अंतर वाढून 3,93,360 झाले आहे.
इतर अपडेट्स:
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन निर्माण भवन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) आरोग्यमंत्र्यांच्या डिजीटल बैठकीत सहभागी झाले होते. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सध्याचे कोविड संकट हा या बैठकीचा मुख्य विषय होता. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या संबोधनाच्या सुरुवातीलाच कोविड-19 मुळे जगभरात झालेल्या मृत्यूविषयी शोक व्यक्त केला. या महामारीवर नियंत्रणासाठी भारताच्या राजकीय कटीबद्धतेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, कशाप्रकारे पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घातले आणि प्राणघातक विषाणूचा प्रसार रोखण्यास सक्रीय आणि वर्गीकृत प्रक्रिया निश्चित केली. डॉ. हर्षवर्धन यांनी कोविड महामारीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने योजलेल्या उपायांची तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले की, सरकारने क्रमबद्ध पद्धतीने निर्णय घेतले यात प्रवाशांसाठी सूचना प्रसिद्ध करणे, शहर वा राज्यांमध्ये प्रवेशावेळी देखरेख ठेवणे, समुदाय आधारीत देखरेख, प्रयोगशाळा तसेच रुग्णालयांची क्षमता वाढवणे, कोविड संकट तसेच या विषाणुच्या संक्रमणासंदर्भातील विविध बाबींसंबंधी तांत्रिक सूचनांचा व्यापक प्रसार करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, टाळेबंदीच्या काळात भारतात तांत्रिक ज्ञान वाढवणे, प्रयोगशाळांचा क्षमता विस्तार, रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा आणि औषधी आणि गैर-औषधी उपचारांसाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळाली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान संवाद राष्ट्रीय परिषद आणि विज्ञान प्रसार या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेने, विज्ञान कम्युनिकेटर्सची फळी निर्माण करण्यासाठी एडब्ल्यूएसएआर कार्यक्रमा अंतर्गत संशोधन प्रतिभावंतांच्या क्षमता वृद्धीसाठी ‘पॉप्युलर सायन्स रायटिंग’ या संदर्भात या आठवड्यात दोन वेबिनार आयोजित केले होते. 28 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले तसेच अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, इस्रायल सह 12 देशातले प्रतिभावंत यात सहभागी झाले. विज्ञाना संदर्भात देवाण-घेवाणीचे महत्व, संशोधनातून लोकप्रिय लेख लिहिणे आणि पॉप्युलर सायन्स रायटिंग’ संदर्भातले तंत्र आणि उपयुक्त माहिती यावेळी देण्यात आली.
एनबीएफसी आणि एचएफसी यांच्यासाठी 30,000 कोटी रुपयांची विशेष तरलता योजना, 1 जुलै 2020 पासून लागू करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 13 मे 2020 रोजी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये घोषणा केल्यानूसार याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एका विशेष उद्देशीय कंपनी (एसपीव्ही) च्या माध्यमातून एनबीएफसी/एचएफसी यांच्या रोकड प्रवाहात सुधारणा करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे, ज्यामुळे आर्थिक क्षेत्राचा कोणत्याही संभाव्य संकटापासून बचाव करता येईल.
24 जुलै 2020 रोजी भारत आणि ब्रिटनच्या 14 व्या संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीची आभासी बैठक पार पडली. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री श्रीमती एलिझाबेथ ट्रस्स यांच्या सह-अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यांना वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी आणि ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री रानिल जयवर्धना यांनी सहकार्य केले. दोन्ही देशांनी विशेषतः कोविड-19 महामारी लक्षात घेऊन आरोग्य क्षेत्रात सहकार्य करण्याचा संकल्प केला.
पुणेस्थित मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने पॅथोडिटेक्ट या कोविड-19 चाचणी कीटचे उत्पादन वाढवले आहे. जैवतंत्रज्ञान विभागाच्या (डिबीटी) नॅशनल बायोफार्मा मिशन आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी)च्या धोरणात्मक निधीच्या मदतीने उत्पादन वाढवले आहे.
कोविड-19 विरोधातील लढाईसाठी जैवतंत्रज्ञान विभागाचा संशोधन आणि विकासासाठी जलद नियामक आराखडा : कोविड-19 विरोधातील लढ्यात जैवतंत्रज्ञान विभागाने संशोधन आणि विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी अधिसूचना जाहीर केल्या आहेत
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सहयोगातून संशोधन आणि विकास तंत्रज्ञान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. भारतातली महत्वाची संस्था- एफआयसीसीआय म्हणजेच ‘फिक्की’ आणि रशियातल्या एफएएसआयई यांच्या भागीदारीतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये भारत आणि रशिया संयुक्त तंत्रज्ञान मूल्यांकन, स्टार्टअप्ससाठी संयुक्त संशोधन तसेच तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भागीदारी करणार आहेत.
केंद्र सरकारचा कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, कोविड 19 महामारीच्या काळात शेतकर्यांना आणि शेतीविषयक कामांना सुलभ बनवण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात समाधानकारक प्रगती झाली आहे. खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत तांदूळ, डाळी, भरड धान्ये आणि तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे तसेच रबी पणन हंगाम 2020-21 मध्ये भारतीय अन्न महामंडळाने 389.75 एलएमटी गव्हाची खरेदी केली.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी “भारतात राहा आणि भारतात शिका” या संदर्भात मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि स्वायत्त/तांत्रिक संस्थांचे प्रमुख यांच्यासोबत एका विचारमंथन सत्राचे आयोजन केले होते. बैठकीप्रारंभी निवेदन करताना पोखरीयाल म्हणाले, कोविड-19 परिस्थितीमुळे परदेशी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता भारतातच राहून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बरेचसे भारतीय विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण होईल की नाही या चिंतेने भारतात परतत आहेत. या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या आवश्यकतांवर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने लक्ष पुरवले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
कोविडोत्तर काळात जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधारणेसाठी भारत आणि आसियानची अग्रणी भूमिका असेल, असे ईशान्य प्रांत विकास खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटले. ते म्हणाले, या दोघांचा भविष्यकाळ उज्जवल आहे, कारण दोघांमध्ये नवनवीन उंची गाठण्यासाठी समान धैर्य, धाडस आणि दृढनिश्चय आहे. ते म्हणाले, भारत आणि आसियानमधील व्यापारीक जवळीकता आणि सांस्कृतिक संबंधामुळे कोरोनानंतरच्या काळात दोघांना आर्थिक सुधारणेत मोठी आघाडी घेता येईल. आसियान महिला व्यावसायिक मंच, एफएलओ मुंबई शाखा आणि फिक्कीने आयोजित केलेल्या वेबिनारला डॉ जितेंद्र सिंग यांनी संबोधित केले.
महाराष्ट्र अपडेट्स :
केवळ आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन पूर्णपणे हटविण्याचे आपण समर्थन करत नाही, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. महामारीमुळे उद्भवणारी आव्हाने लक्षात घेऊन आरोग्य आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित विषयांमध्ये संतुलन साधण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोविडचे 9,615 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 3.57 लाख इतकी झाली आहे. यापैकी 1.43 लाख सक्रिय रुग्ण आहेत.

B.Gokhale/S.Pophale/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com