विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सहयोगातून संशोधन आणि विकास तंत्रज्ञान अनुकूलतेसाठी 15 कोटींचा निधी

Posted On: 24 JUL 2020 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2020


विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सहयोगातून संशोधन आणि विकास तंत्रज्ञान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. भारतातली महत्वाची संस्था- एफआयसीसीआय म्हणजेच ‘फिक्की’ आणि रशियातल्या एफएएसआयई यांच्या भागीदारीतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये भारत आणि रशिया संयुक्त तंत्रज्ञान मूल्यांकन, स्टार्टअप्ससाठी संयुक्त संशोधन तसेच तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भागीदारी करणार आहेत. 

या कार्यक्रमाला काल, दि.23 जुलै,2020 रोजी प्रारंभ झाला. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा म्हणाले, भारत आणि रशिया यांच्यामध्ये प्रदीर्घ काळापासून व्दिपक्षीय संशोधन सहकार्य करण्यात येत आहे. आता भारत आणि रशिया या देशांमध्ये संयुक्त तंत्रज्ञान मूल्यांकन आणि वाणिज्यिक कार्यक्रम सुरू होत आहे, त्यामुळे उभय देशातले विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संबंध दृढ करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यासारखे आहे. 

रशियाच्या एफएएसआयईचे महासंचालक सेर्जी पॉलिआकोव्ह यावेळी म्हणाले, भारत आणि रशिया संयुक्त मूल्यांकन आणि त्वरित वाणिज्यिक कार्यक्रम सुरू करण्यात आल्यामुळे खूप आनंद होत आहे.

‘फिकी’चे सरचिटणीस दिलीप चिनॉय यावेळी म्हणाले, या तंत्रज्ञान मूल्यांकन आणि वाणिज्यिक कार्यक्रमामुळे दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक बळकटी आणण्यासाठी उभय देश कटिबद्ध असल्याचे लक्षात येते. 

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार आणि प्रमुख एस के वार्ष्‍णेय यावेळी म्हणाले, उभय देशांमध्ये अनेक दशकांपासून विज्ञान तसेच तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यात येत आहे. त्यामुळे ज्ञानवर्धन होत आहे. तसेच विकास संस्थांची निर्मिती होण्यासाठी मदत होत आहे. ज्ञानाचा विनियोग उत्पादनाच्या निर्मितीमध्ये रूपांतरित करण्याची आज खरी गरज आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमामुळे भारत तसेच रशियामधल्या वैज्ञानक, उत्पादक,  यांना दोन देशांमध्येच नाही तर वैश्विक स्तरावर निर्माण होत असलेल्या समस्या, आव्हाने यांच्यावर उपाय शोधून मात करण्यासाठी संयुक्तरितीने जोडता येणार आहे. 

या कार्यक्रमानुसार  पाच प्रकल्पांपर्यंत प्रत्येकी दोन वार्षिक चक्रांतर्गत निधी देण्यात येणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सहकार्य आवश्यक असलेल्या प्रकल्पांची निवड यासाठी करण्यात येणार आहे. यामध्ये आयटी, आयसीटी (एआय, एआर,व्हीआर यांचाही समावेश आहे.) वैद्यकीय आणि औषधोपचार, नवीकरणीय ऊर्जा, अंतराळ, पर्यायी तंत्रज्ञान, पर्यावरण, नवीन साहित्य, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा विचार करण्यात येणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने ‘फिक्की’ हा कार्यक्रम भारतामध्ये राबविणार आहे. 

या योजनेनुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने भारतातल्या दहा एसएमईएस किंवा स्टार्टअप्स यांना ‘फिक्की’कडून दोन वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येईल. तसेच रशियातल्या संबंधित उद्योगांना एफएएसआयईकडून निधी देण्यात येईल. 

या कार्यक्रमासाठी दोन व्यापक श्रेणी तयार करण्यात आल्या असून, त्याअंतर्गत इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या अर्जांचा विचार संयुक्त भागीदारी प्रकल्प आणि तंत्रज्ञान हस्तांतर करणे अथवा स्वीकारणे यानुसार करण्यात येणार आहे. पहिल्या फेरीसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत दि. 30 सप्टेंबर, 2020 आहे. या संयुक्त कार्यक्रमासाठी समर्पित एक पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यावर इच्छुकांना अधिक तपशील मिळू शकेल. www.indiarussiainnovate.org
 

7 3 
* * *

U.Ujgare/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1640885) Visitor Counter : 236