ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय

कोविडोत्तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीसाठी भारत-आसियानची अग्रणी भूमिका: डॉ जितेंद्र सिंग

Posted On: 24 JUL 2020 10:16PM by PIB Mumbai

 

कोविडोत्तर काळात जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधारणेसाठी भारत आणि आसियानची अग्रणी भूमिका असेल, असे ईशान्य प्रांत विकास खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटले. ते म्हणाले, या दोघांचा भविष्यकाळ उज्जवल आहे, कारण दोघांमध्ये नवनवीन उंची गाठण्यासाठी समान धैर्य, धाडस आणि दृढनिश्चय आहे. ते म्हणाले, भारत आणि आसियानमधील व्यापारीक जवळीकता आणि सांस्कृतिक संबंधामुळे कोरोनानंतरच्या काळात दोघांना आर्थिक सुधारणेत मोठी आघाडी घेता येईल. आसियान महिला व्यावसायिक मंच, एफएलओ मुंबई शाखा आणि फिक्कीने आयोजित केलेल्या वेबिनारला डॉ जितेंद्र सिंग यांनी संबोधित केले.

मंत्री म्हणाले, आसियानसोबत व्यापार आणि व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी ईशान्य भारताची विशेष भूमिका असेल, कारण दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या आर्थिक विकासाचा तो महामार्ग आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी “लुक ईस्ट” धोरणात बदल करुन  ते “अ‍ॅक्ट ईस्ट” केले. 

डॉ जितेंद्र सिंग म्हणाले, गेल्या सहा वर्षांत रस्ते, रेल्वे आणि हवाई जोडणीत महत्त्वपूर्ण विकास घडून आला आहे. भारत-बांगलादेश परिक्षेत्र हस्तांतरण करारामुळे व्यापार, दळणवळण आणि प्रवास सुलभ झाला आहे, जी पूर्वी एक क्लिष्ट प्रक्रिया होती. लवकरच बांग्लादेश आणि त्रिपुरादरम्यान रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. तसेच सरकार जलमार्गाचाही (ब्रह्मपूत्रा ते बंगालचा उपसागर) पर्याय शोधत आहे, ज्यामुळे इतर देशांशी व्यापार, व्यवसाय आणि स्वस्त वाहतूक सुलभ होईल.

 

डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले की, महिला व महिला बचतगटांनी सर्वांगीण विकासात्मक भूमिका बजावणे ही महिला मुक्ती आणि महिला सबलीकरणाचे एक प्रमुख उदाहरण आहे. संक्रमण परिस्थितीतही, ईशान्येकडील महिलांनी पुढाकार घेऊन सॅनिटायजर आणि सुंदर मास्कची निर्मिती करुन मोठ्या प्रमाणावर वितरण केले. ते म्हणाले की, महामारीविरूद्धच्या लढ्यात महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि कोरोना व्यवस्थापनाचे मॉडेल म्हणून उदयास येण्यासाठी ईशान्य प्रदेशास मदत केली आहे.

कोविडनंतर आर्थिक पुनरुज्जीवनासाठी बांबूची महत्त्वाची भूमिका असेल आणि भारत आणि आसियान एकत्रितपणे पूर्ण क्षमतेचा वापर करतील. ते म्हणाले की ईशान्य प्रांत कोरोना मुक्त राहून जगासाठी पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येईल.

डॉ जितेंद्र सिंग यांनी याप्रसंगी भारत-आसियान संयुक्त महिला सहकार्याचा शुभारंभ केला. शाश्वत विकासासंबंधीच्या धोरणामुळे मंत्र्यांना हरित प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.  

***

M.Iyangar/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641230) Visitor Counter : 131