PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 23 JUL 2020 7:28PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, July 23, 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शालेय पुस्तकांमध्ये तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी महान राष्ट्रीय नेते आणि स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, देशभक्ती आणि पराक्रमाच्या गाथांचा समावेश करावा, असे म्हटले. उपराष्ट्रपतींनी आज फेसबुक पोस्टमध्ये महान स्वातंत्र्यसैनिक- बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि आपल्या महान देशासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न साकारण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावे, असे म्हटले.

मणिपूर जलपुरवठा प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आजचा हा कार्यक्रम हा संदेश देणारा आहे, की कोरोनाच्या या संकटकाळात देखील देश थांबलेला नाही, देशाच्या विकासाची वाट थांबलेली नाही. जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही, तोपर्यंत आपल्याला कोरोनाच्या विरुद्ध मजबूत लढा देत राहायचे आहे, आणि विजयी देखील व्हायचे आहे. त्याचवेळी, विकासाच्या कामात देखील संपूर्ण ताकदीनिशी पुढे जायचे आहे.

टाळेबंदीमुळे किंवा घरीच राहण्याच्या आदेशाचे पालन करताना सर्वसाधारण दिनक्रमात व्यत्यय आल्याने लोकांच्या मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे.हे सर्वांच्या बाबतीत आहेअसे मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या आरोग्य आणि मानसिक आरोग्य केंद्राच्या प्रा. आशा बानो सॉलेटी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या कि मुले आणि विद्यार्थी, प्रौढ आणि वृद्ध, महिला, तृतीयपंथी समुदाय, आरोग्य सेवा व्यावसायिक आणि अत्यावश्यक सेवा प्रदाते, आर्थिकदृष्ट्या असुरक्षित गट, शोकग्रस्त कुटुंबे आणि अर्थातच अपंग व्यक्ती आणि मानसिक आरोग्याच्या पूर्व समस्याग्रस्त व्यक्ती अशा कित्येकांच्या मनावर कोविड-19 चा बराच पगडा आहे. पणजी स्थित गोवा इन्स्टिटयूट ऑफ होम सायन्सेस आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) आणि प्रादेशिक आऊटरिच कार्यालय (आरओबी) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘कोविड-19 च्या काळात मानसिक आरोग्य’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये त्या आज बोलत होत्या.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे.  गेल्या 24 तासात आतापर्यंत एका दिवशी नोंद झालेल्या पैकी सर्वात जास्त म्हणजे 29,557 रुग्ण बरे होऊन घरी परतले,  तर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 7,82,606 वर पोहोचली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या  रुग्णांचे प्रमाण वाढून ते 63.18 टक्के पर्यंत पोचले आहे.  बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्णांच्या संख्येतील तफावत वाढून ती आता 3,56,439 झाली आहे.

या यशाचे श्रेय केंद्र सरकारच्या कोविड -19 व्यवस्थापन धोरणाला जाते. केंद्र सरकार व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे प्रभावी प्रतिबंध, आक्रमक पद्धतीने केलेल्या तपासण्या, आणि त्वरित व प्रभावी वैद्यकीय उपचार शक्य झाले आहेत. या सर्व धोरणासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विषय तज्ञांच्या पथकाचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यात संयुक्त निरीक्षक गट (JMG) तसेच नवी दिल्ली इथल्या अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्थेचे(AIIMS) तंत्रज्ञ,  विविध राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील गुणवत्तापूर्ण वैद्यकीय केंद्रे, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था आणि एनसीडीसी यांचेही सहकार्य मिळाले आहे.  अधिक रुग्ण संख्या असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकार तर्फे तज्ञांची पथके जाऊन सल्ला देत आहेत. तसेच केंद्र सरकारने   अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्थेच्या(AIIMS) तज्ञांद्वारे कोविड संबंधात दूरध्वनीद्वारे वैद्यकीय सल्ला मिळण्याची सोय केली आहे.  या सर्वांचा परिणाम म्हणून कोविड मुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी होत आता  2.41 टक्के इतका राहिला आहे.

यामुळे  रुग्णांचा आकडा ही कमी होत आता सक्रिय रुग्णसंख्या केवळ 4,26, 167 इतकी राहिली आहे.

इतर

  • इंडिया आयडीयाज समिट’ अर्थात भारत संकल्पना परिषद या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण झाले. भारत-अमेरिका व्यवसाय परिषदेने(USIBC) ही शिखर परिषद आयोजित केली आहे. यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना ‘उत्तम भविष्याची उभारणी’ही आहे.भारत-अमेरिका व्यवसाय परिषदेच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी या परिषदेचे अभिनंदन केले. भारत-अमेरिकेतील वित्तीय भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी USIBC च्या नेतृत्वाने दाखवलेल्या कटिबद्धतेबाबत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
  • संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)ने लेह मधल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च (दिहार) येथे कोविड-19 ची चाचणी सुविधा सुरू केली आहे. लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी तसेच बाधित रुग्णांच्या देखरेखीसाठी या सुविधेचा उपयोग होईल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची(ICMR) सुरक्षा मानके तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे या चाचणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्‌घाटन 22 जुलै 2020 रोजी नायब राज्यपाल आर के माथूर यांच्या हस्ते करण्यात आले.
  • भारतीय प्रतिस्पर्धा आयोग-सीसीआयने कृष्णापट्टणम पोर्ट कंपनी लिमिटेडच्या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे. अदानी पोर्टस् व स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडद्वारा हे अधिग्रहण होणार आहे. प्रस्तावित अधिग्रहणामुळे अदानी पोर्टस् आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (अदानी पोर्टस्) कडून कृष्णापट्टनम पोर्ट कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय नियंत्रणासह इक्विटी शेअरहोल्डिंगचे अधिग्रहण करण्याचा मार्ग मोकळा होईल.
  • फार्मर प्रोड्यूसर कंपनी तर्फे उत्पादित होणाऱ्या कृषी उत्पादनांमध्ये उत्पादन खर्च कमी होईल अशा रीतीने उत्पादनांचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये विपणन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले. एम.एस.एम.ई. क्षेत्रातील कृषी क्लस्टर डेव्हलपमेंट या विषयावरील वेबीनारला ते संबोधित करत होते. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार विकास महात्मे, एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूरचे संचालक डॉ. पार्लेवार उपस्थित होते.
  • भारतीय अन्न महामंडळाच्या 21 जुलै 2020 च्या अहवालानुसार, सध्या महामंडळाकडे 253.28 लाख मेट्रिक टन तांदूळ आणि 531.05 लाख मेट्रिक टन गहू आहे. म्हणजेच एकूण 784.33 लाख मेट्रिक टन अन्नधान्य उपलब्ध आहे. (यात सध्या खरेदी सुरु असलेल्या गहू आणि तांदळाचा समावेश नाही) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांअंतर्गत वितरणासाठी दर महिन्याला 95 लाख मेट्रिक टन धान्याची आवश्यकता असते.
  • 11 एप्रिल 2020 पासून 21 जुलै 2020 पर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये 1 लाख 95 हजार 450 हेक्टर क्षेत्रावर टोळ सर्कल कार्यालये (एलसीओ) नियंत्रण मोहिम राबविण्यात आली. 21 जुलै 2020 पर्यंत राज्य सरकारांकडून राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड आणि बिहार राज्यातील 1 लाख 88 हजार 181 हेक्टर क्षेत्रावर नियंत्रण मोहिम राबविण्यात आली.

महाराष्ट्र अपडेट्स

राज्याने बुधवारी 10,576 ही आजवरची एका दिवसातील सर्वोच्च रुग्ण संख्या नोंदवली आणि राज्यातील एकूण संख्या 3,37,607 झाली आहे. परंतु 5,552 रुग्ण बरे झाल्याने राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या 1,36,980 आहे तर एकूण मृत्यू 12,556 झाले आहेत. महाराष्ट्र सरकार कोरोना रुग्णांसाठी मुंबई महानगर परिसरातील रुग्णशय्यांचे नियोजन करण्यासाठी एक कमांड सेंटर उभे करण्याचा विचार करत आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईचा समावेश आहे. त्याचबरोबर हेही स्पष्ट करण्यात आले आहे की राज्यामध्ये यापुढे मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन करण्यात येणार नाही कारण लोकांचे जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की की बरेच व्यवसाय आणि सेवा ज्यांमध्ये व्यायाम शाळा आणि शॉपिंग मॉल्सचा समावेश आहे ते सुरू करण्यासाठी प्रमाणित कार्यान्वयन पद्धती निर्माण करण्यात येत आहे.

***

MC/SP/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1640727) Visitor Counter : 45