पंतप्रधान कार्यालय

‘इंडिया आयडीयाज समिट’ मध्ये पंतप्रधान मोदी यांचे बीजभाषण


मजबूत राष्ट्रीय आर्थिक क्षमतांच्या बळावरच जगातिक वित्तीय लवचिकता साध्य करणे शक्य:पंतप्रधान

आत्मनिर्भर भारताच्या संकल्पातून समृध्द आणि लवचिक जगाच्या निर्मितीत मोठे योगदान देण्यास भारत सज्ज:पंतप्रधान

भारतात गुंतवणूक करण्यासाठी यापेक्षा अधिक अनुकूल काळ नाही: पंतप्रधान

भारत संधींची भूमी म्हणून उदयास येत आहे: पंतप्रधान

कोविड महामारीनंतर जगाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी भारत-अमेरिका भागीदारीची भूमिका महत्वाची ठरणार:पंतप्रधान

Posted On: 22 JUL 2020 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2020

‘इंडिया आयडीयाज समिट’ अर्थात भारत संकल्पना परिषद या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज बीजभाषण झाले. भारत-अमेरिका व्यवसाय परिषदेने(USIBC) ही शिखर परिषद आयोजित केली आहे. यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना ‘उत्तम भविष्याची उभारणी’ही आहे.

भारत-अमेरिका व्यवसाय परिषदेच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी या परिषदेचे अभिनंदन केले. भारत-अमेरिकेतील वित्तीय भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी USIBC च्या नेतृत्वाने दाखवलेल्या कटिबद्धतेबाबत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मजबूत आर्थिक क्षमतांच्या बळावर जागतिक वित्तीय लवचिकता साध्य करण्याचे लक्ष्य

आपल्या विकासाच्या अजेंड्याच्या केंद्रस्थानी दुर्बल आणि गरीब घटक असायला हवेत, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. उद्योगसुलभ वातावरणाइतकेच, जनतेचे जीवनमान सुखकर करणे महत्वाचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. कोविड-19 या आजारामुळे, बाह्य धक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी, जागतिक अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेचे महत्व आपल्याला समजले आहे. आणि ही लवचिकता मजबूत राष्ट्रीय आर्थिक क्षमतांमुळेच साध्य केली जाऊ शकते, असे पंतप्रधान म्हणाले. ‘आत्मनिर्भर भारता’चे बिगुल वाजवून भारत, समृद्ध आणि लवचिक जगाच्या निर्मितीत मोठे योगदान देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

मुक्त धोरण, संधी आणि पर्याय या तिन्ही गुणवैशिष्ट्यांसह भारताचे जगाला आमंत्रण 

भारतात आज अर्थव्यवस्थेविषयीचे मुक्त धोरण,विपुल संधी आणि पर्यायांचे उत्तम मिश्रण आहे, त्यामुळेच संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे. गेल्या सहा वर्षात, आपली अर्थव्यवस्था अधिकाधिक मुक्त आणि सुधारणाक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत, असे सांगत पंतप्रधान पुढे म्हणाले की, या सुधारणांमुळे पारदर्शकता, विस्तारित डीजीटायझेशन, व्यापक संशोधक आणि अधिक धोरण स्थैर्य निर्माण करता आले आहे.

अलीकडच्याच एका अहवालाचा दाखला देत पंतप्रधान म्हणाले की आता शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात इंटरनेटचे वापरकर्ते अधिक आहेत. भारत ही अपार संधींची  भूमी असल्याचे सांगत, आज भारतात सुमारे 50 कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत.त्यामुळे, आता 5G, बिग डेटा अनालीसीस, क्वांटम कॉम्पुटिंग, ब्लॉक-चेन आणि इंटरनेट ऑफ थिंग्स अशा तंत्रज्ञानात अनेक संधी उपलब्ध आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या विपुल संधी

भारतातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या विपुल संधी आपल्याला उपलब्ध आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. कृषी क्षेत्रात अलीकडेच करण्यात आलेल्या अनेक ऐतिहासिक सुधारणांचा त्यांनी उल्लेख केला. आणि कृषी उत्पादन, यंत्रे, शेतमाल, पुरवठा साखळी, अन्नप्रक्रिया क्षेत्र, मत्स्यव्यवसाय आणि सेंद्रिय उत्पादने अशा अनेक क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. देशातील आरोग्य क्षेत्र दरवर्षी 22 % पेक्षा अधिक वेगाने विकसित होत असल्याचे नमूद करत, वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय कंपन्यांची प्रगती, टेली-मेडिसिन आणि निदानशास्त्र यातील प्रगतीचा उल्लेख करत सध्या भारतातील आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्याची उत्तम  संधी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.   

त्याशिवाय ज्यात गुंतवणूक करता येईल, अशा अनेक क्षेत्रांचा त्यांनी उल्लेख केला. यात, उर्जा क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण, रस्ते, महामार्ग आणि बंदरे, नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात संधी असल्याचे सांगत ज्या कंपन्यांना भारतात उत्पादन करायचे आहे किंवा नागरी हवाई क्षेत्रात देखभाल, दुरुस्ती आणि इतर कार्यान्वयन उद्योग सुरु करण्यास अनुकूल संधी असल्याचे ते म्हणाले.

संरक्षण क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा भारत 74%पर्यंत वाढवत असून, संरक्षण उपकरणे आणि प्लाटफॉर्मच्या निर्मितीला चालना देण्यासाठी देशात दोन संरक्षण कॉरीडोर तयार करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. खाजगी आणि परदेशी गुंतवणूकदारांना विशेष सवलती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अवकाश क्षेत्रात केलेल्या मोठ्या सुधारणांचाही त्यांनी उल्लेख केला.

वित्त आणि विमा क्षेत्रातही गुंतवणुकीसाठी आमंत्रण देत पंतप्रधान म्हणाले की विमाक्षेत्रात भारताने थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा 49 आणि 100 % केली आहे. आरोग्य, कृषी, व्यवसाय आणि आयुर्विमा अशा अनेक क्षेत्रात अद्याप गुंतवणुकीच्या बऱ्याच संधी आहेत, असे मोदी म्हणाले.

भारतात गुंतवणुकीचे वाढते प्रमाण

भारतात गुंतवणूक स्नेही वातावरण निर्माण झाले असून उद्योग सुलभतेच्या जागतिक क्रमवारीत भारताचे स्थान वर गेले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. दरवर्षी, भारत थेट परदेशी गुंतवणुकीत नवनवे विक्रम करतो आहे. 2019-20 मध्ये भारतात FDI 74 अब्ज डॉलर्स इतकी होती, जी आधीच्या वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक होती, असे त्यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या काळातही म्हणजे एप्रिल ते जुलै दरम्यान भारतात 20 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक परदेशी गुंतवणूक झाल्याचे मोदी म्हणाले.

भारतात गुंतवणूक करण्याची सर्वोत्तम वेळ

जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ज्या उर्जेची गरज आहे, ती भारताकडे असल्याचे पंतप्रधान म्हणाले.भारताची वृद्धी म्हणजे एका अशा देशासोबत व्यापाराच्या संधीत वाढ, ज्या देशावर विश्वास ठेवता येईल. मुक्त धोरणासह जागतिक एकात्मता वाढवण्याची संधी, स्पर्धात्मकतेत वाढीसह दर्जेदार बाजारात प्रवेशाची संधी, कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसह, गुंतवणुकीत अधिक लाभ मिळवण्याची संधी. भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून, त्यांची भागीदारी या महामारीनंतर संपूर्ण जगाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावू शकेल, असे पंतप्रधान म्हणाले. अमेरिकन गुंतवणूकदारांना भारतात येण्याचे आमंत्रण, देत, सध्याचा काळ भारतात गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम काळ असल्याचे त्यांनी सांगितले.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1640618) Visitor Counter : 198