माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘कोविड -19 च्या काळात मानसिक आरोग्य’ या विषयावर पत्र सूचना कार्यालय आणि रिजनल आऊटरिच कार्यालय यांनी आयोजित केले वेबिनार


कोविड -19 महामारीच्या परिस्थितीत स्वत:, कुटुंब आणि संपूर्ण समुदायासाठी सर्वात महत्वाची आहे ती करुणा : सविता गोस्वामी, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबई

मानसिक आरोग्याच्या प्रश्नांशी लढण्यासाठी प्रत्येकाला संपूर्ण समुदायाच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त संसाधने उपलब्ध करुन देण्याची गरज आहेः प्रा. आशा बानो सॉलेटी, टाटा सामाजिक विज्ञान संस्था

मित्र आणि परिवाराशी मोकळेपणाने बोला, गरजेनुसार तज्ज्ञांची मदत घ्या, आवडीचा छंद जोपासा, आपल्या आवडत्या कामात व्यस्त रहा - मानसिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी तज्ञांचा सल्ला

Posted On: 23 JUL 2020 6:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जुलै 2020

टाळेबंदीमुळे किंवा घरीच राहण्याच्या आदेशाचे पालन करताना सर्वसाधारण दिनक्रमात व्यत्यय आल्याने लोकांच्या मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. हे सर्वांच्या बाबतीत आहे असे मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या आरोग्य आणि मानसिक आरोग्य केंद्राच्या प्रा. आशा बानो सॉलेटी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या कि मुले आणि विद्यार्थी, प्रौढ आणि वृद्ध, महिला, तृतीयपंथी समुदाय, आरोग्य सेवा व्यावसायिक आणि अत्यावश्यक सेवा प्रदाते, आर्थिकदृष्ट्या असुरक्षित गट, शोकग्रस्त कुटुंबे आणि अर्थातच अपंग व्यक्ती आणि मानसिक आरोग्याच्या पूर्व समस्याग्रस्त व्यक्ती अशा कित्येकांच्या मनावर कोविड-19 चा बराच पगडा आहे. पणजी स्थित गोवा इन्स्टिटयूट ऑफ होम सायन्सेस आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्रसूचना कार्यालय (पीआयबी) आणि प्रादेशिक आऊटरिच कार्यालय (आरओबी) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘कोविड -19 च्या काळात मानसिक आरोग्य’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये त्या आज बोलत होत्या.

तज्ज्ञ समितीच्या सदस्यांमध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट तसेच मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात सायको-ऑन्कोलॉजिस्ट असलेल्या सविता गोस्वामी यांचा समावेश आहे. त्यांनी विविध गटातील लोकांच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीविषयी त्यांचे अनुभव विशद केले आणि प्राप्त परिस्थितीला  कसे सामोरे जायचे याबाबत सल्ला दिला. याव्यतिरिक्त, जागतिक आरोग्य विज्ञान संस्थेमधील मानव विकास विभागाच्या  सहाय्यक प्राध्यापक लारिसा रॉड्रिग्ज यांनी लोक विशेषतः विद्यार्थी या महामारीचा सामना कसा करीत आहेत याविषयी अनुभव कथन केले.

प्रा. सोलेट्टी यांच्या मते प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोविड -19 महामारीने "आपत्कालीन परिस्थिती" उद्‌भवली आहे. विलगीकरण आणि तत्सम प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की अलगीकरणामुळे पीडित व्यक्तींमध्ये नैराश्य, चिंताग्रस्त विकार, बदलता स्वभाव, चिडचिडेपणा, गैरसमज, स्वयंनियंत्रणाचा अभाव बऱ्याच प्रमाणात आढळतो. आणखी एका अलीकडील पुनरावलोकनाने असा निष्कर्ष काढला आहे की मानसिक आरोग्याच्या समस्याग्रस्त व्यक्तींमध्ये ताणतणावामुळे गोंधळ, मोठ्या प्रमाणात राग यासारख्या दीर्घकाळ टिकणार्‍या मानसिक-तणावाची लक्षणे आढळतात. या व्यतिरिक्त, या घटनेशी संबंधित इतर समस्यांमध्ये घरगुती हिंसाचारात वाढ होणे समाविष्ट आहे ज्याचा त्रास सर्वत्र महामारीच्या सुरुवातीच्या काळात दिसून आला. मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते "न्यू नॉर्मल अर्थात नवीन जीवनशैलीत ही बाब अगदी सामान्य आहे." इंटरनेट व दळणवळण आधारित सेवांच्या माध्यमातून या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी सरकार आणि इतरांकडून प्रयत्न होत असताना विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी पट्ट्यांमध्ये मानसिक आरोग्य स्त्रोतांची उपलब्धता (आणि व्यावसायिक मदत) हे एक आव्हान आहे, असे प्रोफेसर सोलेट्टी यांनी सांगितले.

निरनिराळ्या गटांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी बोलताना गोस्वामी म्हणाल्या, लोकांमध्ये या परिस्थितीचा सामना करताना अनिश्चितता आणि असहाय्यतेचे वातावरण आहे. यापूर्वी कधीही न अनुभवलेले किंवा न जाणवलेली अशी काहीशी विलक्षण परिस्थिती आहे. सर्व संभाव्य खबरदारी घेतल्यानंतरही नकळत संसर्ग होण्याची किंवा संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची सर्वसामान्यतः भीती असते. या टाळेबंदीमुळे आमच्या सामाजिक आचरणामध्ये देखील संपूर्ण बदल झाला आहे. कामकाजाच्या प्रक्रियेत बदल आणि यापूर्वी रूढ नसलेली घरून काम करण्याची नवीन संकल्पना आता सर्वसाधारणपणे नित्याची झाली आहे. व्यसनाधीनता आणि मद्यपान देखील लक्षणीय वाढले आहे. थोडक्यात, या सर्व परिस्थितीमुळे संघर्ष, नवीन समायोजन, एकटेपणा आणि समजून घेण्यासंबंधीचे मुद्दे यात वाढ झाली आहे. काही वेळा त्याचे स्वरूप इतके गंभीर असते कि नैराश्य येणे किंवा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यात त्याचे पर्यवसन होते.

टाळेबंदीमुळे होणाऱ्या मानसिक परिणामावर बोलताना रॉड्रिग्ज म्हणाल्या, सामाजिक अंतरांच्या संपूर्ण नवीन संकल्पनेत लोकांना एकमेकांशी जोडण्याचे नवीन मार्ग शोधावे लागतील, समायोजनाच्या नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागतील जे करताना कदाचित एकाकी, उदास वाटेल. तथापि, एक सकारात्मक मुद्दाही त्यांनी निदर्शनास आणला कि लोक परस्परांशी संवाद साधत आहेत, त्यांचे दुर्लक्षित छंद जोपासत आहेत.

प्रो. सोलेट्टी यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मानसिक आरोग्य धोरणानुसार, विशेषत: सध्या सुरू असलेल्या महामारीच्या काळात सर्वांगीण सामुदायिक दृष्टिकोन आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांशी लढण्यासाठी अधिकाधिक संसाधने बनविण्याची गरज आहे. मानसिक आरोग्यास हानी पोहोचविणाऱ्या आणि तीव्र गरीबी निर्माण करणार्‍या साथीच्या आजाराशी संबंधित अडचणी कमी करण्यासाठी सक्रियरित्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. तसेच, मानसिक आरोग्यावर माहिती पुस्तिका आणि माहितीपट व्हिडिओ सामायिक करणे हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे.

या मानसिक आरोग्यावरील समस्यांवर मात करण्यासाठी गोस्वामी यांनी सुचविल्यानुसार:

  1. संपूर्ण अनुकंपा आणि सहानुभूती दाखविण्याची आवश्यकता आहे - संपूर्णपणे स्वत: साठी, कुटुंब आणि संपूर्ण समुदायासाठी
  2. विविध गटातील व्यक्तींना (उदा. मुले, वृद्ध) समजेल अशा पद्धतीने शिक्षण देणे.
  3. मित्रांमध्ये आणि परिवारात समस्यांविषयी बोलणे. लोकांनी तज्ज्ञांचे सहाय्य आणि मार्गदर्शन मिळवण्यात कमीपणा वाटून घेऊ नये.
  4. केवळ सत्यापित आणि विश्वासार्ह माहिती स्रोत विचारात घ्यावे.
  5. शारीरिक व्यायाम, दिनक्रम बनविणे, एखाद्याला आनंद मिळणाऱ्या उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवणे ज्याद्वारे सकारात्मक विचार वाढतील.
  6. एकत्रित केलेल्या क्रियांच्या माध्यमातून कुटुंबाशी असेल नाते  दृढ करणे, उदा. कुटुंबातील सदस्यांसह दूरदर्शन कार्यक्रम पाहणे.

आभारप्रदर्शनाचे भाषण करताना गोव्याच्या पत्रसूचना कार्यालयाचे उपसंचालक डी. व्ही. विनोद कुमार म्हणाले की, कोविड -19 महामारीने आपल्याला  मानसिक आरोग्याकडे नव्याने लक्ष केंद्रित करण्याची आणि त्याकडे आवश्यक असलेल्या दृष्टिकोनातून बघण्याची ऐतिहासिक संधी दिली आहे.

कार्यक्रमाचे संचालन करणारे मुंबई पत्रसूचना कार्यालयाचे उपसंचालक धिप जॉय मम्पीली यांनी माहिती दिली की कोविड -19 विरूद्ध लढा देताना भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्याचा अविभाज्य भाग म्हणून मानसिक आरोग्य स्वीकारले आहे. बेंगळुरूस्थित प्रमुख संस्था निमहन्सने 080-46110007 या मनो-सामाजिक हेल्पलाइन क्रमांकाची सुरुवात केली आहे. तसेच मानव संसाधन विकास मंत्रालयाने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मानसिक आधार देण्यासाठी मनोदर्पण पोर्टल आणि हेल्पलाईन (8448440632) सुरू केली आहे.

तज्ञांनी दिलेली सादरीकरणे येथे मिळू शकतील - प्रा. सोलेट्टी, गोस्वामी.

हेही वाचा: कोविड -19 च्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्र सरकारने राज्यसरकारांना यंत्रणा बळकट करण्याचे आवाहन केले आहे.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 



(Release ID: 1640704) Visitor Counter : 1964


Read this release in: English , Hindi , Manipuri