PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
26 JUN 2020 7:45PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 26 जून 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियान’ चे उद्घाटन केले. या अंतर्गत स्थलांतरित कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाईल. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोविड -19 महामारीमुळे उद्भवलेल्या अडचणींना मागे टाकण्यास प्रत्येकजण सक्षम होईल. जोपर्यंत लस सापडत नाही तोपर्यंत दो गज की दूरी अर्थात सुरक्षित अंतर राखणे, मास्कने चेहरा झाकणे हे सर्वात चांगले प्रतिबंधात्मक उपाय आहेत, यावर त्यांनी भर दिला.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारसह राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या श्रेणीबद्ध, पूर्व-प्रभावी आणि कृतीशील उपाययोजनांमुळे उत्साहवर्धक परिणाम दिसत आहेत.
सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 96,173 हून अधिक आहेत.
गेल्या 24 तासात कोविड-19 चे एकूण 13,940 रुग्ण बरे झाले त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 2,85,636 झाली आहे. याद्वारे कोविड-19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 58.24% वर पोहोचले आहे.
सध्या 1,89,463 सक्रिय रुग्ण असून ते सर्व सक्रिय वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
कोविड -19 चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने गेल्या 24 तासात 11 नवीन प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. भारतात सध्या कोविड -19 समर्पित 1016 निदान प्रयोगशाळा आहेत. यात सरकारी क्षेत्रातल्या 737 आणि 279 खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.
सद्य स्थिती खालीलप्रमाणे आहेः
जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 560 (सरकारी: 359 + खाजगी: 201)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 369 (सरकारी: 346 + खाजगी: 23)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 87 (शासकीय: 32 + खाजगी: 55)
कोविड -19 च्या नमुने तपासणीची संख्याही दररोज वाढत आहे. गेल्या 24 तासात प्रयोगशाळेत 2,15,446 चाचण्या करण्यात आल्या. आजमितीस एकूण 77,76,228 नमुने तपासण्यात आले.
इतर अपडेट्स:
- कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांना दिला मदतीचा हात : देशभरात कोविड-19 महामारीविरुद्धचा लढा एकत्रित प्रयत्नाच्या रुपात अखंड सुरु आहे. कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात ईशान्येकडील राज्यातील वैद्यकीय सेवेच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने सक्रियपणे आणि जोरदार समर्थन दिले आहे. ईशान्येकडील (एनई) राज्यांत देशाच्या तुलनेत कोविड -19 रुग्णांचे प्रमाण कमी आहे.
- INS जलाश्व या जहाजाचे ईराणच्या बंदर अब्बास नजिक 24 जून 2020 ला संध्याकाळी आगमन झाले. भारतीय नौदलाच्या ऑपरेशन समुद्र-सेतू अंतर्गत दुसऱ्या कामगिरीसाठी 25 जून 2020 ला ते बंदरात पोहोचले. या जहाजावर 687 भारतीय नागरिक आहेत. त्यांची वैद्यकिय आणि सामान-तपासणी करण्यात आली आहे. जहाजावर प्रवासी घेण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 25 जून 2020 ला संध्याकाळी उशीरा या जहाजाने बंदर अब्बासमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
- भारतीय रेल्वेने इतर मंत्रालयांशी आणि राज्यांच्या सरकारांशी समन्वय साधून आगामी काळामध्ये कोविड-19 महामारी उद्रेकामुळे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी केली आहे. त्यानुसार संपूर्ण आच्छादन करणारे पीपीई संच, सॅनिटायजर, मास्क आणि खाटांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली आहे. या वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालही आपल्याच क्षेत्रातल्या पुरवठादारांकडून रेल्वेने खरेदी केला आहे. भारतीय रेल्वेने दि. 24 जून,2020 पर्यंत 1.91 लाख पीपीई गाऊन्स, 66.4 हजार लीटर सॅनिटायजर, 7.33 लाख मास्क यांची निर्मिती केली.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली 21 जून रोजी झालेल्या बैठकीत दिल्लीमध्ये कोविड-19 संदर्भात घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृहसचिवांनी 25 जून रोजी एका आढावा बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के . पॉल, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांच्यासह दिल्ली मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव या बैठकीत सहभागी झाले होते.
- केंद्रीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल क्षेत्राच्या महामारीनंतरच्या वाढीबाबत चर्चा करण्यासाठी इंजिनीअरिंग निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या (ईईपीसी) प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. लॉकडाऊन दरम्यान अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राला अल्प कालीन अडचणींचा सामना करावा लागत असला तरी, “सकारात्मकता आणि आत्मविश्वास” त्वरित अडचणी दूर करण्यास मदत करू शकतो, असे सुचवत त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले. अर्थव्यवस्थेतील सर्व हितधारकांमधील प्रभावी सहकार्याने सध्याच्या महामारीच्या परिस्थितीवर मात केली जाऊ शकते यावर त्यांनी भर दिला.
- 2020-21 ते 2025-26 या वर्षांसाठी शिफारशी तयार करण्यासाठी वित्त आयोगाने केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी आणि शेतकरी कल्याण आणि पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या पंचायती राज मंत्रालयाशी चर्चा केली. आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग यांनी आयोगाच्या वतीने या चर्चेचे नेतृत्व केले. राज्यातील पंचायती आणि महानगरपालिका यांच्या संसाधनांना पूरक मदत करण्यासाठी एकीकृत निधीमध्ये राज्यांच्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशींच्या आधारे वाढ करण्याच्या उपाययोजना 15व्या वित्त आयोगाला सुचवाव्या लागणार आहेत.
- खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आपल्या मालमत्तेतून कमाई करण्यासाठी प्रथमच चंदन आणि बांबू लागवडीचा मात्र अतिशय फायदेशीर उपक्रमाची सुरुवात केली. चंदन आणि बांबूच्या व्यावसायिक वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी केव्हीआयसीने 262 एकर जमिनीवर आपल्या नाशिक प्रशिक्षण केंद्रामध्ये चंदन आणि बांबूची प्रत्येकी 500 रोपे लावून या मोहिमेचा शुभारंभ केला.केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केव्हीआयसी च्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
- आंतरराष्ट्रीय नाविक दिनानिमित्त राष्ट्रीय सागरी दिन समारंभ समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीय प्रमुख पाहुणे म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. नाविक दिनाची या वर्षीची संकल्पना आहे ’नाविक हे महत्वाचे कामगार’. जगभरात पुरवठा साखळी राखण्यात नाविकांच्या योगदानाची दखल या संकल्पनेत घेण्यात आली असून जागतिक व्यापारापैकी 90% व्यापार समुद्रामार्गे होतो.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात आज आता पर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक कोविड19 च्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 1.4 लाख इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 4,841 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1,47,741 झाली आहे. तसेच आणखी 192 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाल्यामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 6,931 झाली आहे. मृत्यू दर 4.69% झाला आहे. राज्यात 63,342 सक्रिय रुग्ण असून 77,453 रुग्ण बरे झाले आहेत.
RT/ST/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634617)
Visitor Counter : 287