रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेच्या वतीने 24 जून, 2020 पर्यंत 1.91 लाख पीपीई गाऊन्स, 66.4 हजार लीटर सॅनिटायजर, 7.33 लाख मास्क यांची निर्मिती


पीपीई संच निर्मितीचे जून आणि जुलै महिन्याचे लक्ष्य वाढवण्याची शक्यता ; दोन्ही महिन्यात प्रत्येकी 1.5 लाख संचांची निर्मिती

आगामी काळात वैद्यकीय सिद्धतेसाठी रेल्वेच्या वतीने पूर्ण आच्छादन करू शकणारे पीपीई (22 लाख), एन 95 मास्क (22.5 लाख), हात निर्जंतुकीकरणासाठी 500 मिलीच्या बाटल्या (2.25 लाख) आणि इतर सुरक्षा साधनांची केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेली सार्वजनिक संस्था मेसर्स एचएलएल लाईफ केअरकडे केंद्रीकृत मागणी

Posted On: 25 JUN 2020 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2020

भारतीय रेल्वेने इतर मंत्रालयांशी आणि राज्यांच्या सरकारांशी समन्वय साधून आगामी काळामध्‍ये  कोविड-19 महामारी उद्रेकामुळे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी केली आहे. कोविडग्रस्तांवर उपचार करण्यासाठी आघाडीच्या फळीमध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी बांधवांना आणि इतर पुरक सेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांना संरक्षण प्रदान करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तयारी केली आहे. या वैद्यकीय सुविधांच्या निर्मितीसाठी आणि रेल्वे रुग्णालयाच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व साधन सामुग्रीचा समन्वयाने वापर करण्यात येत आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पूर्ण रक्षण करू शकणाऱ्या पीपीई संचाचे आव्हान रेल्वे वर्कशॉपने स्वीकारले आहे. त्यानुसार संपूर्ण आच्छादन करणारे पीपीई संच, सॅनिटायजर, मास्क आणि खाटांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली आहे. या वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालही आपल्याच क्षेत्रातल्या पुरवठादारांकडून रेल्वेने खरेदी केला आहे. भारतीय रेल्वेने दि. 24 जून,2020 पर्यंत 1.91 लाख पीपीई गाऊन्स, 66.4 हजार लीटर सॅनिटायजर, 7.33 लाख मास्क यांची निर्मिती केली. जून आणि जुलै या दोन महिन्यात प्रत्येकी 1.5 लाख संपूर्ण शरीर आच्छादित करू शकणारे पीपीई गाऊन तयार करण्याचे लक्ष्य भारतीय रेल्वेने निश्चित केले होते. हे लक्ष्य आता वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. टाळेबंदीच्या काळामध्ये संपूर्ण रेल्वेच्या नेटवर्कसाठी कच्च्या मालाची केंद्रीकृत खरेदी करणे आणि तो सर्वत्र योग्य प्रमाणात पोहोचता करणे हे अतिशय जिकिरीचे काम होते. उत्तर रेल्वेकडे पीपीई गाऊन तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाची केंद्रीकृत खरेदी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पीपीई संचाच्या निश्चित करण्यात आलेल्या गुणवत्ता आणि मानकांनुसार माल समाधानकारक असेल तरच सर्व महत्वाच्या सामुग्रीची खरेदी करण्यात आली.

आता टाळेबंदी संपुष्टात आल्यानंतर कोविड-19 ची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेवून रेल्वेने वैद्यकीय सज्जता आणखी मजबूत करण्यावर भर दिला आहे. यानुसार पीपीई संच (22 लाख), एन 95 मास्क (22.5 लाख), हात निर्जंतुकीकरणासाठी 500 मिलीच्या बाटल्या (2.25 लाख), आणि इतर सुरक्षा साधनांची सिद्धता ठेवण्यासाठी रेल्वेने केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेली सार्वजनिक संस्था मेसर्स एचएलएल लाईफ केअरकडे केंद्रीकृत मागणी नोंदवली आहे.

रेल्वे मंत्रालयाने आपल्या 50 आरोग्य केंद्रांचा कोविड समर्पित रूग्णालये म्हणून वापर सुरू केला आहे. या रूग्णालयांमध्ये कोरोनाच्या रूग्णाला अधिक चांगले उपचार मिळावेत, यासाठी त्यांच्या उन्नतीकरणाचे काम सुरू केले आहे. ही रूग्णालये कोविड -19 चे आव्हान पेलण्यासाठी सक्षम करण्यात येत आहेत.

कोविड-19 च्या पहिल्या टप्प्यामध्ये पीपीई संच, मास्क, सॅनिटायजर अशी वैद्यकीय कर्मचा-यांना सुरक्षा प्रदान करणारी साधने तसेच रूग्णांसाठी व्हेंटिलेटर्स यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत होता. आता मात्र परिस्थिती पूर्ण बदलली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून विलगीकरणासाठी उपयुक्त ठरतील अशा कोविड दक्षता केंद्राची निर्मिती यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाने केली आहे. यासाठी रेल्वेने आपल्या 5231 बोगींचा वापर केला आहे. या रूपांतरित बोगी राज्यांकडून आलेल्या मागणी निवेदनानुसार त्या त्या राज्यांना दिल्या आहेत. देशभरात या कोविड दक्षता केंद्रांच्या 960 बोगींमध्ये प्रशिक्षित सेवकांना नियुक्त करण्यात आले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रेल्वे बोगी कोविड दक्षता केंद्रामध्ये असलेल्या संशयित रूग्णांविषयी मार्गदर्शक सूचना याआधीच जारी केल्या आहेत. त्यानुसार कार्य करण्यात येत आहे.

सध्या सर्वत्र कोरोना महामारीचा प्रसार असल्यामुळे रेल्वेच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला असला तरी, रेल्वेच्या गोदामांमध्ये सर्व आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच ज्या वस्तूंची गरज भासते, त्यांचा पुरवठा रेल्वेचे नियमित पुरवठादार करीत आहे. डिजिटल पुरवठा साखळीचे कार्य सुरू असल्यामुळे रेल्वेने आपली आवश्यक खरेदीही सुरू ठेवली आहे. त्यामुळे सध्याच्या अवघड काळातही सर्व सामुग्रीची व्यवस्था केली जात आहे.

 

U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1634443) Visitor Counter : 275