PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 18 JUN 2020 7:39PM by PIB Mumbai

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्ली-मुंबई, 18 जून 2020

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्यावसायिक खाणकामांसाठी 41 कोळसा खाणींची लिलाव प्रक्रिया सुरू केली. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत, केंद्र सरकारने केलेल्या घोषणांच्या मालिकेतील हा एक भाग होता. कोळसा मंत्रालयाने फिक्कीच्या सहकार्याने या कोळसा खाणींच्या लिलावासाठी प्रक्रिया सुरू केली. कोळसा खाणींच्या वाटपासाठी दोन टप्प्यांची इलेक्ट्रॉनिक लिलाव प्रक्रिया अवलंबली जात आहे.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत कोविड -19 महामारीवर मात करेल आणि या संकटाचे देश संधीत रूपांतर करेल.  ते म्हणाले की या संकटाने  भारताला आत्मनिर्भर अर्थात स्वयंपूर्ण व्हायला शिकवले आहे. आत्मानिर्भर भारत म्हणजे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि आयातीवरील परकीय चलनाची बचत करणे. याचाच अर्थ असा की भारत देशांतर्गत संसाधने विकसित करेल जेणेकरून देशाला आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच आपण आता ज्या वस्तू आयात करतो त्या वस्तूंचा सर्वात मोठा निर्यातदार बनणे असा याचा अर्थ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, 20 जून रोजी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'तेलिहार, गट- बेलदौर, जिल्हा- खगारिया, बिहार' येथून गरीब कल्याण रोजगार अभियानाचा प्रारंभ होणार आहे.

गरीब कल्याण रोजगार अभियानाविषयी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज  प्रारंभिक पत्रपरिषद घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या, गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत, 125 दिवसांत 116 जिल्ह्यांसाठी सुमारे 25 सरकारी योजना एकत्रित आणल्या जातील, त्या 125 दिवसांत केंद्र सरकार प्रत्येक योजनेवर पूर्णपणे अंमलबजावणी करेल.

या 116 जिल्ह्यांमध्ये कामाची गरज असणाऱ्या प्रत्येकाला  गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत काम दिले जाईल, सदर योजनेसाठी 50,000 कोटी रुपये खर्च येईल, असा ढोबळ अंदाज आहे. यासाठी  सुरुवातीला निधी नेमून दिला जाईल. 116 जिल्ह्यातील निरनिराळ्या 25 कामांसाठी - सुरुवातीला पैसा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मनोदय आहे. जेणेकरून, या सर्व जिल्ह्यांतील स्थलांतरित कामगारांना रोजगार मिळेल. यातून त्यांना दिशा मिळण्याबरोबरच, ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होण्यासाठी मदतही होईल.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

कोविड-19 ची चाचणी सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी म्हणून तयार करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या फिरत्या आय-लॅबचे (संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा) उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले. देशातील दुर्गम, अंतर्गत आणि सुलभ दळणवळणाचे मार्ग नसलेल्या भागात ही प्रयोगशाळा तैनात केली जाईल आणि प्रति दिन 25 कोविड-19 आरटी-पीसीआर चाचण्या, दररोज 300 एलिसा चाचण्या, क्षयरोग, एचआयव्ही इत्यादींसाठी अतिरिक्त चाचण्या घेण्याची तिची क्षमता आहे. कोविड नियंत्रण धोरणाअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने ही संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 7390 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,94,324 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 52.96% पर्यंत वाढला आहे. सध्या 1,60,384 संक्रमित रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

शासकीय प्रयोगशाळांची संख्या 699 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 254 पर्यंत वाढली आहे (एकूण 953 प्रयोगशाळा). वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 540 (शासकीय: 349 + खाजगी: 191)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 340 (शासकीय: 325 + खाजगी: 15)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 73 (शासकीय: 25 + खाजगी: 48)

गेल्या 24 तासात 1,65,412 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत  62,49,668 नमुने तपासण्यात आले.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात बुधवारी कोविडचे 3307 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 1,16,752 इतकी झाली आहे. यापैकी 51,921 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात या आजारामुळे आणखी 114 जणांचा मृत्यू झाला असून यामुळे एकूण मृत्यू संख्या 5651 वर पोहचली आहे. ताज्या माहितीनुसार, 59,166 जण या आजारातून बरे झाले आहेत.

 

* * *

RT/ST/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1632407) Visitor Counter : 148