मंत्रिमंडळ

कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नामकरण श्यामा प्रसाद मुखर्जी ट्रस्ट करण्याला मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 03 JUN 2020 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नामकरण श्यामा प्रसाद मुखर्जी ट्रस्ट करण्याला  मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

यासंदर्भामध्ये कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने दि. 2 फेब्रुवारी, 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये कोलकाता बंदराचे नाव बदलण्याचा ठराव केला होता. त्यानुसार या बंदराचे नामवंत न्यायाविद, बहुभाषांचे अभ्यासक, शिक्षणतज्ञ, अलौकिक बुद्धिमान, विचारवंत आणि जनसामान्यांचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी ट्रस्ट असे नामकरण करण्यात येणार आहे.

पश्चिम बंगालच्या जनतेच्या भावना लक्षात घेवून कोलकाता बंदराच्या शतकोत्तर पन्नासाव्या  म्हणजेच दीडशेव्या वर्धापन दिन उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये दि. 12 जानेवारी, 2020 रोजीच कोलकाता पोर्ट ट्रस्टच्यावतीने या बंदराच्या नामांतराची घोषणा करून त्याला डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. डॉ. मुखर्जी हे पश्चिम बंगालच्या सुपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी महान कार्य केले. तसेच पश्चिम बंगालच्या विकासाचे स्वप्न पाहून त्यादृष्टीने कार्य केले. डॉ. मुखर्जी यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी  तसेच औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देणारे होते. तसेच त्यांनी ‘एक राष्ट्र एक कायदा’ या धोरणासाठी कार्य केले.

 

पृष्ठभूमी:-

कोलकाता बंदर हे देशातले पहिले मुख्य मोठे बंदर आहे. नदीवर असलेले हे देशामधले एकमेव बंदर आहे. 1870 मधल्या पाचव्या कायद्यानुसार या बंदराची निर्मिती करण्यात आलीअ होती. बंदराच्या कामकाजाला गती मिळावी यासाठी तत्कालीन सरकारने एका ट्रस्टची स्थापना करून त्यावर दि. 17 ऑक्टोबर 1870 रोजी एका आयुक्ताची नियुक्ती केली होती. इंडियन पोर्टस अॅक्ट,1908 अनुसार या महत्वाच्या बंदराच्या कामाविषयी पहिल्या अनुलेखामध्ये सर्व नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. मेजर पोर्ट ट्रस्ट अॅक्ट 1963 अनुसार कोलकाता बंदराचे नंतर कामकाज सुरू ठेवण्यात आले. या बंदराचे आता 150 वे वर्ष सुरू आहे. या बंदरातूनच भारताचा व्यापार, वाणिज्य आणि आर्थिक विकासाचा प्रवास सुरू झाला. म्हणजेच भारताच्या विकासाचे हे बंदर प्रवेशव्दार बनले. कोलकाता बंदराने भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षाचा काळही अनुभवला. त्याचबरोबर पहिले आणि दुसरे जागतिक महायुद्धे पाहिली. देशामध्ये विशेषतः पूर्व भारतामध्ये अनेक सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरे घडून आली, त्या सर्वांचा साक्षीदार हे कोलकाता बंदर आहे. 

सर्वसाधारणपणे भारतामध्ये ज्या शहरांमध्ये बंदरे आहेत, त्याच शहरांची नावाची ती बंदरे आहेत. तरीही काही बंदरांना विशेष प्रकरण म्हणून किंवा तिथल्या नेत्यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये दिलेल्या योगदानाचा विचार करून त्या महान राष्ट्रीय नेत्यांची नावे बंदरांना देण्यात आली आहेत. 1989 मध्ये न्हावा शेवा बंदराचे नाव बदलून त्यावेळचे सरकारने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट केले होते. तर 2011 मध्ये तुतिकोरिन पोर्ट ट्रस्टचे नामकरण व्ही.ओ. चिदंबरनार पोर्ट ट्रस्ट केले होते. आणि इन्नॉर पोर्ट लिमिटेडचे कामराजार पोर्ट लिमिटेड असे करून ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. कामराजार यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. अलिकडेच 2017 मध्ये कांडला बंदराचे नामकरण दीनदयाळ पोर्ट असे करण्यात आले आहे. भारतामधल्या अनेक महान राष्ट्रीय नेत्यांनी केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांची नावे विमानतळांनाही दिली गेली आहेत.

 

M.Jaitly/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629118) Visitor Counter : 432