PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


ऑरेंज झोनचे ग्रीन झोन मधे रुपांतर करण्यावर लक्ष केंद्रित करून सर्वांनी एकत्र काम करूया- डॉ हर्ष वर्धन

Posted On: 09 MAY 2020 7:45PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, May 9, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान ज्युसेपे कोंते यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. कोविड-19 महामारीमुळे इटलीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. या संकटाच्या काळात इटलीच्या  नागरिकांनी दाखवलेल्या धैर्याची त्यांनी प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशात तसेच जागतिक स्तरावर महामारीच्या आरोग्यविषयक आणि आर्थिक परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यांनी एकमेकांप्रति एकजुटता व्‍यक्‍त केली आणि एकमेकांच्या देशात अडकलेल्या नागरिकांना दिलेल्या परस्पर सहकार्याची प्रशंसा केली.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

ईशान्येकडच्या राज्यांमधली कोविड-19 बाबतची स्थिती, कोविड प्रतिबंध  आणि यासंदर्भातल्या  व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना यांचा आढावा  घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष  वर्धन यांनी आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम,नागालॅड,त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यांसमवेत उच्च स्तरीय  बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे या बैठकीला उपस्थित होते.

देशात कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठीच्या सर्व राज्यांच्या  निष्ठेची त्यांनी प्रशंसा केली. ईशान्येकडच्या बऱ्याच राज्यात असलेले ग्रीन झोन मोठे दिलासादायक आणि  प्रोत्साहनकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सध्या  आसाम आणि त्रिपुरा या केवळ दोन राज्यातच कोविड-19 चे रुग्ण आहेत, इतर राज्ये ग्रीन झोन मधे आहेत. ऑरेंज झोनचे ग्रीन झोनमध्ये रुपांतर रुपांतर करण्यासाठी आणि राज्यभरात ही संरक्षक स्थिती कायम राखण्यावर लक्ष केंद्रित करून सर्वांनी मिळून काम करूया असे डॉ हर्ष वर्धन म्हणाले.

9 मे 2020 रोजी देशभरात एकूण रुग्णसंख्या 59,662 असून, 17,847 रुग्ण बरे झाले तर 1,981 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 3,320 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1,307 रुग्ण यातून बरे झाले आहेत. मृत्यू दर 3.3% तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 29.9% असल्याचे त्यांनी सांगितले.  काल 2.41% कोविड-19 रुग्ण अतिदक्षता विभागात, 0.38% व्हेंटीलेटरवर, 1.88% ऑक्सीजनवर असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात निदान चाचणी क्षमता वाढली असून 332 सरकारी प्रयोगशाळा आणि 121 खाजगी प्रयोगशाळात दर दिवशी 95,000 चाचण्यांची क्षमता आहे.कोविड-19 साठी आतापर्यंत 15,25,631 चाचण्या करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

ईशान्येकडच्या राज्यांसमवेत  तपशीलवार चर्चेदरम्यान निदान सुविधा, आरोग्य पायाभूत सुविधा, देखरेख, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध  हे मुद्दे  ठळकपणे मांडण्यात आले त्याचबरोबर उत्तम बाबी आणि उपायांची देवाणघेवाणही झाली.कोविड-19 विरोधातल्या लढ्यासाठी केंद्राने आतापर्यंत केलेल्या विविध उपाय योजना डॉ हर्ष वर्धन यांनी विशद केल्या.

इतर अपडेट्स :

  • मध्य रेल्वेने स्थलांतरितांना घरी पोहोचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लखनऊ, ठाणे ते बरौनी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोंडा अशा रेल्वे गाड्या सोडल्या.
  • मागील वर्षी 2019-20 या कालावधीत विशिष्ठ कालावधीसाठी काही व्यक्ती भारत भेटीवर आल्या होत्या आणि ज्यांना आपली अनिवासी भारतीय किंवा सामान्य रहिवासी ही स्थिती कायम ठेवण्यासाठी मागील वर्ष संपण्यापूर्वीच भारतातून बाहेर जाण्याचा हेतू होता; तथापि नवीन कोरोना विषाणूच्या (कोविड-19) उद्रेकामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केल्यामुळे त्यांना भारतातील त्यांच्या वास्तव्याचा कालावधी वाढवावा लागला आहे. या संदर्भात अशी चिंता व्यक्त केली जात आहे की, कोणताही हेतू नसताना अनिच्छेने त्यांना भारतीय रहिवासी असल्याचा दर्जा प्राप्त होईल. त्यांच्या वास्तव्याची स्थिती खालीलप्रमाणे निश्चित केली जाईल.
  • CBDT म्हणजेच, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सध्या काही विशिष्ट कंपन्यांच्या बाबतीत मान्यता/नोंदणी/अधिसूचना इत्यादी प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2020 पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.त्यानुसार, प्राप्तीकर कायदा 1961 अंतर्गत ज्या कंपन्याना 10(23C), 12AA, 35 आणि 80G कलमांअंतर्गत मान्यता मिळाली आहे, त्यांना 1 ऑक्टोबर 2020 नंतर तीन महिन्यांच्या आता म्हणजेच 31 डिसेंबर 2020 पर्यंत त्याविषयीची माहिती सादर करावी लागेल. त्याशिवाय, नव्या कंपन्यांसाठी मान्यता/नोंदणी/अधिसूचना यासाठीची सुधारित प्रक्रिया देखील 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरु होणार आहे.यासाठी आवश्यक ती कायदेशीर सुधारणा लवकरच प्रस्तावित केली जाईल.
  • कोविड-19 लॉकडाऊनमुळे मालवाहतूकविषयक आणि इतर आव्हाने निर्माण होऊनही राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्स लिमिटेड(आरसीएफ) भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमाने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या एनपीके सुफला या प्रकारच्या खताच्या विक्रीत एप्रिल महिन्यात तब्बल 35.47 टक्के वाढीची नोंद केली आहे.
  • कोविड-19 संसर्गाला अटकाव करण्यासाठी सुरु असलेल्या भारताच्या लढ्यात सक्रीय सहभाग आणि पाठींबा देण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशाच्या कानाकोपऱ्यात अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य आणि औषधे पोहोचविण्यासाठी लाईफलाईन उडान सेवेची सुरुवात केली आहे.  कालच्या 6.32 टन मालवाहतुकीनंतर कालपर्यंत एकूण 848.42 टन मालाची वाहतूक झाली आहे. लाईफलाईन उडान सेवेअंतर्गत सामानाची वाहतूक करणाऱ्या विमानांनी आतापर्यंत एकूण 4 लाख 73 हजार 609 किलोमीटरचा प्रवास केला आहे.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेच्या (एमपी-आयडीएसए) 165 व्या आणि पहिल्या आभासी कार्यकारी परिषदेच्या (ईसी) बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर मर्यादा असूनही आपले कर्तव्य बजावल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  यांनी एमपी-आयडीएसएचे महासंचालक, राजदूत सुजान आर चिनॉय, ईसीचे सर्व सदस्य आणि इतर तज्ज्ञ मंडळींचे अभिनंदन केले.
  • कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे सर्व ठिकाणाची व्यावसायिक कामे आणि कार्यालयीन कार्यवाही सध्या दूरस्थ पद्धतीने करावी लागत असून त्याप्रकारची धोरणे आखावी लागत आहे. गोव्याच्या केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने विनाबिलंब तंत्रज्ञानाचा स्वीकार करत दूरस्थ पद्धतीने काम सुरु केले असल्याने कार्यालयीन कामे सुरळीत सुरु असून करदात्यांसाठी ते सोयीचे ठरले आहे.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जपानचे संरक्षण मंत्री तारो कोनो यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली. कोविड-19 महामारीच्या विरोधामध्ये आपआपल्या देशात करण्यात आलेल्या उपाय योजनांविषयी उभय मंत्र्यांनी यावेळी बातचीत केली.
  • केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग-एमएसएमई आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज कार्यक्रम व मनोरंजन व्यवस्थापन संघटनेचे प्रतिनिधी आणि वित्त उद्योग विकास परिषदेच्या सदस्यांसोबत कोविड-19 चा त्यांच्या क्षेत्रावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षांत भारतात  "खादी ब्रॅण्डला" व्यापक प्रमाणावर  मान्यता प्राप्त झाली आहे. शाश्वत विकासाचे सर्वात पर्यावरणपूरक असलेले खादीचे उत्पादन गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाले आहे, म्हणजेच सन 2015-16 पासून याच काळात खादीची विक्री जवळपास तीन पट वाढली आहे. त्याचप्रमाणे, ग्रामीण उद्योग क्षेत्रातही गेल्या पाच वर्षात उत्पादन व विक्री जवळपास 100% वाढली आहे.
  • PM-GKAY म्हणजेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राज्यांना त्यांच्या गरजेनुसार वितरणासाठी अन्नधान्ये सहज उपलब्ध व्हावीत याकरिता सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, FCI म्हणजेच भारतीय अन्न निगमाने आतापर्यंत यासाठी 2641 डब्यांतून (गहू व तांदूळ यासह) सुमारे 73.95 लाख मेट्रिक टन अन्नधान्याची (55.38 लाख मेट्रिक टन तांदूळ आणि 18.57 लाख मेट्रिक टन गहू) वाहतूक केली आहे.
  • केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कोविड नंतरच्या आरोग्यसेवा क्षेत्राविषयी भारतातील वैद्यकीय समुदाय, कॉर्पोरेट रुग्णालय क्षेत्र, प्रमुख संशोधन संस्था आणि वैद्यकीय अर्थशास्त्रज्ञ क्षेत्रातील अग्रगण्य व्यावसायिकांसोबत चर्चा केली.
  • उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा यासारख्या राज्यांबरोबर बैठका घेतल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी तमिळनाडूचे आरोग्यमंत्री डॉ. सी. विजय भास्कर, तेलंगणाचे आरोग्यमंत्री इतेला राजेंद्र,आणि कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली
  • 'वर्ल्ड रेड क्रॉस डे’च्या निमित्ताने आयआरसीएस म्हणजेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या शताब्दीवर्षाचा कार्यक्रम नवी दिल्ली इथं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युरंट यांच्या प्रतिमेला डॉ. हर्ष वर्धन यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच हरियाणामधल्या कोविड-19 रुग्णांसाठी मदत साहित्य घेवून जाणा-या वाहनाला हिरवा झेंडा दाखवला. रेड क्रॉसच्यावतीने कोविड-19 रुग्णांसाठी पीपीई, मास्क, वेट वाइप्स, मोठ्या थैल्या इत्यादी साहित्याची मदत करण्यात आली आहे.
  • सध्या जगभर पसरलेल्या कोविड – 19 महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी देशात सुरु असलेल्या लढ्यात एनसीपीओआर अर्थात ध्रुवप्रदेश आणि महासागर यांचा अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने सक्रीय सहभाग नोंदविला आहे.
  • आदिवासी कल्याण मंत्रालयाअंतर्गत ट्रायफेड आणि आर्ट आँफ लिव्हिंग संस्था (AOL)या दोघांमध्ये सामंजस्य करार झाला असून या दोन्ही संस्था आपापल्या संस्थेतर्फे आदिवासी उपक्रमांना चालना देणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने भारतीय   गरजू आदिवासी कारागिरांना मोफत धान्य सामुग्री उपलब्ध करणार आहे.
  • दि. 8 मे 2020 रोजी, पहाटे 05:22 वाजताच्या सुमारास, रेल्वेच्या नांदेड मंडळाच्या परभणी-मनमाड विभागात एक दुर्दैवी घटना घडली. बदनापूर आणि करमाड स्थानकांदरम्यान रेल्वेरूळांवर झोपलेल्या व्यक्तींच्या एका समूहाला, मनमाडकडे जाणाऱ्या एका मालगाडीने धडक दिली. दक्षिण मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे सदर परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून, केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती त्यांना देण्यात येत आहे.

महाराष्ट्र अपडेट्स

1,089 नवीन रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रातील कोविड-19 केसेसची संख्या 19,063 झाली आहे. गेल्या 24 तासात 37 जणांचा मृत्यू झाला आणि एकूण मृत्यूसंख्या 731 झाली आहे. 24 तासात मुंबईमध्ये 748 नवीन केसेसची नोंद झाली. यानंतर शहरातील रुग्णसंख्या 11,967 झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 714 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव आढळले आहेत

 

***

RT/MC/SP/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622544) Visitor Counter : 212