रेल्वे मंत्रालय
रेल्वेच्या नांदेड मंडळातील बदनापूर आणि करमाड स्थानकांदरमन रेल्वेरूळांवर घडलेली दुर्घटना
प्रविष्टि तिथि:
08 MAY 2020 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2020
दि. 8 मे 2020 रोजी, पहाटे 05:22 वाजताच्या सुमारास, रेल्वेच्या नांदेड मंडळाच्या परभणी-मनमाड विभागात एक दुर्दैवी घटना घडली. बदनापूर आणि करमाड स्थानकांदरम्यान रेल्वेरूळांवर झोपलेल्या व्यक्तींच्या एका समूहाला, मनमाडकडे जाणाऱ्या एका मालगाडीने धडक दिली.
या 19 जणांच्या समूहापैकी 14 जण जागीच मरण पावले तर गंभीर जखमी झालेल्या दोघांनी थोड्या वेळाने प्राण सोडले. किरकोळ जखमी झालेल्या एकावर औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मालगाडीचालकाला रुळांवर काही व्यक्तींचा समूह दिसून येताच त्याने ताबडतोब पुन्हापुन्हा गाडीचा हॉर्न वाजवून त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला, तसेच गाडी थांबविण्यासाठीही शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र तरीही सदर दुर्घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच, रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ अधिकारी, अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर घटनास्थळी धावले. मदतकार्यावर देखरेख करण्यासाठी नांदेड मंडळाचे 'रेल्वे मंडळ व्यवस्थापक' श्री.उपिंदर सिंग हेही घटनास्थळी व्यक्तिशः पोहोचले. डॉक्टर, परिचारिका आणि अन्य निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना घेऊन एक वैद्यकीय मदत वाहनही त्वरित तेथे पाठविण्यात आले. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री.गजानन मल्ल्या यांनी ताबडतोब विविध विभागांच्या प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन, मदत आणि दिलासा कार्य वेगाने सुरु करण्यासंबंधी आदेश दिले.
दक्षिण मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे सदर परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून, केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती त्यांना देण्यात येत आहे
U.Ujgare/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1622468)
आगंतुक पटल : 304