नागरी उड्डाण मंत्रालय

कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत लाईफलाईन उडान सेवेअंतर्गत आतापर्यंत 490 विमानफेऱ्यांद्वारे देशाच्या सर्व भागांमध्ये वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक साहित्याचा खात्रीशीर आणि अखंडित पुरवठा

Posted On: 09 MAY 2020 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9  मे 2020

कोविड-19 संसर्गाला अटकाव करण्यासाठी सुरु असलेल्या भारताच्या लढ्यात सक्रीय सहभाग आणि पाठींबा देण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशाच्या कानाकोपऱ्यात अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य आणि औषधे पोहोचविण्यासाठी लाईफलाईन उडान सेवेची सुरुवात केली आहे. या सेवेअंतर्गत एयर इंडिया, अलायन्स एयर, भारतीय हवाई दल आणि खासगी विमान कंपन्यांनी आतापर्यंत 490 विमानफेऱ्या केल्या असून त्यातील 289 विमाने एयर इंडिया आणि अलायन्स एयर यांनी संचालित केली होती. कालच्या 6.32 टन मालवाहतुकीनंतर कालपर्यंत एकूण 848.42 टन मालाची वाहतूक झाली आहे. अलायन्स एयरच्या 2 तर भारतीय हवाई दलाच्या 8 विमानांनी काल मालवाहतुकीसाठी उड्डाणे केली. लाईफलाईन उडान सेवेअंतर्गत सामानाची वाहतूक करणाऱ्या विमानांनी आतापर्यंत एकूण 4 लाख 73 हजार 609 किलोमीटरचा प्रवास केला आहे.

जम्मू आणि काश्मीर, लडाख, विविध बेटे आणि देशाच्या ईशान्य भागात महत्त्वाची औषधे आणि गंभीर रुग्णांची वाहतूक करण्यासाठी पवन हंस कंपनीसह इतर कंपन्यांची हेलिकॉप्टर सेवा चालविण्यात येत आहे. पवन हंस च्या हेलिकॉप्टर्सनी कालपर्यंत 8001 किलोमीटरचा प्रवास करून 2.32  टन वैद्यकीय साहित्याची वाहतूक केली आहे.

स्पाईस जेट, ब्ल्यू डार्ट, इंडिगो आणि विस्तारा या खासगी कंपन्यांनी लॉक डाऊनच्या काळात विविध कालावधीमध्ये व्यावसायिक तत्वावर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी त्यांची विमान सेवा सुरु ठेवली आहे. स्पाईस जेट कंपनीच्या विमानांनी कालपर्यंत 916  मालवाहतूक उड्डाणे केली त्यापैकी 337 उड्डाणे आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठीची होती. ब्ल्यू डार्ट कंपनीने 311 विमान उड्डाणांद्वारे आवश्यक वैद्यकीय साहित्य पोहोचविले, त्यापैकी 16  होती. इंडिगो कंपनीच्या विमानांनी मालवाहतूकीसाठी 121 उड्डाणे केली त्यापैकी 46 आंतरराष्ट्रीय पातळीवरील उड्डाणे होती, तर विस्तारा कंपनीच्या विमानांनी 23 उड्डाणांद्वारे मालवाहतुकीला मदत केली.

कोविड-19 रोगनिवारणासाठी आवश्यक साहित्य, वैद्यकीय उपकरणे तसेच या रोगावरच्या उपचारासाठी आवश्यक असणारी औषधे यांच्या त्वरित आणि सुलभ वाहतुकीसाठी भारताला पूर्व आशियायी देशांशी जोडणारा हवाई-सेतू तयार करण्यात आला होता. त्याचा वापर करून एयर इंडियाने एकूण 1075 टन वैद्यकीय सामान देशात आणले. ब्ल्यू डार्ट कंपनीच्या विमानांनी ग्वान्गझू आणि शांघाय येथून 131 टन आणि हाँगकाँगहून 24 टन वैद्यकीय साहित्य देशात आणण्यास सहाय्य केले तर स्पाईस जेट कंपनीच्या विमानांनी शांघाय आणि ग्वान्गझू येथून 205 टन तसेच हाँगकाँग आणि सिंगापूर येथून 21 टन वैद्यकीय सामान कालपर्यंत देशात आणले.

 

M.Jaitly/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622507) Visitor Counter : 202