आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातली ताजी स्थिती

Posted On: 18 APR 2020 7:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2020

 

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनांवर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. 

कृती आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे चांगले परिणाम 23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 47 जिल्ह्यांमध्ये आता दिसू लागले आहेत. कर्नाटकच्या कोडगु जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नसून पुद्दुचेरीच्या माहे जिल्ह्यासोबत आता याही जिल्ह्याचे नाव जोडले गेले आहे. 12 राज्यातल्या 22 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. 

यामध्ये :

 • बिहारचे लखिमसराय, गोपालगंज, भागलपूर जिल्हे
 • राजस्थानचे धोलपुर आणि उदयपूर जिल्हे
 • जम्मू काश्मीरचा पुलवामा
 •  मणिपूरचा थौबाल
 • कर्नाटकचा चित्रदुर्ग
 • पंजाब- होशिंगपूर
 • हरियाणा-रोहतक आणि चरखी दादरी
 • अरुणाचल प्रदेश –लोहित
 • ओडिशा-भद्रक
 • आसाम –करीमगंज, गोलाघटा, कामरूप, ग्रामीण, नालाबाडी आणि दक्षिण साल्मारा
 • पश्चिम बंगाल-जलपैगुडी
 • आंध्रप्रदेश-विशाखापट्टण

यांचा समावेश आहे.

सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर 3.3%. इतका आहे. वयोगटानुसार मृत्यूदराचे प्रमाण पुढीलप्रमाणे :-

 • 0-45 - 14.4 %
 • 45- 60 -10.3 %
 • 60-75 -33.1%
 • 75 च्या वर- 42.2 %

आकडेवारीनुसार असे दिसते की, 75 टक्के मृत्यू 60 वर्षं वयाच्या वरच्या रुग्णांचे झाले आहेत तर 83 टक्के मृत्यू मध्ये रुग्णांना इतर काही आजार असल्याचेही आढळले आहे.

विविध आजार असलेल्या लोकांना या आजाराचा अधिक धोका असल्याचे जे तथ्य या आधी सांगितले होते, ते यातून अधोरेखित होत आहे. 

जगभरातील चाचण्यांच्या पद्धतीचा आढावा घेतल्यानंतर ICMR च्या राष्ट्रीय कृतीदलाने सर्व राज्यांना त्या आधारावर मागर्दर्शक तत्वे पाठवली आहेत. या मार्गदर्शक तत्वांची यादी इथे बघता येईल :-  https://www.mohfw.gov.in/pdf/ProtocolRapidAntibodytest.pdf

त्याशिवाय, कुठलीही रॅपिड टेस्ट सुरु करण्यापूर्वी, राज्यांनी कोविड-19 संदर्भातल्या चाचण्यांबद्दलची सर्व माहिती आणि आकडेवारी ICMR च्या संकेतस्थळावर (covid19cc.nic.in/ICMR) अपलोड करायची आहे.

सध्या देशात कोरोनाचे एकूण 14,378  रुग्ण असून  1992 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 13.82% इतके आहे .

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 (Release ID: 1615813) Visitor Counter : 33