• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड -19 आपत्तीकाळात जनतेला सेवा देण्याचे अथक प्रयत्न सुरूच ठेवण्याचे संजय धोत्रे यांचे टपाल विभागाला आवाहन


लॉकडाउनच्या काळात AEPS पद्धतीने 300 कोटी रुपये मूल्याचे 15 लाखाहून अधिक व्यवहार पूर्ण

Posted On: 24 APR 2020 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24  एप्रिल 2020

लॉकडाउनच्या काळात टपाल विभागाने राबवलेल्या उपक्रमांचा,संदेशवहन आणि मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतला. विभागाने केलेल्या विविध उपायांबद्दल धोत्रे समाधान व्यक्त केले. तसेच, सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून, देशाची अधिकाधिक सेवा करण्यासाठी त्यांनी विभागाला प्रोत्साहितही केले.

टपाल विभागाच्या भरभक्कम वितरण प्रणालीचा उपयोग करून घेण्याची अन्य शासकीय विभागांना गरज असू शकते, असे सांगून धोत्रे यांनी, अशा आंतरविभागीय समन्वयातून टपाल विभागालाही नव्या संधी मिळू शकतात, असे स्पष्ट केले. टपाल विभागाने AePS म्हणजेच 'आधार' वापरून पैसे देण्याची प्रणाली अधिक लोकप्रिय करावी, आणि टपाल खात्याच्या विभागीय प्रमुखांनी जिल्हाधिकारी व राज्य प्रशासनाशी समन्वय साधून लोकांना रोख रक्कम घरपोच देण्याची सुविधा पुरवावी, यावर धोत्रे यांनी भर दिला.

क्षेत्रबंदीचे भाग सोडून देशातील बहुतेक सर्व टपाल कार्यालयांचे कामकाज उत्तम सुरु आहे. तसेच औषधे, कोविड -19 चे तपासणी संच, मास्क, सॅनिटायझर, व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे, व व्हेंटिलेटर सारखी वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंच्या वितरणाला प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती मंत्रीमहोदयांना देण्यात आली.

20 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाउन दरम्यान टपाल कार्यालयातील बचत बँकेचे 28,000 कोटी रुपयांचे सुमारे 1.8 कोटी व्यवहार झाले. शिवाय, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे 84 लाख व्यवहार झाले, ज्यांचे मूल्य 2100  कोटी रुपये इतके होते. तसेच, देशभरात ATM  केंद्रांवर 135 कोटी रुपयांचे 4.3 लाख व्यवहार पार पडले.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या AEPS प्रणालीमुळे, कोणत्याही अनुसूचित बँकेतील खात्यातून पैसे काढण्याचे काम घरच्या घरी करता येऊ शकते. असे 300 कोटी रुपये मूल्याचे 15 लाख आर्थिक व्यवहार या काळात पार पडले. तर सुमारे 52 लाख थेट लाभ हस्तांतरणांतून 480 कोटी रुपये वितरित झाले. वृद्ध, दिव्यांग आणि निवृत्तिवेतन धारकांना तसेच ग्रामीण जनतेला AEPS  चा चांगला उपयोग झाला.

ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी टपाल विभाग कार्गो विमाने, मालगाड्या, तसेच लाल टपाल वाहने वापरून राज्यांतर्गत व आंतरराज्य वस्तू वाहतूक करत आहे. लॉकडाउनमुळे  कोणालाही औषधे पाठविण्यात किंवा मिळविण्यात अडचणी येऊ नयेत, यादृष्टीने टपाल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जागरूक करण्यात आले आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमधील राज्य टपाल एककांनी भारतीय औषध निर्माता महासंघ, आरोग्यसेवा महासंचालक, अन्य औषध कंपन्या आणि कोविड -१९ तपासणी संचाचे पुरवठादार यांच्याशी करार केले आहेत.

याखेरीज, देशभर टपाल विभागामार्फत सामाजिक संस्थांच्या मदतीने होत असलेले अन्नवाटप, धान्यवाटप, मास्कनिर्मिती व वाटप यांचीही माहिती धोत्रे यांना देण्यात आली.

रत्नागिरीत आंबा उत्पादकांना टपाल विभागातर्फे आंब्याच्या वाहतुकीसंबंधी विविध प्रकारची मदत केली जात आहे. कर्नाटकात घरोघरी अडकून पडलेल्या जनतेच्या मदतीसाठी टपाल विभागाने इंटरनेट वरील अँप्लिकेशन चा आधार घेतला आहे. असे निरनिराळ्या पोस्ट सर्कल्सचे उपक्रमही यावेळी सांगण्यात आले.

सत्राचा शेवट करताना धोत्रे यांनी, हेल्पलाईन क्रमांकांबद्दल अधिक जनजागृतीची गरज नमूद केली. प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन काम करणाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर वापरणे, सामाजिक अंतराचे नियम पाळणे यावर भर देत धोत्रे यांनी कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची वरिष्ठांची जबाबदारी अधोरेखित केली.

 

G.Chippalkatti/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1617833) Visitor Counter : 202


Link mygov.in