पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवानिमित्त नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केलेले भाषण

Posted On: 21 APR 2024 12:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2024

 

जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र! पूज्य श्री प्रज्ञासागरजी मुनिराज, पूज्य उपाध्याय श्री रवींद्र मुनीजी महाराज साहेब, पूज्य साध्वी श्री सुलक्षणश्रीजी महाराज साहेब, पूज्य साध्वी श्री अनिमाश्रीजी महाराज साहेब, माझे सरकारमधील सहकारी, अर्जुन राम मेघवाल जी आणि सौ. मीनाक्षी लेखी जी, सर्व आदरणीय संतगण, बंधू आणि भगिनींनो!

भारत मंडपमचे हे भव्य भवन आज भगवान महावीरांच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवाचे साक्षीदार ठरत आहे. भगवान महावीरांच्या जीवनावर विद्यार्थी मित्रांनी सादर केलेला जीवन देखावा आपण आत्ताच पाहिला! तरुण मित्रांनी 'वर्तमान में वर्धमान' हा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला. आपल्या कालातीत मूल्यांविषयी, भगवान महावीरांविषयी तरुण पिढीचे हे आकर्षण आणि समर्पण, देश योग्य दिशेने जात आहे असा विश्वास दृढ होतो. या ऐतिहासिक प्रसंगी, मला विशेष टपाल तिकिटे आणि नाणी प्रकाशित करण्याचा सन्मान देखील लाभला आहे. आपल्या जैन संत आणि साध्वींच्या विशेष मार्गदर्शन आणि आशीर्वादानेच हा कार्यक्रम शक्य झाला आहे. आणि म्हणूनच, मी आपणा सर्वांना वंदन करतो. महावीर जयंतीच्या या पवित्र प्रसंगी मी देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. आपण सर्वजण जाणताच की निवडणुकीच्या या धामधुमीत अशा पुण्यदायी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे मनाला खूप शांत करणारे आहे. आदरणीय संत जनहो, आज या प्रसंगी महान आध्यात्मिक नेते आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांची आठवण येणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. गेल्या वर्षीच मला छत्तीसगडमधील चंद्रगिरी मंदिरात त्यांना भेटण्याचा योग आला होता. जरी त्यांचे भौतिक शरीर आपल्यात नसले तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच आपल्यासोबत आहेत.

मित्रांनो,

भगवान महावीरांचा हा 2550 वा निर्वाण महोत्सव हजारो वर्षांमध्ये येणारा दुर्मिळ योग आहे. अशा प्रसंगी स्वाभाविकपणे अनेक विशेष योगायोग एकत्र येतात. हा तो काळ आहे जेव्हा भारताच्या 'अमृत काळ'चा प्रारंभिक टप्पा सुरू आहे. देश स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाला सुवर्णशताब्दी बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. या वर्षी, आपल्या संविधानालाही 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच वेळी, देशात एक भव्य लोकशाही उत्सव सुरू आहे. राष्ट्राला विश्वास आहे की येथूनच भविष्याचा नवीन प्रवास सुरू होईल. या सर्व संयोगांमध्ये, आज आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत. आणि एकत्र जमणे म्हणजे काय, हे तुम्हाला समजले असेलच! आपल्या सर्वांशी माझे नातेसंबंध खूप जुने आहेत. प्रत्येकाचे आपले एक विश्व असते.

बंधू आणि भगिनींनो,

राष्ट्रासाठी 'अमृत काळ' ही संकल्पना केवळ एक मोठा संकल्प नाही; तो भारताचा आध्यात्मिक प्रेरणास्रोत आहे जो आपल्याला अमरत्व आणि अनंतत्व जगण्याची शिकवण देतो. 2500 वर्षांनंतरही, आपण आज भगवान महावीरांचा निर्वाण दिन साजरा करत आहोत. आणि आपल्याला माहित आहे की हजारो वर्षांनंतरही, हा देश भगवान महावीरांशी जोडलेले असे उत्सव साजरे करतच राहील. शतकांमध्ये आणि सहस्रकांमध्ये विचार करण्याची क्षमता... ही दूरदर्शी आणि दूरगामी विचारसरणी... यामुळेच भारत केवळ जगातील सर्वात जुनी जिवंत संस्कृती नाही तर मानवतेसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान आहे. हा भारत आहे, जो केवळ 'स्वयं’चा नाही तर 'सर्वम्'चा विचार करतो. हा भारतच आहे जो केवळ 'स्व’ची नाही तर 'सर्वस्वाची' भावना बाळगतो. हा भारत आहे जो 'अहम्’चा विचार करत नाही तर 'वयम्' (आपण) चा विचार करतो. हा भारत आहे जो 'इति' नाही तर 'अपरिमित' या संकल्पनेवर विश्वास ठेवतो. हा भारत आहे जो नीतिबद्दल बोलतो, आणि 'नेती' (हेही नाही - तेही नाही) बद्दलही बोलतो. हा भारतच आहे जो अणूमध्ये वसलेल्या ब्रम्हांडाबद्दल बोलतो, विश्वातील ईश्वराबद्दल बोलतो, जीवातील शिवाबद्दल बोलतो.

मित्रांनो,

प्रत्येक युगात गरजांनुसार नवीन विचार उदयास येतात. परंतु, जेव्हा विचारांमध्ये स्थिरता येते, तेव्हा विचार वादात बदलतात आणि वाद विवादात बदलतात. पण, जेव्हा विवादांमधून अमृत बाहेर पडते आणि आपण अमृताच्या आधाराने चालतो, तेव्हा आपण पुनरुत्थानाच्या दिशेने मार्गक्रमण करतो. परंतु, जर वादांमधून विष बाहेर पडले, तर आपण प्रत्येक क्षणी विनाशाची बीजे पेरतो. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांत, आपण चर्चा केल्या आहेत, वादविवाद केले आहेत आणि संवाद साधले आहेत. आणि, 75 वर्षांच्या या मंथनातून जे अमृत बाहेर पडले आहे, आता ते अमृत घेऊन विषमुक्त होणे आणि ‘अमृतकालात’ जगणे ही आपली जबाबदारी आहे. जागतिक संघर्षांमध्ये, देश युद्धग्रस्त होत आहेत. अशा काळात, आपल्या तीर्थंकरांच्या शिकवणींचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यांनी मानवतेला वाद - विवादांपासून वाचवण्यासाठी अनेकांतवाद आणि स्याद्वाद यासारखे तत्वज्ञान दिले आहे. अनेकांतवाद म्हणजे एखाद्या विषयाचे अनेक पैलू समजून घेणे, इतरांचे दृष्टिकोन पाहण्यासाठी आणि ते स्वीकारण्यासाठी खुले असणे. श्रद्धेची अशी मुक्त व्याख्या करणे, हीच भारताची विशिष्टता आहे आणि हाच भारताचा मानवतेचा संदेश आहे.

मित्रांनो,

आज जग संघर्षाने भरलेले असताना शांततेसाठी भारताकडे अपेक्षेने पाहत आहे. नव्या भारताच्या या नव्या भूमिकेचे श्रेय आपली वाढती क्षमता आणि आपल्या परराष्ट्र धोरणाला दिले जाते. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या सांस्कृतिक प्रतिमेचाही यात महत्त्वपूर्ण वाटा आहे. आज, भारताला ही भूमिका प्राप्त झाली आहे कारण आपण सत्य आणि अहिंसेसारखी व्रते जागतिक व्यासपीठांवर पूर्ण आत्मविश्वासाने मांडत आहोत. जागतिक संकटे आणि संघर्षांचे निराकरण भारताच्या प्राचीन संस्कृती आणि परंपरेत दडलेले आहे, हे आपण जगाला सांगत आहोत. म्हणूनच, भारत विभाजित जगासाठी 'विश्व बंधू' (जगाचा मित्र) म्हणून आपले स्थान निर्माण करत आहे. 'हवामान बदला'सारख्या संकटांच्या निराकरणासाठी, आज भारताने 'मिशन लाईफ' सारख्या जागतिक चळवळीची पायाभरणी केली आहे. भारताने आज जगासमोर ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना ठेवली आहे. स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासासाठी, आपण ‘एक-जग, एक-सूर्य, एक-ग्रिडसाठी एक मार्गदर्शक आराखडा प्रदान केला आहे. आज, आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारख्या भविष्यासाठी हितावह असणाऱ्या जागतिक उपक्रमांचे नेतृत्व करत आहोत. आपल्या या प्रयत्नांमुळे जगात केवळ आशा निर्माण झाली नाही तर भारताच्या प्राचीन संस्कृतीकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनही बदलला आहे.

मित्रांनो,

जैन धर्माचे सारच आहे जिन मार्ग, म्हणजेच स्वतःवर विजय मिळवण्याचा मार्ग. इतर देश जिंकण्यासाठी आपण कधीही आक्रमकतेचा अवलंब केला नाही. स्वतःमध्ये सुधारणा करून आणि आपल्या कमतरतांवर मात करून आपण विजय मिळवला आहे. म्हणूनच, अनेक वेळा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असताना प्रत्येक युगात आपले मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी ऋषी, कोणीतरी ज्ञानी व्यक्ती प्रकट झाली आहे. अनेक महान संस्कृती नष्ट झाल्या, परंतु भारताने आपला मार्ग शोधला.

बंधू आणि भगिनींनो,

आपल्याला आठवत असेल की केवळ 10 वर्षांपूर्वी आपल्या देशात कसे वातावरण होते. सर्वत्र निराशा आणि हताशाच होती! सर्वांनी असा समज पक्का केला होता की या देशाचे काहीही होऊ शकत नाही! ही निराशा भारतीय संस्कृतीसाठी देखील तितकीच वेदनादायक होती. म्हणून, 2014 नंतर, भौतिक विकासासोबतच, आम्ही आमच्या वारशाचा अभिमान उंचावण्याचा संकल्प केला. आज आपण भगवान महावीरांचा 2550 वा निर्वाण महोत्सव साजरा करत आहोत. या 10 वर्षात आपण असे अनेक महत्त्वाचे प्रसंग साजरे केले आहेत. जेव्हा जेव्हा आपल्या जैन आचार्यांनी मला आमंत्रित केले आहे, तेव्हा मी त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे. संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी, मी 'मिच्छामि दुक्कडम' असे म्हणत या मूल्यांची आठवण करतो. याचप्रमाणे, आपण आपला वारसा जपण्यास सुरुवात केली आहे. आपण योग आणि आयुर्वेदाबद्दल जगभर बोललो आहोत. आपली ओळख हीच आपला अभिमान आहे, असे आज देशाची नवीन पिढी मानते. जेव्हा राष्ट्रात स्वाभिमान भावना जागृत होते तेव्हा त्या राष्ट्राच्या प्रगतीचा वारू थांबवणे अशक्य होते. भारताची प्रगती याचा पुरावा आहे.

मित्रांनो,

भारतासाठी, आधुनिकता हा देह आहे, तर अध्यात्म हा त्याचा आत्मा आहे. जर आधुनिकतेतून अध्यात्म काढून टाकले तर त्यातून अधर्म जन्माला येतो. आणि जर आचरणात त्याग नसेल, तर उत्तमातील उत्तम विचारसरणी देखील विकृत बनते. भगवान महावीरांनी कैक शतकांपूर्वी हाच दृष्टिकोन आपल्याला दिला आहे. समाजात ही मूल्ये पुनरुज्जीवित करणे ही काळाची गरज आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आपल्या देशाने अनेक दशके भ्रष्टाचाराची वेदना सहन केली ‌आहे. आपण गरिबीचे तिव्र चटके देखील सोसले आहेत. आज, देश अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे आपण 25 कोटी लोकांना गरिबीच्या दलदलीतून बाहेर काढले आहे. तुम्हाला आठवत असेल, मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते आणि पूज्य महाराजांनी देखील याचा पुनरुच्चार केला होता - हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. आपल्या समाजात 'अस्तेय' आणि 'अहिंसा' या आदर्शांना बळकट करण्याची हीच योग्य वेळ आहे. सर्व संतजनांना मी आश्वासन देतो की देश या दिशेने आपले प्रयत्न निरंतर सुरू ठेवेल. भारताच्या भविष्याच्या उभारणीच्या प्रवासात तुमचे आशीर्वाद देशाच्या आकांक्षा बळकट करेल आणि भारताला 'विकसित' (समृद्ध) बनवेल असा मला विश्वास आहे.

भगवान महावीरांचे आशीर्वाद 140 कोटी भारतीय नागरिकांचे आणि संपूर्ण मानवजातीचे नक्कीच कल्याण करतील... आणि मी सर्व पूजनीय संतांना आदरपूर्वक वंदन करतो. भगवान महावीरांच्या वाणीतून एक प्रकारे जणू मोत्यांचा वर्षाव होत होता. महिला सक्षमीकरणाबद्दल असो, विकासाचा प्रवास असो किंवा महान परंपरा असो, सर्व पूजनीय संतगणांनी सध्याच्या व्यवस्थेत काय घडत आहे आणि काय घडले पाहिजे, हे मोजक्या शब्दात आणि अतिशय अद्भुत पद्धतीने मांडले आहे. मी याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी आशीर्वाद आहे. त्यांचा प्रत्येक शब्द माझा अमूल्य खजिना आहे. त्यांचा प्रत्येक शब्दातून देशाला प्रेरणा मिळते, असा माझा विश्वास आहे. जर आता कदाचित निवडणुकीचे वातावरण नसते तर कदाचित मी वेगळ्या मूडमध्ये असलो असतो. पण मी त्या गोष्टी बाजूला ठेवून इथे येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मी कदाचित त्या आणल्या नाहीत, पण तुम्ही नक्कीच त्या आणल्या आहेत. पण या सर्वांसाठी, कितीही ऊन असले तरीही घराबाहेर पडण्याची वेळ आली तर बाहेर पडण्यासाठी ऊन कमी होण्याची वाट पाहू नका, की संध्याकाळी ऊन कमी होईल मग मी बाहेर पडेन. सकाळी लवकर बाहेर पडा. कमळाचे आपल्या सर्व संत, महंत आणि दैवी शक्तींशी थेट संबंध आहे. तुमच्या सानिध्यात येऊन मला खूप आनंद होत आहे. याच भावनेने, मी पुन्हा एकदा भगवान महावीरांच्या चरणी नतमस्तक होतो. मी सर्व संतजनांनाही वंदन करतो. आपले खूप खूप आभार!

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2177451) Visitor Counter : 6