वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी मॉस्को इथे व्हिटीबी रशिया कॉलिंग या गुंतवणूक मंचावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "भारत-प्रथम" धोरण आणि "मेक इन इंडिया" उपक्रमाचे केले कौतुक


अध्यक्ष पुतिन यांनी भारतात उत्पादन सुरू करण्याची रशियाची इच्छा केली मनापासून व्यक्त

अध्यक्ष पुतिन यांनी लघू-मध्यम उद्योगांच्या (SME) वाढीसाठी रशिया-भारत सहकार्यावर दिला भर

ग्लोबल साउथ (विकसनशील) अर्थव्यवस्थांना पाठबळ देण्यासाठी ब्रिक्स गुंतवणूक व्यासपीठ महत्त्वाचे असल्याचे अध्यक्ष पुतिन यांनी व्यक्त केले मत

Posted On: 05 DEC 2024 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 डिसेंबर 2024

 

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को इथे आयोजित 15 व्या  व्हिटीबी रशिया कॉलिंग या गुंतवणूक मंचावर बोलताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या "भारत-प्रथम" धोरणाची आणि "मेक इन इंडिया" उपक्रमाची प्रशंसा केली.  राष्ट्रपती पुतिन यांनी भारताच्या विकासात या धोरणांनी कसा हातभार लावला यावर भर देत, विकासासाठी स्थिर वातावरण निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांची पोचपावती  दिली. 

उत्पादकतेला चालना देण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने "मेक इन इंडिया" उपक्रमाने जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे त्यांनी नमूद केले.  पुतिन यांच्या वक्तव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची आर्थिक प्रगती अधोरेखित झाली.   त्यांनी भारत सरकारचे आणि लघू- मध्यम उद्योगांसाठी (SMEs) "स्थिर परिस्थिती" निर्माण करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले, विशेषत: "मेक इन इंडिया" कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राबवलेल्या आर्थिक उपक्रमांवर, पुतीन यांनी भर दिला. 

अध्यक्ष पुतिन यांनी भारताच्या "मेक इन इंडिया" उपक्रमात असलेली रशियाच्या आत्मनिर्भरता केंद्रीत आयात धोरण कार्यक्रमाची साम्य स्थळे दाखवली आणि  भारतात उत्पादन करण्याबाबत रशियाची तयारी दर्शवली.  भारतातील गुंतवणूक फायदेशीर आहे, असेही ते म्हणाले.  भारताच्या नेतृत्वाने आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देण्यावर भर दिला आहे यावरही त्यांनी भर दिला.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेक इन इंडिया नावाचा आमच्या सारखाच एक कार्यक्रम आहे. आम्ही आमचे उत्पादन भारतात देखील करण्यास  तयार आहोत... भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार, भारत प्रथम या धोरणाला अनुसरून उद्योगा बाबत स्थैर्य निर्माण करत आहे. आम्हाला विश्वास आहे की भारतातील गुंतवणूक फायदेशीर आहे,” असे रशियाचे अध्यक्ष म्हणाले. रोजनेफ्ट या रशियन कंपनीने अलिकडेच भारतात  20 अब्ज डाॅलर्सची गुंतवणूक केली आहे अशी माहितीही पुतीन यांनी दिली.

SME च्या वाढीवर आणि BRICS+ देशांमध्ये SME साठी सुरळीत व्यवसाय व्यवहार वातावरण करण्यासाठी जलद विवाद निराकरण यंत्रणेची आवश्यकता, यावर लक्ष केंद्रीत करत, अध्यक्ष पुतिन यांनी BRICS च्या उत्क्रांतीच्या संदर्भात रशियाच्या आत्मनिर्भरता केंद्रीत आयात धोरण  कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. 

ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती-तंत्रज्ञान, उच्च-तंत्रज्ञान आणि कृषी यांसारख्या क्षेत्रातील स्थानिक रशियन उत्पादकांच्या यशाकडे लक्ष वेधून त्यांनी बाजारातून बाहेर पडणाऱ्या पाश्चात्य उत्पादन नाम चिन्हां(ब्रँड) च्या जागी होत असलेल्या नवीन रशियन ब्रँडच्या उदयाकडे लक्ष वेधले.

"आमच्यासाठी, आमच्या आत्मनिर्भरता केंद्रीत आयात धोरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे विशेष महत्वाचे आहे. नवीन रशियन ब्रँड्सच्या उदयामुळे,  स्वेच्छेने आमची बाजारपेठ सोडलेल्या पाश्चात्य कंपन्यांची जागा घेण्यास मदत होत आहे. आमच्या स्थानिक उत्पादकांनी केवळ ग्राहकोपयोगी वस्तूंमध्येच नव्हे तर, माहिती -तंत्रज्ञान  आणि उच्च-तंत्रज्ञान उद्योगांमध्येही लक्षणीय यश मिळवले आहे,” असे ते म्हणाले.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी SME च्या वाढीस पाठबळ देण्यासाठी BRICS राष्ट्रांनी आपापसात  सहकार्य वाढवावे असे आवाहन केले आणि पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या आगामी शिखर परिषदेतील सहयोगासाठी प्रमुख क्षेत्रे निश्चित करण्या करता सदस्य देशांना प्रोत्साहीत केले.  BRICS सोबत रशिया विकसित करत असलेल्या गुंतवणूक मंचाचा संदर्भ देत अध्यक्ष पुतिन म्हणाले की, सर्व भागीदार देशांना लाभ मिळवून देण्याची या मंचाची क्षमता आहे आणि आमच्या अर्थव्यवस्थांना पाठबळ देण्यासाठी आणि ग्लोबल साऊथ, तसेच पूर्वेकडील देशांना आर्थिक साधन संपत्ती प्रदान करण्यासाठी हा मंच एक महत्त्वाचे साधन बनण्याची अपेक्षा आहे.

"मी माझ्या BRICS सहकाऱ्यांना सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमधील सद्य परिस्थितीचे मूल्यमापन करण्याचे आवाहन करतो आणि आम्ही हे आमच्या ब्राझिलियन समकक्षांच्या लक्षात आणून देऊ, जे पुढील वर्षी BRICS चे नेतृत्व करतील," असे ते पुढे म्हणाले.

अधिक माहितीसाठी: http://en.kremlin.ru/events/president/news/75751

 

* * *

S.Tupe/A.Save/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2081086) Visitor Counter : 59