पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथून पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना केलेले संबोधन

Posted On: 14 MAR 2024 7:49PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी हरदीप सिंह पुरी जी, भागवत कराड जी, दिल्लीचे नायब राज्यपाल वी के सक्सेना जी, इथे उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील शेकडो शहरांमधील लाखो फेरीवाले आमचे बंधू आणि भगिनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत. त्या सर्वांचेही मी स्वागत करतो.
आजचा पीएम स्वानिधी महोत्सव अशा लोकांना समर्पित आहे जे आपल्या आजूबाजूला राहतात आणि ज्यांच्याशिवाय आपल्या दैनंदिन जीवनाची कल्पना देखील करणे कठीण आहे. आणि कोविड दरम्यान, प्रत्येकाने फेरीवाल्यांची क्षमता अनुभवली आहेच. आज या सोहळ्यानिमित्त मी आमच्या प्रत्येक फेरीवाल्याचे, हातगाडी वाल्यांचे, पदपथ विक्रेत्याचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडलेल्या मित्रांनाही या पीएम स्वनिधीचा विशेष फायदा झाला आहे. आज एक लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वर्ग करून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. आणि अधिक चांगली गोष्ट म्हणजे आज येथे दिल्ली मेट्रोच्या लाजपत नगर ते साकेत जी ब्लॉक आणि इंद्रप्रस्थ ते इंद्रलोक मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराची पायाभरणीही झाली आहे. दिल्लीकरांसाठी ही दुहेरी भेट आहे. मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.
 
मित्रहो,
आपल्या देशभरातील शहरांमध्ये लाखो लोक रस्त्यावर, पदपथांवर आणि हातगाडीवर विक्रेते म्हणून काम करतात. हेच मित्र आज इथे उपस्थित आहेत जे स्वाभिमानाने कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. त्यांच्या हातगाड्या, त्यांची दुकाने लहान जरी असली, तरी पण त्यांची स्वप्ने छोटी नसतात, त्यांची स्वप्नेही मोठी असतात. यापूर्वीच्या सरकारांनी या मित्रांची साधी दखलही घेतली नाही. त्यांना अपमान सहन करावा लागत होता, 
हालअपेष्टांनी त्रस्त व्हावे लागत होते. पदपथावर वस्तू विकताना कधी पैशांची गरज भासली तर गरज म्हणून चढ्या व्याजदराने उधारी घ्यावी लागत होती. आणि पैसे परत करताना काही दिवस किंवा काही तासांचाही उशीर झाला, तर अपमानासोबतच जास्त व्याजही भरावे लागत होते. आणि बँकेत खातीही नसायची. बँकांमध्ये प्रवेशच नसल्याने कर्ज मिळण्याचा प्रश्नच नव्हता. खाते उघडण्यासाठी कोणी गेलाच तर त्याला विविध प्रकारच्या हमी द्याव्या लागत होत्या. आणि अशा परिस्थितीत बँकेकडून कर्ज मिळणेही अशक्य होते. ज्यांची बँक खाती होती त्यांच्या व्यापाराच्या नोंदी नसायच्या. अशा अनेक समस्या असताना, कितीही मोठी स्वप्ने असली तरी प्रगती करण्याचा विचार कोण कसा करू शकणार होते? 
मित्रांनो, मला सांगा, मी वर्णन करत आहे त्याप्रमाणे तुम्हाला अशा समस्या होत्या की नाही? प्रत्येकाला होती ना? आधीच्या सरकारने ना तुमच्या समस्या ऐकल्या, ना समजून घेतल्या, ना समस्या सोडवण्यासाठी कधी कोणती पावले उचलली. तुमचा हा सेवक गरिबीतून इथवर पोहोचला आहे. मी गरिबी अनुभवली आहे. आणि म्हणूनच ज्यांना कोणी विचारले नाही, त्यांची मोदींनी विचारपूसही केली आणि मोदींनी त्यांची सेवाही केली. काहींकडे हमी द्यायला काहीच नव्हतं, तेव्हा मोदींनी बँकांना तसंच रस्त्यावरील फेरीवाले बंधू-भगिनींना सांगितलं होतं की, तुमच्याकडे हमी देण्यासारखं काही नसेल, तर काळजी करू नका, मोदी तुमची हमी घेतील, आणि मी तुमची हमी घेतली. आणि आज मी मोठ्या अभिमानाने सांगतो की मी मोठ्या लोकांची बेईमानीही पाहिली आहे आणि लहान लोकांचा प्रामाणिकपणा देखील पाहिला आहे. पीएम स्वानिधी योजना ही मोदींची अशीच एक हमी आहे, जी आज रस्त्यावर, पदपथांवर, हातगाडीवर छोटी कामे करणाऱ्या लाखो कुटुंबांचा आधार बनली आहे. त्यांना बँकांकडून स्वस्तात कर्ज मिळावे, मोदींच्या हमीवर कर्ज मिळावे, असे मोदींनी ठरवले. पीएम स्वनिधी अंतर्गत, तुम्ही पहिल्यांदा कर्ज घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला 10,000 रुपये कर्ज मिळते. जर तुम्ही वेळेवर परतफेड केली तर बँक स्वतः तुम्हाला 20 हजार रुपये कर्ज देऊ करते. आणि हे पैसे वेळेवर परत केल्यास आणि डिजिटल व्यवहार केल्यास बँकांकडून 50 हजार रुपयांपर्यंत मदतीचे आश्वासन दिले जाते. आणि आज तुम्ही इथे बघितले, तर असे काही लोक आहेत ज्यांना 50 हजार रुपयांचे कर्ज मिळाले आहे. म्हणजेच पीएम स्वनिधी योजनेने लहान व्यवसायांचा विस्तार करण्यात खूप मदत केली आहे. आजमितीस देशातील 62 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना सुमारे 11 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. हा आकडा लहान नाही फेरीवाल्यांसाठी, फेरीवाला बंधू-भगिनींवर मोदींचा इतका विश्वास आहे की त्यांनी 11 हजार कोटी रुपये त्यांच्या हाती सोपवले आहेत. आणि ते वेळेवर परतफेड करतात हा माझा आजवरचा अनुभव आहे. आणि मला आनंद आहे की पीएम स्वनिधीच्या निम्म्याहून अधिक लाभार्थी या आमच्या माता-भगिनी आहेत.
 
मित्रहो,
कोरोनाच्या काळात जेव्हा सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली तेव्हा या योजनेचा आवाका किती वाढेल याची कोणालाच कल्पना नव्हती. तेव्हा या योजनेचा फारसा फायदा होणार नाही असे काहींनी म्हटले होते. परंतु पीएम स्वनिधी योजने संदर्भात सध्या जो अभ्यास पुढे आला आहे तो अशा लोकांचे डोळे उघडणारा आहे. स्वनिधी योजनेमुळे पदपथावरील- गाड्यांवरील विक्रेत्यांचे उत्पन्न खूप वाढले आहे. खरेदी आणि विक्रीच्या डिजिटल नोंदींमुळे आता तुम्हा सर्वांना बँकांची मदत मिळणे सोपे झाले आहे. इतकेच नाही तर या मित्रांना डिजिटल व्यवहारांवर वर्षाला 1200  रुपयांपर्यंतचा रोखपरतावाही  मिळतो. म्हणजे तुम्हाला एक प्रकारचे बक्षीसच मिळते.
 

मित्रांनो

रस्त्यावरील फेरीवाले, पदपथावरील विक्रेते आणि हातगाड्यांवर काम करणारे तुमच्यासारख्या लाखो कुटुंबातील लोक शहरांमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत राहत आहेत.  तुमच्यापैकी बहुतेकजण, आपल्या खेड्यातून येऊन शहरांमध्ये हे काम करतात. ही जी पीएम स्वानिधी योजना आहे ती केवळ बँकांना जोडण्याचा कार्यक्रम नाही. तर यामुळे लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांचाही थेट लाभ मिळत आहे.  तुमच्या सारख्या सर्व मित्रांना मोफत राशन, मोफत उपचार आणि मोफत गॅस जोडणीची सुविधा मिळत आहे.  शहरांमध्ये नवीन शिधापत्रिका बनवणे हे काम करणाऱ्या सहकाऱ्यांसमोर किती मोठे आव्हान होते हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे.  तुमची समस्या सोडवण्यासाठी मोदींनी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजना आणण्यात आली आहे. आता एकाच शिधापत्रिकेवर देशात कुठेही रेशन मिळते.

मित्रांनो

फेरीवाले, पदपथावरील विक्रेते, हातगाड्यांवर काम करणारे बहुतेकजण झोपडपट्टीत राहतात.  मोदींनीही याचीही काळजी वाहिली  आहे.  देशात बांधण्यात आलेल्या 4 कोटींहून अधिक घरांपैकी सुमारे एक कोटी घरे शहरी गरिबांना देण्यात आली आहेत.  देशातील विविध शहरांमध्ये गरिबांना त्याचा मोठा लाभ मिळत आहे. राजधानी दिल्लीत झोपडपट्ट्यांच्या जागी कायमस्वरूपी घरे देण्यासाठी भारत सरकारही मोठी मोहीम राबवत आहे.  दिल्लीत 3 हजारांहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, साडेतीन हजारांहून अधिक घरे लवकरच पूर्ण होणार आहेत. दिल्लीतील अनधिकृत वसाहतीं नियमित करण्याचे कामही वेगाने पूर्ण केले जात आहे.  अलीकडेच भारत सरकारने पीएम सूर्यघर- मोफत वीज योजना देखील सुरू केली आहे. या योजनेंतर्गत छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी केंद्र सरकार संपूर्ण मदत करेल.  यामुळे 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल. उरलेली वीज सरकारला विकून कमाई होईल. या योजनेवर सरकार 75 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

मित्रांनो

केंद्रातील भाजप सरकार दिल्लीतील गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी अहोरात्र झटत आहे. एकीकडे आम्ही शहरी गरिबांसाठी कायमस्वरूपी घरे बांधली, तर मध्यमवर्गीय कुटुंबांना घरे बांधण्यासाठी मदत केली.  देशभरातील सुमारे 20 लाख मध्यमवर्गीय कुटुंबांना घरे बांधण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.  देशातील शहरांमधील वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. त्यासाठी देशातील डझनभर शहरांमध्ये मेट्रो सुविधेवर काम सुरू असून इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जात आहेत.  दिल्ली मेट्रोची व्याप्ती 10 वर्षात जवळपास दुप्पट झाली आहे.  जगात काही मोजक्याच देशांमध्ये दिल्लीइतके मोठे मेट्रो जाळे आहे.  खरं तर, आता दिल्ली-एनसीआर देखील नमो भारत सारख्या वेगवान रेल्वे जाळ्याने जोडले जात आहे.  दिल्लीतील वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आमचे सरकार सातत्याने काम करत आहे.  केंद्र सरकार दिल्लीत एक हजाराहून अधिक इलेक्ट्रिक बसेस चालवत आहे. दिल्लीच्या आजूबाजूला आम्ही बनवलेले द्रुतगती मार्ग  वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्याही कमी करत आहेत. काही दिवसांपूर्वी द्वारका द्रुतगती मार्गाचेही उद्घाटन करण्यात आले. यामुळे दिल्लीतील मोठ्या लोकसंख्येचे जीवन सुसह्य होईल.

मित्रांनो

गरीब आणि मध्यमवर्गीय तरुणांनी क्रीडा क्षेत्रात प्रगती करावी, हा भाजप सरकारचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. त्यासाठी गेल्या 10 वर्षांत प्रत्येक स्तरावर वातावरण तयार केले आहे. खेलो इंडिया योजनेच्या माध्यमातून देशभरातील सामान्य कुटुंबातील ते  मुले आणि मुलीही पुढे येत आहेत, ज्यांना पूर्वी संधी मिळणे अशक्य वाटत होते.  आज त्यांच्या घराजवळ चांगल्या क्रीडा सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्यांच्या प्रशिक्षणासाठी सरकार मदत करत आहे. त्यामुळे माझ्या गरीब कुटुंबातून येणारे खेळाडूही तिरंग्याचा मान उंचावत आहेत.

मित्रांनो

मोदी गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यात व्यग्र आहेत. तर दुसरीकडे, इंडी आघाडी आहे, जी मोदींना रात्रंदिवस शिव्याशाप देण्याच्या घोषणापत्रासह दिल्लीत एकवटली आहे. या इंडी आघाडीची विचारधारा काय आहे? त्यांची  विचारधारा आहे कुशासन, भ्रष्टाचार आणि देशविरोधी अजेंड्याला प्रोत्साहन देणे. आणि मोदींची विचारधारा आहे लोककल्याणातून राष्ट्रीय कल्याण घडवून आणणे, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण मुळापासून उखडून टाकणे आणि भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवणे. मोदींना कुटुंब नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.  मोदींसाठी देशातील प्रत्येक कुटुंब हेच त्यांचे कुटुंब आहे.  आणि म्हणूनच आज सारा देश म्हणतोय – मी आहे मोदींचा परिवार!

मित्रांनो

देशातील सामान्य माणसाची स्वप्ने आणि मोदींचा संकल्प, हीच भागीदारी उज्ज्वल भविष्याची हमी आहे. पुन्हा एकदा दिल्लीतील जनतेचे आणि देशभरातील स्वनिधीच्या लाभार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. शुभेच्छा, धन्यवाद.

***

 
NM/VasantiJ/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2014837) Visitor Counter : 35