पंतप्रधान कार्यालय

भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या तीन दुष्प्रवृत्तीविरोधात आपण सर्वसामर्थ्याने लढा द्यायला हवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Posted On: 15 AUG 2023 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्याच्या तटावरून जनतेला संबोधित केले. आपल्याला स्वप्नांची पूर्तता करायची असेल, संकल्प साध्य करायचे असतील तर भ्रष्टाचार, घराणेशाही आणि  तुष्टीकरण या तीन दुष्प्रवृत्तीविरोधात आपण सर्वसामर्थ्याने लढा देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिली सर्वात मोठी अपप्रवृत्ती म्हणजे भ्रष्टाचार असून आपल्या देशातल्या सर्व समस्यांचे हे मूळ आहे. “प्रत्येक क्षेत्र आणि भागातल्या भ्रष्टाचारापासून मुक्तता, भ्रष्टाचाराविरोधात लढा ही काळाची गरज आहे आणि माझ्या देशबांधवानो, कुटुंबियांनो, हा मोदी यांचा शब्द आहे, ही माझी वैयक्तिक हमी आहे की भ्रष्टाचाराविरोधातला लढा मी जारी ठेवेन”.

दुसरी अपप्रवृत्ती म्हणजे घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचा नाश केला आहे. “या घराणेशाही पद्धतीने देशाला जखडले असून सर्वसामान्यांचे हक्क हिरावले होते”, पंतप्रधान म्हणाले.

तिसरी दुष्प्रवृत्ती म्हणजे तुष्टीकरण आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. “तुष्टीकरणाने देशाची मूळ विचारधारा, सौहार्द या राष्ट्रीय भावनेला डाग लावला आहे. या लोकांनी सगळे नष्ट केले. म्हणूनच या तीन दुष्प्रवृत्ती विरोधात आपण सर्व शक्तीनिशी लढा द्यायला हवा. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण यांना थारा मिळाल्याने देशातल्या जनतेच्या आकांक्षा दबल्या होत्या” असे त्यांनी सांगितले. 

या तीन दुष्प्रवृत्तीनी देशातल्या ज्या लोकांकडे क्षमता होत्या त्या हिरावल्या. या बाबींनी आपल्या जनतेच्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरवले. गरीब असो, दलित असो, मागास असो, पसमंदा समुदायातल्या व्यक्ती असोत, आपल्या आदिवासी बंधू-भगिनी असोत, आपल्या माता- भगिनी असोत आपणा सर्वाना आपल्या हक्कांसाठी या तीन अपप्रवृत्तींचा नाश करावाच लागेल”.

भ्रष्टाचाराच्या अपप्रवृत्तीवर जोरदार टीका करताना “भ्रष्टाचाराला जराही थारा न देणारे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे.सार्वजनिक जीवनात यापेक्षा ओंगळ काही असूच शकत नाही”, असे पंतप्रधान म्हणाले. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराचा उल्लेख त्यांनी केला. विविध योजनांमधली 10 कोटी बनावट नावे हटवण्याचा आणि वित्तीय गुन्हे करून फरार झालेल्यांची 20 पट संपत्ती जप्त केल्याचा त्यांनी उल्लेख केला. 

घराणेशाहीवर प्रहार करताना, घराणेशाहीच्या राजकारणाविषयी खंत व्यक्त करत “या विचाराचे राजकीय पक्ष हे कुटुंबाचे, कुटुंबाकडून आणि कुटुंबासाठी असतात आणि त्यामुळे प्रतिभेची गळचेपी होते”. या वृत्तीपासून लोकशाही मुक्त होणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

त्याचबरोबर तुष्टीकरणाने सामाजिक न्यायावर मोठा आघात केला आहे. “तुष्टीकरणाचा विचार आणि राजकारण, तुष्टीकरणासाठी सरकारी योजनांची पद्धत यामुळे सामाजिक न्यायाची मोठी हानी झाली आहे. म्हणूनच तुष्टीकरण आणि भ्रष्टाचार हे विकासाचे सर्वात मोठे शत्रू असल्याचे आम्ही मानतो. देशाच्या  विकास साध्य करण्यासाठी, 2047 पर्यंत विकसित भारताचे आपले स्वप्न साध्य करायचे असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत जराही भ्रष्टाचार खपवून घेता कामा नये आणि हीच भावना आपण सदैव बाळगली पाहिजे” असे पंतप्रधानांनी सांगितले.    

 

* * *

S.Thakur/N.Chitale/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1949145) Visitor Counter : 150