पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीवर आधारित अखिल भारतीय शिक्षण समागमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


''शिक्षणाला संकुचित विचारसरणीतून बाहेर काढून 21व्या शतकातील आधुनिक विचारांशी जोडणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ आधार आहे''

''ब्रिटिशांनी निर्माण केलेली शिक्षणपद्धतीत कधीच भारतीय मूल्यांचा समावेश नव्हता"

"आपली तरुणाई कुशल, आत्मविश्वासपूर्ण आणि व्यवहारचतुर असली पाहिजे यासाठी शैक्षणिक धोरण पाया तयार करत आहे.''

"महिलांसाठी बंद असलेल्या क्षेत्रात आता त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडत आहे"

"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने' आपल्याला अपार संधी साकारण्याचे साधन दिले आहे"

Posted On: 07 JUL 2022 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर आधारित अखिल भारतीय शिक्षा समागमाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल  आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री  धर्मेंद्र प्रधान,  अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह हे राज्यमंत्री , शिक्षणतज्ज्ञ आणि इतर हितसंबंधीत  यावेळी उपस्थित होते.

‘अमृत काळ ’चे संकल्प पूर्ण करण्यात आपली शिक्षण व्यवस्था आणि तरुण पिढीचा मोठा वाटा आहे, असे यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले.  महामानव मदन मोहन मालवीय यांना वंदन करत  त्यांनी समागमसाठी शुभेच्छा दिल्या.आदल्या दिवशी, पंतप्रधानांनी एलटी महाविद्यालयामध्ये  अक्षय पत्र माध्यान्ह भोजन स्वयंपाकघराचे  उद्घाटन केले.त्यांनी यावेळी ज्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्या विद्यार्थ्यांची उच्च प्रतिभा ही या प्रतिभेचा उपयोग करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांचे द्योतक आहे, असे ते म्हणाले.

संकुचित विचारसरणीतून शिक्षणाला बाहेर काढून 21 व्या शतकातील आधुनिक विचारांशी शिक्षणाला जोडणे हा राष्ट्रीय शिक्षण  धोरणाचा मूळ आधार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशात बुद्धिमत्तेची आणि प्रतिभेची कधीच कमतरता नव्हती,मात्र , ब्रिटिशांनी निर्माण केलेली शिक्षणपद्धती कधीही भारतीय मूल्यांचा भाग नव्हती, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी भारतीय शिक्षणातील  बहुआयामी मूल्य अधोरेखित केली आणि आधुनिक भारतीय शिक्षण पद्धतीसंदर्भात  दृष्टीकोन विचारला. आपण केवळ पदवीधारक युवा वर्ग  तयार करू नये तर देशाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची  गरज असलेली आपली शिक्षण व्यवस्था देशाला दिली पाहिजे, आपल्या शिक्षकांनी आणि शैक्षणिक संस्थांनी या संकल्पाचे नेतृत्व करावे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. नव्या भारताच्या निर्मितीसाठी, नवीन प्रणाली आणि आधुनिक प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत यावरही  पंतप्रधानांनी भर दिला.यापूर्वी ज्याची कल्पनाही केली जात नव्हती ते आता प्रत्यक्षात आले  आहे, असे ते म्हणाले. कोरोनाच्या मोठ्या महामारीतून आपण केवळ इतक्या वेगाने सावरलो नाही, तर आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक झाली आहे. आज आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप व्यवस्था आहोत. असे पंतप्रधानांनी सांगितले.

अंतराळ तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात, जिथे यापूर्वी  केवळ सरकार सर्व काही करत असे, मात्र आता खाजगी कंपन्यांच्या  माध्यमातून तरुणाईसाठी एक नवीन जग तयार केले जात आहे.पूर्वी महिलांसाठी बंद असलेली  क्षेत्र आता त्यांची प्रतिभेचे दर्शन घडवत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

मुलांना त्यांच्या कलागुणांनुसार आणि मुलांच्या आवडीनुसार कुशल बनवणे यावर नवीन धोरणात संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, हे पंतप्रधानांनी  अधोरेखित केले. "आपले तरुण कुशल, आत्मविश्वासपूर्ण , व्यवहारचतुर  आणि विचारी  असले पाहिजेत यासाठी शिक्षण धोरण  पाया तयार करत आहे", असे त्यांनी सांगितले. नवीन विचारप्रक्रिया घेऊन भविष्यासाठी काम करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.आज मुले खूप प्रगत प्रतिभा  दाखवत आहेत आणि त्यांच्या या प्रतिभेला सहाय्य  करण्यासाठी आणि त्या प्रतिभेचा वापर करण्याच्या दृष्टीने  आपण तयार असले पाहिजे, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली  तसेच  धोरण तयार केल्यानंतर प्रयत्नांची गती कमी होऊ दिली नाही यावर त्यांनी भर दिला.धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात  सतत चर्चा आणि काम सुरु आहे.धोरणाच्या अंमलबजावणीबद्दल बोलण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः अनेक चर्चासत्र आणि कार्यक्रमांना हजेरी लावली. परिणामीदेशाचा युवक देशाच्या विकासात सक्रिय भागीदार बनत आहे,अशी स्थिती निर्माण झाली आहे .

देशातील शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या  मोठ्या  बदलाबाबतही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. देशात अनेक नवीन महाविद्यालये, विद्यापीठे, आयआयटी आणि आयआयएम सुरु होत आहेत.2014 नंतर वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 55 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती त्यांनी  दिली.विद्यापीठांसाठी असलेली सामायिक प्रवेश परीक्षा विद्यापीठ प्रवेशांमध्ये सुलभता आणि समानता आणेल. राष्ट्रीय शिक्षण  धोरणामुळे आता मातृभाषेतून शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे,याचप्रमाणे  संस्कृतसारख्या प्राचीन भारतीय भाषांनाही पुढे नेले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

भारत जागतिक शिक्षणाचे एक मोठे केंद्र म्हणून उदयाला  येऊ शकतो, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.भारतीय उच्च शिक्षण अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.शैक्षणिक संस्थांना आंतरराष्ट्रीय व्यवहार करता यावे या अनुषंगाने, 180 विद्यापीठांमध्ये विशेष कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.  या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पद्धतींबाबत जागरूक राहण्याची सूचना त्यांनी तज्ज्ञांना केली आहे.

पंतप्रधानांनी व्यावहारिक अनुभव आणि प्रत्यक्ष स्थळी जाऊन कार्य करण्याच्या  महत्त्वावर भर दिला आणि ‘लॅब टू लँड’ असा दृष्टिकोन अनुसरावा असे सांगितले. त्यांनी अभ्यासकांना त्यांचे अनुभव पडताळणी चाचणीसह प्रमाणित करण्यास सांगितले.   पुराव्यावर आधारित संशोधन करावे असेही त्यांनी सांगितले.  भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशावर संशोधन करावे आणि याचा सर्वोत्तम वापर करण्याचे मार्ग शोधण्यास आणि जगातील लोकसंख्येसाठी  उपाय शोधण्यास त्यांनी त्याचप्रमाणे , प्रतिरोधक  पायाभूत सुविधा हे संशोधनाचे आणखी एक क्षेत्र आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने’ आपल्याला यापूर्वी उपलब्ध नसलेल्या अपार  संधींची  जाणीव करून देण्याचे साधन दिले आहे,त्याचा पुरेपूर वापर करण्याची गरज आहे, असे त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले.

अखिल भारतीय शिक्षण समागम

शिक्षण मंत्रालयाने 7 ते 9 जुलै दरम्यान शिक्षण  समागम आयोजित केला आहे. हा समागम, देशभरातील प्रख्यात शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते आणि  शिक्षण क्षेत्रातील धुरिणांना  विचारविनिमय करण्यासाठी  आणि त्यांचे अनुभव सामायिक करण्यासाठी तसेच  राष्ट्रीय शिक्षण  धोरण (एनईपी ) 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनेचर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल.देशभरातील विद्यापीठे (केंद्रीय, राज्य, अभिमत  आणि खाजगी) आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था (आयआयटी , आयआयएम , एनआयटी , आयआयएसइआर ) मधील 300 हून अधिक शैक्षणिक, प्रशासकीय आणि संस्थात्मक तज्ज्ञांच्या क्षमता बांधणीचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला  आहे.विविध हितसंबंधीत  त्यांच्या संबंधित संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या  अंमलबजावणीसंदर्भातील  प्रगती सादर करतील आणि उल्लेखनीय अंमलबजावणी धोरणे, सर्वोत्तम पद्धती आणि यशोगाथा देखील सामायिक करतील.

तीन दिवसीय शिक्षण  समागमादरम्यान, राष्ट्रीय शिक्षण धोरण  2020 अंतर्गत उच्च शिक्षणासाठी निश्चित केलेल्या  नऊ विषयांवर गट चर्चा आयोजित केल्या जातील. बहुविद्याशाखीय आणि समग्र शिक्षण; कौशल्य विकास आणि रोजगारक्षमता; संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकता; दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांची क्षमता बांधणी; गुणवत्ता,क्रमवारी आणि अधिस्वीकृती ; डिजिटल सक्षमीकरण आणि ऑनलाइन शिक्षण; न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षण; भारतीय ज्ञान प्रणाली आणि उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण अशा विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

R.Aghor /S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1839908) Visitor Counter : 416