पंतप्रधान कार्यालय

चेन्नईमधील विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 26 MAY 2022 8:58PM by PIB Mumbai

 

तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री  एम. के. स्टॅलिन, केंद्रीय मंत्री मंडळातील माझे सहकारी, तमिळनाडू सरकारचे मंत्री, संसद सदस्य, तमिळनाडू विधानसभेचे सदस्य, तमिळनाडूच्या भगिनींनो आणि बंधूनो, वणक्कम! तमिळनाडूमध्ये येणे नेहमीच आनंददायी असते! ही भूमीच विशेष आहे. या राज्यातील  लोक, संस्कृती आणि भाषा अद्वितीय  आहेत. महान भारतियार यांनी ते सुंदरपणे व्यक्त केले आहे, ते म्हणतात  :-

सेंतमिल नाडु एन्नुम पोथीनीले इन्बा तेन वन्तु पायुतु कादिनीले |

 

मित्रांनो,

प्रत्येक क्षेत्रात तमिळनाडूतील कोणी ना कोणी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करत असतो. नुकतेच, डेफलिंपिक्स  क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या  क्रीडापथकाबरोबर आपल्या निवासस्थानी मी संवाद साधला.  तुम्हाला माहिती असेलच, यावेळी भारताची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती. पण, तुम्हाला हे माहीत आहे का?   आपण जिंकलेल्या 16  पदकांपैकी 6  पदकांमध्ये तमिळनाडूच्या तरुणांचा महत्वाचा वाटा होता! संघासाठी हे सर्वोत्तम योगदान आहे. तमिळ भाषा शाश्वत आहे आणि तमिळ संस्कृती वैश्विक आहे. चेन्नईपासून कॅनडापर्यंत, मदुराईपासून मलेशियापर्यंत, नमक्कलपासून न्यूयॉर्कपर्यंत, सेलमपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत पोंगल आणि पुथंडूचे प्रसंग मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. फ्रान्समधील कान्स येथे चित्रपट महोत्सव सुरू आहे. तिथे तमिळनाडूच्या या महान मातीचे सुपुत्र, थिरु. एल. मुरुगन हे रेड कार्पेटवर पारंपरिक तमिळ पोशाखात गेले. त्यामुळे जगभरातील तमिळीसाठी ही  खूप अभिमानाची बाब राहिली.

 

मित्रांनो,

तमिळनाडूच्या विकासाच्या प्रवासातील आणखी एक गौरवशाली अध्याय साजरा करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत. 31 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी केली जात आहे. आपण या प्रकल्पांचे तपशील पाहिले परंतु मला काही मुद्दे इथे सांगायचे आहेत. रस्तेबांधणीवर लक्ष केंद्रित केल्याचे  स्पष्टपणे दिसून येत आहे. रस्त्याची कामे आम्ही करत आहोत कारण त्याचा थेट संबंध आर्थिक समृद्धीशी आहे. बेंगळुरू - चेन्नई द्रुतगती मार्ग  दोन प्रमुख विकास केंद्रांना जोडणारा आहे.  चेन्नई बंदर ते मदुरावायल यांना जोडणा-या  चौपदरी  उन्नत मार्गामुळे  चेन्नई बंदर  अधिक कार्यक्षम बनेल आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल. नेरालुरू ते धर्मपुरी विभाग आणि मीनसुरूत्ती ते चिदंबरम विभागाचा विस्तार केल्यास लोकांना अनेक फायदे होतील. मला विशेष आनंद होत आहे की 5 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होत आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हे आधुनिकीकरण आणि विकास करण्यात येत आहे. त्याचवेळी स्थानिक कला आणि संस्कृती यांचे संवर्धन कसे होईल, हे पाहिले जात आहे.  मदुराई आणि थेनी मधील गेज रूपांतरण माझ्या शेतकरी भगिनी आणि बंधूंना मदत करेल आणि त्यांना अधिक बाजारपेठांशी संपर्क साधणे सोईचे होईल.

 

मित्रांनो,

पीएम-आवास योजनेंतर्गत ऐतिहासिक चेन्नई लाइट हाऊसप्रकल्पाचा एक भाग म्हणून ज्यांना घरे मिळणार आहेतत्या सर्वांचे मी अभिनंदन करू इच्छितो. आमच्यासाठी हा एक अतिशय समाधान देणारा प्रकल्प आहे. परवडणारी, टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही  घरे बनवण्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धतींचा समावेश करण्यासाठी आम्ही ग्लोबल चालेंज सुरु केले. विक्रमी वेळेत, अशा प्रकारचा पहिला लाइट हाऊस’  प्रकल्प साकारण्‍यात आला आहे आणि मला आनंद आहे की तो चेन्नईमध्ये आहे. तिरुवल्लूर ते बेंगळुरू आणि एन्नोर ते चेंगलपट्टू या नैसर्गिक वायू वाहिनीच्या उद्घाटनानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील लोकांसाठी सुलभ एलएनजीउपलब्ध होईल. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि चेन्नई बंदर आर्थिक विकासाचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीकोनातून, चेन्नई येथे मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्कची आज पायाभरणी करण्यात आली. आमचे सरकार देशाच्या इतर भागांमध्ये असे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे. ही मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क्स आपल्या देशाच्या मालवाहतूक परिसंस्थेचा कायापालट  घडवून आणतील. विविध क्षेत्रामध्‍ये सुरू होत असलेले हे  प्रत्येक प्रकल्प आता  रोजगार निर्मितीला चालना देतील आणि  आत्मनिर्भर होण्याचा आपला संकल्प साध्‍य होईल.

 

मित्रांनो,

मला खात्री आहे कीतुमच्यापैकी प्रत्येकाची इच्छा आहे कीआपल्या  मुलांनी आपल्यापेक्षा चांगले जीवन जगावे. तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य हवे आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाच्या अटींपैकी एक म्हणजे उच्च दर्जाच्या  पायाभूत सुविधा असणे ही आहे.

ज्या देशांनी विकसनशील देशापासून विकसित देश होण्यापर्यंत मजल गाठली, त्या देशांनी पायाभूत सुविधांना सर्वाधिक महत्त्व दिल्याचे आपल्याला इतिहासाने शिकवले आहे. भारत सरकार सर्वोत्कृष्ट आणि शाश्वत अशा तऱ्हेच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे.  ज्यावेळी मी पायाभूत सुविधा उभारण्याबद्दल बोलत असतो तेव्हा सामाजिक आणि जमिनीवरील अशा दोन्ही पायाभूत सुविधा बद्दल बोलत असतो. सामाजिक पायाभूत सुविधांचा वरचा दर्जा गाठणे म्हणजे गरीब कल्याण हे लक्ष्य आम्ही ठरवले आहे. आमचा भर असलेली सामाजिक मूलभूत संरचना सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या मूलभूत तत्त्वावर भर देते. महत्वाच्या योजना संपूर्णपणे प्रत्यक्षात याव्या यावर सरकार काम करत आहे. कुठलेही क्षेत्र घ्या शौचालय, घर बांधणी, आर्थिक समानता... आम्ही पूर्ण लक्ष्य गाठण्याकडे वाटचाल करत आहोत. प्रत्येक घराला नल से जल म्हणजेच नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळावे यावर आम्ही काम करत आहोत. हे जेव्हा आपण करतो तेव्हा वंचित करणे किंवा भेदभाव याला वाव राहत नाही आणि जमिनीवरील मूलभूत सुविधांकडे लक्ष केंद्रित करण्यामुळे भारतातील युवावर्गाला सर्वात जास्त लाभ होतो. युवकांच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी यामुळे मदत होते आणि त्यांना संपत्ती तसेच मूल्यवर्धन याकडे आपल्या अपेक्षा केंद्रित करता येतात.

 

मित्रहो,

ज्याला सर्वसामान्यपणे पायाभूत सुविधा म्हटले जाते त्याच्या पुढे आमचे सरकार गेले आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, ऊर्जा आणि पाणी. आज आम्ही भारताची नैसर्गिक वायूच्या नळांचे जाळे वाढवण्यावर काम करत आहोत . I-ways म्हणजेच इंटरनेटच्या वेढ्यात जास्तीत जास्त गोष्टी आणण्याचा प्रयत्नांवर काम होत आहे. प्रत्येक गावात वेगवान इंटरनेट देणे हे आमचं स्वप्न आहे. यामुळे मूलभूत बदल घडवण्याची क्षमता आहे त्याचा विचार करा. काही महिन्यांपूर्वीच आम्ही पीएम गती-शक्ती कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या काही वर्षांमध्ये भारतात सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सर्व संबंधित आणि मंत्रालये एकत्र येतील. लाल किल्ल्यावर यांना बोलताना मी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन बद्दल बोललो होतो.  हा प्रकल्प 100 लाख कोटींचा आहे हा दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी काम सुरू आहे या वर्षाच्या अर्थसंकल्पात 7.5 लाख कोटी भांडवली खर्चासाठी निर्धारित करण्यात आले आहेत. ही आत्तापर्यंत निर्धारित केलेली सर्वाधिक रक्कम आहे. पायाभूत सुविधा निर्मिती करताना हे प्रकल्प वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होतील याची खात्री आम्ही देतो.

 

मित्रहो,

तामिळ भाषा आणि संस्कृती यांची लोकप्रियता आणखी वाढवण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. या वर्षाच्या जानेवारीत चेन्नईमध्ये अभिजात तामिळ भाषेसाठी केंद्रीय संस्था’ (सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ क्लासिकल तमिळ ) या संस्थेच्या परिसराचे उद्घाटन झाले.  या परिसराला केंद्र सरकारचे संपूर्ण अनुदान आहे . येथे भव्य ग्रंथालय, ई-ग्रंथालय, परिषदेसाठी सभागृहे आणि मल्टिमीडिया सभागृह अशी व्यवस्था आहे. बनारस हिंदू विद्यापीठात नुकतेच तामिळ भाषेसाठी सुब्रण्यम भारती चेअरघोषित झाले. बनारस हिंदू विद्यापीठ हे माझ्या मतदान क्षेत्रात येत असल्यामुळे माझ्यासाठी ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने भारतीय भाषांना प्राधान्य देण्यास महत्त्व दिले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे तंत्रविज्ञानविषयक आणि वैद्याकिय अभ्यासक्रम स्थानिक भाषांतून करता येणार आहेत. तमिळनाडूच्या युवकांना याचा लाभ होईल.

 

मित्रहो,

सध्या श्रीलंका मोठ्या कठीण काळातून जात आहे. तिथे होत असलेल्या घडामोडींबद्दल सहाजिकच आपण चिंतेत आहात हे मला खात्रीने माहित आहे. जवळचा मित्र आणि शेजारी देश म्हणून भारत श्रीलंकेला शक्य तितके सर्व सहकार्य देत आहे. त्यामध्ये आर्थिक सहाय्य, इंधनासाठी सहाय्य, अन्न औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठीचे सहाय्य याचा समावेश आहे. अनेक भारतीय संस्था आणि व्यक्तिगत पातळीवर भारतीयांनी त्यांच्या श्रीलंकेतील बांधवांसाठी, श्रीलंकेच्या  उत्तरेकडे तसेच पूर्वेकडे तसेच खेडोपाडी राहणाऱ्या तामिळी लोकांसाठीही मदत पाठवली आहे. श्रीलंकेला देण्यात येणारे आर्थिक सहाय्य वाढवावे हा मुद्दा भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जोरकसपणे मांडला आहे . जनतेबरोबर भारत उभा आहे आणि लोकशाही, स्थैर्य यांचे रक्षण व आर्थिक  संकटातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य करत आहे

 

मित्रहो,

जाफनाला काही वर्षांपूर्वी दिलेली भेट मी विसरू शकत नाही. जाफनाला भेट देणारा मी पहिलाच भारतीय पंतप्रधान होतो. श्रीलंकेतील तामिळी लोकांसाठी भारत सरकारने अनेक प्रकल्प हाती घेत आहे. आरोग्यसेवा, वाहतूक, घरबांधणी आणि सांस्कृतिक अशा क्षेत्रातील हे प्रकल्प आहेत.

 

मित्रहो,

सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. 75 वर्षांपूर्वी आपण एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आपल्या स्वातंत्र सैनिकांची या देशाबद्दल स्वप्ने होती ती पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे आणि अशा प्रसंगी आपण ते पूर्ण करू याची मला खात्री आहे. आपण भारताला अधिक शक्तिशाली आणि अधिक वैभवसंपन्न बनवू. विकासकामे सुरू झाली आहेत त्याबद्दल पुन्हा एकवार अभिनंदन.

वणक्कम!

धन्यवाद!

***

Jaydevi PS/N.Chitale/S.Bedekar/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1828804) Visitor Counter : 182