पंतप्रधान कार्यालय
भक्तीसंत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
05 FEB 2022 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2022
ओम असमद् गुरूभ्यो नमः !
ओम श्रीमते रामानुजाय नमः !
कार्यक्रमामध्ये आपल्यासमवेत उपस्थित असलेले तेलंगणाचे राज्यपाल डॉक्टर तमिलसाई सौंदरराजन, पूज्य जी. आर. स्वामी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी कृष्ण रेड्डी, डॉक्टर रामेश्वर राव, मान्यवर भागवतजन, पूज्य संतवर्ग, भगिनी आणि सज्जन हो,
आज माता सरस्वतीच्या आराधनेच्या पवित्र काळाचा, वसंत पंचमीचा दिवस आहे. माता शारदेची विशेष कृपा अवतार असणारे रामानुजाचार्य यांच्या प्रतिमेची स्थापना अशा शुभदिनी होत आहे. आपल्या सर्वांना मी वसंत पंचमीच्या शुभेच्छा देतो. माता सरस्वतीला मी प्रार्थना करता की, जगद्गुरू रामानुजाचार्य यांचे ज्ञान संपूर्ण विश्वाला पथदर्शी ठरावे.
मित्रांनो,
आपल्याकडे असे म्हणतात की, ‘‘ध्यान मूलम् गुरू मूर्ति।’ याचा अर्थ असा आहे की, गुरूची मूर्ती आपल्यासाठी ध्यानाचे केंद्र आहे. कारण गुरूच्या माध्यमातूनच आपल्याला ज्ञान प्रकट होत असते. जे अज्ञान आहे, त्याचे ज्ञान होत असते. अप्रकट असलेले प्रकट करण्यासाठी ही प्रेरणा आहे. सूक्ष्मालाही साकार करण्याचा हा संकल्प आहे. हीच तर भारताची परंपरा आहे. आपण नेहमीच या मूल्यांना आणि विचारांना आकार दिला आहे. जे युगा-युगांपर्यंत मानवतेला दिशा देऊ शकतील. आज पुन्हा एकदा जगद्गुरू रामानुजाचार्य यांच्या या भव्य-विशाल मूर्तीच्या माध्यमातून भारत मानवीय ऊर्जा आणि प्रेरणांना मूर्त रूप देत आहे. रामानुजाचार्य यांचा हा पुतळा त्यांचे ज्ञान, वैराग्य आणि आदर्श यांचे प्रतीक आहे. मला विश्वास आहे की, हा पुतळा केवळ आगामी पिढीला प्रेरणा देईल असे नाही तर भारताची प्राचीन ओळख अधिक मजबूत करेल. तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना आणि संपूर्ण विश्वामध्ये विखुरलेल्या रामानुजाचार्य यांच्या सर्व अनुयायांचे या शुभप्रसंगी मी अनेकवार अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आत्ताच मी 108 दिव्य देशम् मंदिरांचे दर्शन करून आलो आहे. आपल्या संतांनी ज्या 108 दिव्य देशम् मंदिरांचे दर्शन पूर्ण करण्यासाठी भारत भ्रमण केले होते, तशाच प्रकारचे सौभाग्य मला आज श्री रामानुजाचार्य यांच्या कृपेनेच इथे मला मिळाले. मानवतेच्या कल्याणाचा हा जो यज्ञ त्यांनी अकराव्या शतकामध्ये सुरू केला होता, त्याच संकल्पाचे इथे 12 दिवस वेगवेगळ्या अनुष्ठानांमध्ये पुनुरूच्चारण करण्यात आले. पूज्य जीयर स्वामी जी यांच्या स्नेहामुळे आज ‘विश्वक सेन इष्टि यज्ञा’च्या पूर्णाहुतीमध्ये सहभागी होण्याचे भाग्यही मला मिळाले. यासाठी जीयर स्वामीजींचे मी विशेष आभार व्यक्त करतो. त्यांनी मला सांगितले की, विश्वक सेन इष्टि यज्ञ’ हा संकल्प आणि लक्ष्य पूर्तीचा यज्ञ आहे. या यज्ञाच्या संकल्पाला, देशाच्या अमृत संकल्पांच्या सिद्धीसाठी मी नतमस्तक होवून समर्पित होत आहे. या यज्ञाचे फळ मी आपल्या 130 कोटी देशवासियांच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी अर्पण करतो.
मित्रांनो,
जगातल्या बहुतांश संस्कृतींमध्ये अधिकांश तत्वाज्ञानामध्ये कोणत्याही विचाराचा स्वीकार केला गेला आहे, अथवा त्याचे खंडन करण्यात आले आहे. मात्र भारत एक असा देश आहे, इथल्या महान ऋषीमुनींच्या ज्ञानाकडे खंडन-मंडन, स्वीकृती-अस्वीकृती याच्याही पलिकडे जावून पाहिले आहे. स्वतःपेक्षाही वरचा दर्जा देवून त्याकडे पाहिले. स्वतःपेक्षाही उच्च म्हणून त्याकडे पाहिले आहे. ही एक प्रकारची दिव्य दृष्टी आहे, असेच मानून त्याकडे पाहिले आहे. आपल्याकडे अव्दैतही आहे, व्दैतही आहे. आणि या दैत-अव्दैताला सामावून घेवून श्री रामानुजाचार्य जी यांचे विशिष्ट व्दैतही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. रामानुजाचार्य जी यांच्या ज्ञानामध्ये एक वेगळ्याप्रकारची भव्यता आहे. साधारण दृष्टीने विचार परस्पर विरोधाभाषी वाटतात. रामानुजाचार्य जींनी या विरोधी विचारांना अतिशय सहजतेने एका सूत्रामध्ये गुंफले आहे. त्यांच्या ज्ञानामुळे त्यांची व्याख्या सामान्यातल्या अतिसामान्य माणसालाही जोडते. तुम्हीच पहा, एकीकडे रामानुजाचार्य यांनी केलेल्या भाष्यांमध्ये ज्ञानाची पराकाष्ठा तर दुसरीकडे ते भक्तिमार्गाचे जनकही आहेत. एकीकडे ते समृद्ध संन्यास परंपरेतले संतही आहेत. आणि दुसरीकडे गीता भाष्या मध्ये कर्माचे महत्वही अत्यंत उत्तम रूपाने प्रस्तुत करतात. त्यांनी स्वतःही आपले संपूर्ण जीवन कर्म करीत समर्पित केले. रामानुजाचार्य यांनी संस्कृत ग्रंथांचीही रचना केली. तसेच भक्तिमार्गामध्ये तमिळ भाषेलाही तितकेच महत्व दिले. आजही रामानुज परंपरेतल्या मंदिरांमध्ये थिरूप्पावाईचे पठण केल्याशिवाय कदाचित कोणतेही अनुष्ठान पूर्ण होत नसावे.
मित्रांनो,
आज ज्यावेळी दुनियेमध्ये सामाजिक सुधारणांविषयी चर्चा केली जाते, प्रगतीशीलतेविषयी बोलले जाते, त्यावेळी असे मानले जाते की, सुधारणा तर मुळांपासून दूर जावून होवू शकतात. मात्र ज्यावेळी आपण रामानुजाचार्य यांना पाहतो, त्यावेळी आपल्या नक्कीच जाणवते की, प्रगतीशीलता आणि प्राचीनता यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण आपल्या मूळांपासून दूर गेले पाहिजे, याची अजिबात आवश्यकता नाही. वास्तविक आपल्या मूळांशी अधिकाधिक जोडले जाणे जरूरीचे आहे. यामुळेच आपल्याकडे असलेल्या वास्तविक शक्तीचा परिचय होणार आहे. एक हजार वर्षापूर्वी तर रूढी, परंपरा, अंधविश्वास यांचा दबाव, दडपण अगदी आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी जास्त असणार. तरीही रामानुजाचार्य यांनी समाजामध्ये सुधारणांसाठी समाजाला भारताच्या ख-या विचारांची ओळख करून दिली. त्यांनी दलित-मागास लोकांना सामावून घेतले. त्याकाळामध्ये ज्या जातींविषयी काही विशिष्ट भावना होत्या, त्या जातींना तर त्यांनी विशेष सन्मान दिला. यादवगिरीवर त्यांनी नारायण मंदिर बनवले, त्या मंदिरामध्ये दलितांना दर्शन, पूजनाचा अधिकार दिला. रामानुजाचार्य यांनी सांगितले की, धर्म असे सांगतो – “ न जातिः कारणं लोके गुणाः कल्याण हेतवः ’’ याचा अर्थ असा आहे की, या संसारामध्ये जातीमुळे नाही तर गुणांमुळेच कल्याण होते. रामानुजाचार्य यांचे गुरू श्री महापूर्ण जी यांनी एकदा दुस-या जातीच्या आपल्या मित्राचे अंत्यसंस्कार केले होते. त्यावेळी रामानुजाचार्य यांनी लोकांना भगवान श्रीराम यांची आठवण करून दिली होती. त्यांनी सांगितले की, जर भगवान राम आपल्या हातून जटायूचे अंत्यसंस्कार करू शकतात, तर आपल्यामध्ये भेदभाव दर्शविणारा विचार असणारा धर्म कसा काय असू शकतो? ही घटना म्हणजे समाजाला दिलेला एक खूप मोठा संदेश आहे.
मित्रांनो,
आपल्या संस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सुधारणेसाठी आपल्या समाजामधूनच लोक पुढे येतात. अनेक युगांपासून हे दिसून आले आहे. समाजामध्ये ज्यावेळी काही वाईट तत्वांचा प्रसार होवू लागतो, त्यावेळी कोणी ना कोणी महापुरूष आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि हा हजारों वर्षांचा अनुभव आहे. अशा सुधारकांना नेहमीच त्यांच्या कालखंडामध्ये कदाचित स्वीकृती मिळाली असेल अथवा नसेलही, त्यांच्यासमोर आव्हाने निर्माण झाली असतील अथवा नसतीलही, मात्र त्यांच्या तत्वांमध्ये इतकी महान शक्ती असायची, त्यांचे व्यक्तिमत्वच इतके भारदस्त असायचे की, त्यावेळी समाजामधील वाईट शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी ते आपली सर्व शक्ती पणाला लावयाचे. त्यांचा कोणी विरोध केला तरीही, ज्यावेळी समाजाला या चांगल्या गोष्टींचे आकलन होत असे आणि तसेच त्या महान व्यक्तीच्या सुधारणावादी विचाराला स्वीकृतीही तितक्याच वेगाने मिळत असे. सन्मान आणि आदरही तितकाच मिळत होता. यावरून एक लक्षात येते की, कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टींच्या बाजूने, कुरीतीच्या बाजूने, अंधविश्वासाच्या बाजूने, सर्वसामान्यपणे आपल्या समाजामध्ये सामाजिक निर्बंध असू शकत नाही. जो कोणी वाइटाच्याविरोधात लढतो, जो समाजाची सुधारणा करतो, त्याला आपल्याकडे मान आणि सन्मान मिळतो.
बंधू आणि भगिनींनो,
तुम्हा सर्व लोकांना रामानुजाचार्य यांच्या जीवनाविषयीच्या विविध पैलूंचा परिचय आहे. ते समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आध्यात्माच्या संदेशांचाही उपयोग करीत होते. आणि व्यावहारिक जीवनाचाही उपयोग करीत होते. जातीच्या नावावर ज्यांना भेदभावाची वागणूक दिली जात होती, त्यांना रामानुजाचार्य यांनी नामकरण केले होते ते म्हणजे - थिरूकुलथार! म्हणजेच लक्ष्मीजीच्या कुलामध्ये जन्म घेणारे, श्रीकुल म्हणजे दैवीय लोक! ते स्नान करून येतेवेळी आपले शिष्य ‘धनुर्दास’यांच्या खांद्यावर हात टेकवून येत असायचे. या कृतीतून रामानुजाचार्य स्पृश्य-अस्पृश्य अशा वाईट प्रथा मोडीत काढून टाकण्याचा संदेश देत होते. याच कारणामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा समानतेचा आधुनिक नायकही रामानुजाचार्य यांची खूप प्रशंसा करीत होते. आणि समाजालाही सांगत होते की, जर शिकायचे असेल तर रामानुजाचार्य यांची शिकवण अंगिकारावी. आणि म्हणूनच, आज रामानुजाचार्य यांची विशाल मूर्ती - ‘‘ स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’’ च्या रूपाने समानतेचा संदेश देत आहे.
हाच संदेश घेऊन आज देश, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास” हा मंत्र घेऊन नव्या भारताचा पाया रचत आहे, विकास व्हावा, तो सर्वांचा व्हावा, कुठलाही भेदभाव न होता, सर्वांना विकासाचे समान लाभ मिळावेत. ज्यांचा कित्येक शतके छळ करण्यात आला, ते संपूर्ण प्रतिष्ठा आणि मानसन्मानासह विकासाचे भागीदार बनावेत,यासाठी आज बदलत असलेला भारत, एकजुटीने प्रयत्न करत आहे. आज सरकार ज्या योजना राबवत आहे, त्यांचा खूप मोठा लाभ आमचे दलित-मागास बंधू आणि भागिनींना होत आहे. मग ते पक्के घर देणे असो, किंवा मग उज्ज्वला योजनेअंतर्गत, गॅस सिलेंडरची मोफत जोडणी असो. पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याची सुविधा असो किंवा मग विजेची मोफत जोडणी असो. जनधन बँक खाते उघडण्याचा विषय असो किंवा स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कोट्यवधी शौचालये बांधण्याचा विषय असो. अशा योजनांनी दलित-मागास, गरीब, शोषित, वंचित अशा सर्वांचेच भले केले आहे. काहीही भेदभाव न करता सर्वांना सशक्त केले आहे.
मित्रांनो,
रामानुजाचार्य जी म्हणत असत- ‘‘उईरगलुक्कूल बेडम इल्लै’’। म्हणजेच, सगळे जीव समान आहेत. ते ब्रह्म आणि जीवात्मा यांच्यातील अद्वैताविषयी कायम बोलत असत, वेदांताचे हे सूत्र ते स्वतःही आचरणात आणत असत. त्यांच्यासाठी ते स्वतः आणि इतर यांच्यात काहीही भेद नव्हता. एवढेच नाही, तर त्यांना कायमच स्वतःच्या कल्याणापेक्षा इतर जीवांच्या कल्याणाची अधिक चिंता होती. त्यांच्या गुरुंनी कित्येक प्रयत्नांनंतर ज्यावेळी त्यांना ज्ञान दिले होते, त्यावेळी त्यांनी ही ज्ञान गुप्त ठेवण्यास सांगितले होते. कारण, तो गुरुमंत्र त्यांच्या कल्याणाचा मंत्र होता. त्यांनी साधना केली होती, तपस्या केली होती, आयुष्य समर्पित केले होते. आणि म्हणून त्यांना तो गुरुमंत्र मिळाला होता. मात्र श्री रामानुजाचार्य यांची विचारसरणी वेगळी होती.
श्री रामानुजाचार्यजी यांनी म्हटले होते. - पतिष्ये एक एवाहं, नरके गुरु पातकात्। सर्वे गच्छन्तु भवतां, कृपया परमं पदम्।
म्हणजे, मी एकटा नरकात जाणार असेन, तर काही हरकत नाही, मात्र इतर सर्वांचे कल्याण व्हायला हवे. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या शिखरावर चढत प्रत्येक स्त्री-पुरुषाला जो तो मंत्र सांगितला, जो त्यांच्या गुरुंनी त्यांना त्यांच्या कल्याणासाठी दिला होता. समानतेचे असे अमृत श्री रामानुजाचार्यजी यांच्यासारखाच कोणी तरी महापुरुषच निर्माण करु शकतो. असा महापुरुष, ज्याने वेद वेदांताचे वास्तविक दर्शन शास्त्र जाणले आहे.
श्री रामानुजाचार्यजी भारताची एकता आणि अखंडतेची देखील एक प्रदीप्त प्रेरणा आहे. त्यांचा जन्म दक्षिणेत झाला होता. मात्र, त्यांचा प्रभाव दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत संपूर्ण भारतात आहे. अन्नामाचार्यजी यांनी तेलुगू भाषेत, त्यांची प्रशंसा केली आहे, कनकदासजी यांनी कन्नड़ भाषेत श्री रामानुजाचार्यजी यांचा महिमा वर्णन केला आहे. गुजरात आणि राजस्थान मध्ये जर आपण गेलात, तर तिथेही अनेक संतांनी केलेल्या उपदेशांत, श्री रामानुजनाचार्य यांच्या विचारांचा सुगंध आपल्याला जाणवतो. आणि उत्तरेत, रामानन्द परंपरेचे गोस्वामी तुलसीदासजी यांच्यापासून कबीरदास यांच्यापर्यंत, प्रत्येक महान संतासाठी श्री रामानुजाचार्य परम गुरु होते. एक संत कशाप्रकारे आपल्या आध्यात्मिक ऊर्जेने संपूर्ण देशाला एकतेच्या सूत्रात गुंफतो, याची मूर्तिमंत प्रचिती आपल्याला श्री रामानुजनाचार्य यांच्या आयुष्यातून मिळते. याच आध्यात्मिक चेतनेने पारतंत्र्याच्या शेकडो वर्षांच्या कालखंडात भारताची चेतना जागृत ठेवली होती.
मित्रांनो,
या देखील एक सुखद योगायोग आहे, की श्री रामानुजाचार्यजी यांच्या सन्मानाचा हा सोहळा त्यावेळी होत आहे, जेंव्हा देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असल्याचा उत्सव साजरा करत आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासाचे स्मरण करत आहोत. आज देश आपल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना कृतज्ञ श्रद्धांजली अर्पण करत आहे. आपल्या इतिहासापासून आपण आपल्या भविष्यासाठी प्रेरणा घेत आहोत, ऊर्जा मिळवत आहोत. म्हणूनच, अमृत महोत्सवाच्या या आयोजनात, स्वातंत्र्याच्या लढ्यासोबतच, भारताचा वारशाचे देखील जतन आणि संवर्धन करतो आहोत. आपल्याला माहिती आहे, भारताच्या स्वातंत्र्याची लढाई केवळ सत्ता आणि आपल्या अधिकारांची लढाई नव्हती. या लढाईत एकीकडे, वसाहतवादी मानसिकता होती, तर दुसरीकडे, ‘जगा आणि जगू द्या’ असा विचार होता. यात एकीकडे वांशिक श्रेष्ठत्व आणि भौतिकवादी जगण्याचा उन्माद होता, तर दुसरीकडे मानवता आणि आध्यात्म याविषयीची आस्था होती. आणि या लढाईत, भारत विजयी झाला, भारताची परंपरा विजयी झाली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामागे समानता, मानवता आणि आध्यात्म यांची ऊर्जा देखील होती, श्री रामानुजाचार्यजी यांच्यासारख्या संतांपासून मिळाली होती.
आपण महात्मा गांधी यांच्याशिवाय आपल्या स्वातंत्र्यलढ्याची कल्पना करु शकतो का? आणि आपण सत्य आणि अहिंसा या आदर्श मूल्यांशिवाय गांधीजींची कल्पना करु शकतो का? आजही गांधीजींचे नाव आपल्या समोर आल्यास, “वैष्णव जन तो तेणे कहिये’ ही धून आपल्या अंतर्मनात वाजू लागते. या गीताचे रचनाकार नरसी मेहता जी, रामानुजाचार्य जी यांच्या भक्ति परंपरेतील महान संत होते. यामुळे, आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्याला ज्याप्रकारे आपली आध्यात्मिक चेतनेतून ऊर्जा मिळाली होती, तीच ऊर्जा स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आपण करत असलेल्या अमृतसंकल्पांना देखील मिळायला हवी. आणि आज जेंव्हा मी इथे भाग्यनगरला आलो, हैदराबाद इथे आहे, तेंव्हा सरदार पटेल यांचाही विशेष उल्लेख करेन. तसे तर, कृष्ण रेड्डी यांनी आपल्या भाषणात, त्यांच्याविषयी विस्तृत माहिती दिली आहेच; भाग्यनगरचे कोण लोक असे भाग्यवान असतील? असे कोण हैदराबादी लोक असतील, जे सरदार पटेल यांची दिव्य दृष्टी, त्यांचे सामर्थ्य आणि मुत्सद्देगिरी सोबतच हैदराबादच्या प्रतिष्ठेसाठी आणि देशाच्या एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी, सरदार पटेल यांच्या राजकारणाशी परिचित नाहीत? आज देशात एकीकडे सरदार पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ इथे एकतेच्या शपथेचा पुनरुच्चार करत आहे, तर श्री रामानुजाचार्यजी यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी’ समतेचा संदेश देत आहे. हेच एक राष्ट्र म्हणून भारताचे वैशिष्ट्य आहे. आपली एकता, सत्ता किंवा शक्तीच्या पायावर उभी नाही, तर आपली एकता, समता आणि परस्परांविषयीचा आदर या सूत्रातून व्यक्त होत आहे.
आणि मित्रांनो,
आज जेव्हा मी तेलंगण इथे आहे, त्यावेळी, याचा देखील उल्लेख करेन की कसे तेलुगू संस्कृतीनेही भारताच्या विविधतेला सशक्त केले आहे. तेलुगू संस्कृतीची मुळे अनेक शतके जुनी आहेत. अनेक महान राजे, राण्या या विस्ताराचे ध्वजवाहक आहेत. सातवाहन असो, काकटीय असो की विजयनगर साम्राज्य, सर्वांनी तेलुगू संस्कृतीचा ध्वज उंचावला आहे. महान कवींनी तेलुगू संस्कृतीला समृद्ध केले आहे. गेल्याच वर्षी तेलंगणामध्ये असलेल्या 13व्या शतकातील काकटीय रुद्रेश्वर - रामप्पा मंदिराला यूनेस्को जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. जागतिक पर्यटन संघटनेने पोचमपल्लीला देखील सर्वात सुंदर पर्यटन गावाचा दर्जा दिला आहे. पोचमपल्लीच्या महिलांची कला पोचमपल्ली साड्यांच्या रूपाने जगप्रसिद्ध आहे. ही ती संस्कृती आहे, ज्या संस्कृतीने आपल्याला नेहमीच सद्भाव, बंधुभाव आणि स्त्री शक्तीचा सन्मान करायला शिकवले आहे.
तेलुगू संस्कृतीच्या या गौरवशाली परंपरेला तेलुगू चित्रपट उद्योग पूर्ण मान सन्मानाने पुढे नेत आहे. तेलगू चित्रपट, केवळ तेलुगू चित्रपट आज केवळ तेलुगू भाषे पुरतेच मर्यादित नाहीत. तर ते संपूर्ण जगात पोहोचले आहेत. चंदेरी पडद्यापासून तर ओटीटी प्लॅटफॉर्म पर्यंत या सर्जनशीलतेची चर्चा होते आहे. भारताबाहेर देखील खूप प्रशंसा होत आहे. तेलुगू भाषक लोकांचे आपली कला आणि आपल्या संस्कृतीकरीता ही समर्पण, सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मित्रांनो, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात, या अमृत काळात, श्री रामानुजाचार्यजी यांचा हा पुतळा प्रत्येक देशवासीयाला सतत प्रेरणा देत राहील. मला पूर्ण विश्वास आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण त्या कुप्रथा पूर्णपणे संपवून टाकू शकू, ज्या संपविण्यासाठी श्री रामानुजाचार्यजी समाजात जागृती करत होते. याच भावनेने, पूज्य स्वामीजी यांचे आदरपूर्वक आभार मानतो, या पवित्र प्रसंगी मला सहभागी होण्याची मला संधी दिलीत, मी आपला खूप ऋणी आहे. जगभरात पसरलेल्या प्रभू रामानुजाचार्य यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या प्रत्येकाला मी खूप खूप सदिच्छा देतो! माझे भाषण थांबवतो.
आपले खूप खूप धन्यवाद!
S.Thakur/S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795994)
Visitor Counter : 362
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam